मुंबई, दि.२४ : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमधून केला आहे.
राज्यामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे राज्यामध्ये एकूण १९ जिल्हे त्यातले ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ १६ तालुक्यात आहे. एकंदरीत विचार केला तर ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता असल्याचे माहिती पवार यांनी प्रसिद्धी माध्यममांना दिली आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळ आहे त्या ठिकाणी मागणीपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने लोकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. महाराष्ट्रात एकंदर २ हजार ९२ मंडळ आहेत यातले पंधराशे मंडळात दुष्काळ राज्यात जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विशेष विचार केला तर मराठवाड्यामध्ये आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशभरात सर्वाधिक धरणे महाराष्ट्र राज्यात आहेत परंतु यातला साठ्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यात ४० महत्वाची धरणे आहेत परंतु या विभागात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागासह अशीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांची आहे. छत्रपती संभाजी नगरला ८१ लघू प्रकल्प आहेत इथे फक्त ६ टक्के पाणी शिल्लक आहे. पुण्यामध्ये ५० प्रकल्प आहेत. या भागात फक्त २४ टक्के पाणी शिल्लक असल्याचे पवार म्हणाले.
मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये ५.५० इतकाच जलसाठा शिल्लक आहे. तर अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर या मोठ्या प्रकल्पामध्ये ५ टक्क्यांहून खाली पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात हीच परिस्थिती जून अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होण्याची शक्यता आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.
कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या कालच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. या सगळ्याकडे सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले.
राज्य सरकारला आम्ही माध्यमांच्या मार्फत जागे करण्याचे आवाहन करत आहोत. हे करूनही सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला इतर पर्याय आहेत असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. 'छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र, पुणे विभागतील परिस्थिती चिंताजनक आहेत. मोठी धरणांमध्ये संभाजीनगर मधील धरणांमध्ये १० टक्के पाणी आहे. तर, पुणे विभागातील धरणांमध्ये ३५ टक्के, नाशिकमधील धरणांमध्ये २२ टक्के पाणी आहे.’, असे सांगत या विभागात किती टँकर सुरू आहेत? याची आकेडवारीच त्यांनी सादर केली.
मे महिन्याच्या शेवटच्या टोकाकडे आपण आहोत, पण जुलैपर्यंत हीच स्थिती असणार आहे. पाऊस पडतो, पण धरणं भरण्यासाठी वेळ लागतो. संभाजीनगरमध्ये १८६७ टँकर लागत आहेत. वेळीच लक्ष दिलं नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यामध्ये ६३२ गाव आणि वाड्यामध्ये ७५५ टँकर सध्या लागत आहेत, असेही पवार म्हणाले.
राज्यात यंदा १०,५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. जनावरांच्या चाऱ्याची आवश्यकता आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीची कामं काढणं आवश्यक आहे, असे पवार साहेब यांनी सूचवलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा