डोंबिवली, दि.१९: एका आमदारांचा भाचा असल्याच्या खोट्या थापा मारून डोंबिवलीतील पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय तांबे (वय: ५५ वर्षे) या भामट्याला नवी मुंबईच्या खारघरहून पोलिसांनी अटक केली आहे. विजय तांबे याच्या विरोधात ५० हून अधिक फसवणूक करुन लुटीचे गुन्हे दाखल आहेत. असाध्य आजार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून तो जामीनावर सुटतो आणि सुटून आल्यावर तो पुन्हा लोकांना आमदारांचा भाचा असल्याची खोटी बतावणी करुन लूटतो, अशी या भामट्याची गुन्हे करण्याची पद्धत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पश्चिम डोंबिवलीतील महात्मा फुले रोड परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात त्या भामट्या विरोधात तक्रार केली होती. रस्त्यात एक जण भेटला मी आमदार यांचा भाचा आहे. मी तुम्हाला त्या दिवशी आमदारांसोबत भेटलो होतो यावर वयोवृध्द काका त्याच्या या बोलण्यानंतर आठवू लागले त्याला नक्की कधी भेटलो ? इतक्यात बोलण्यात गुंतवून त्याने आजोबांकडील दागिने आणि १० हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला आजोबा बँकेतून नुकतेच पैसे काढून बाहेर पडले होते. त्याच वेळी ही घटना घडली. ज्या ठिकाणी आजोबांना बतावणी करुन लुटले गेले, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती लागले. सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणच्या आधारे पोलीसांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्या घरी छापा टाकला. मात्र तो घरी सापडला नाही. ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी ही व्यक्ती पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
अखेर त्याचा शोध सुरू असताना पोलीसांनी त्याला खारघर येथून अटक केली. अटक होण्याआधी त्याने दोन वयोवृद्धांनाही लूटले होते. विजय तांबे याने अटक झाल्यानंतर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. विष्णूनगर पोलीस या लुटीच्या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा