पुणे : मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची रुपये १२५ कोटींची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील विनोद खुटेवर कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज’ची पुण्यातील २४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. 'ईडी'ने ही कारवाई शुक्रवारी दिनांक ०४ रोजी केली.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी), मुंबई यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार २४ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये २१ कोटी २७ लाखांची विविध बँकांमधील ५८ खात्यांमधील शिल्लक रक्कम आणि ३ कोटी १४ लाख रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे. यापूर्वी ६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यामध्ये मुख्य आरोपी विनोद खुटे याची ३८.५० कोटींची मालमत्ता, विविध बँकांमधील २३ कोटींची रक्कम जप्त केली होती. यापूर्वी ‘फेमा’ अंतर्गत १८.५८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 'व्हीआयपीईएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस' कंपनीने लोकांची फसवणूक करुन लुबाडलेला पैसा हवाला आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात नेल्याचे 'ईडी'च्या तपासात समोर आले आहे.
याबाबत 'ईडी'चे असिस्टंट डायरेक्टर रत्नेशकुमार भुवनेश्वरलाल कर्ण (वय: ४३ वर्षे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे व त्यांच्या इतर साथीदारांवर आयपीसी ४२०, ४७१, ३४, १२० ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या 'निर्माण विवा सोसायटी'मध्ये घडला होता. 'ईडी'ने जून महिन्यात पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये ‘व्हीआयपीएस ग्रुप’ आणि ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’च्या केंद्रांवर छापेमारी केली होती.
आरोपींनी संगनमत करून 'व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी' व 'ग्लोबल अॅफिलेट बजनेस' या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना प्रतिमाह २ ते ३ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी 'पॉन्जी स्कीम' चालवून लोकांकडून कंपनीच्या बँक खात्यात पैसे न घेता इतर बँकेतील बोगस खात्यावर पैसे घेतले. तसेच कमीशन देण्याचे आमिष दाखवून स्किममध्ये इतर लोकांना पैसे गुंतवण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली.
आरोपी विनोद खुटे याने इतर साथीदारांच्या मदतीने 'फोरेक्स ट्रेडींग'च्या नावाखाली 'काना कॅपीटल' नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीमार्फत गुंतवणूक करण्यासाठी झुम/ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. लोकांना 'फॉरेक्स ट्रेडिंग' मध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बनावट कंपन्या (शेल) उभारल्या. या कंपन्यांच्या बोगस बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून काही दिवसांनी फॉरेक्स ट्रेडींग करायला लावले. यानंतर 'काना कॅपीटल' ही कंपनी बंद केली. यातील आलेले पैसे बेकायदेशीरपणे हवालामार्फत परदेशात पाठवण्यात आल्याचे 'ईडी'च्या तपासात समोर आले आहे. आरोपींनी अनेक लोकांची १२५ कोटी पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा