मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिन्याला १५०० रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याचा फायदा राज्यातील ५६ लाख हून अधिक कुटुंबाना होणार आहे. अल्प उत्पन्नगट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना हा लाभ मिळणार आहे. तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये अनुदान देते. एका गॅस सिलिंडरची सरासरी किंमत ८३० रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर ५३० रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही.
पैसे कसे मिळणार ?
गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल. या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल, असा अंदाज आहे. या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा