BREAKING NEWS
latest

वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू झाल्याचा सागर जोंधळे यांचा आरोपामुळे गिता खरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल..


प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपुर वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होते. परंतु, शिवाजीराव जोंधळे नियंत्रक असलेल्या 'विघ्नहर्ता ट्रस्ट'च्या सचिव गिता खरे आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा, मुलगी, सून, जावई यांनी शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशातून त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून वंचित ठेवले. शिवाजीराव यांच्यावर कर्करोग आजारातून बरे होण्यासाठी यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गिता खरे यांनी होऊ दिली नाही. त्यामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूस गिता खरे कुटुंब कारणीभूत आहे. हा शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर यांचा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथमदर्शनी मान्य करून गिता खरे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश विष्णुनगर पोलिसांना दिले.
                               
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी सायली लम्भाते यांच्या आदेशावरून डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या तक्रारीवरून 'विघ्नहर्ता ट्रस्ट'च्या सचिव गिता खरे, वर्षा देशमुख, प्रितम देशमुख, हर्षकुमार खरे आणि स्नेहा खरे यांच्या विरूध्द शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने खरे कुटुंबियांची बाजू ऐकून घेऊन हा आदेश दिला. एखाद्याचा मानसिक छळ करणे, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कट रचणे या भारतीय न्याय संहिता कलमाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव जोंधळे यांना कायदेशीर विवाहाच्या वैशाली पत्नीपासून चार अपत्ये आहेत. 'समर्थ समाज' या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद ते सांभाळत होते. या संस्थेत काही वर्षापूर्वी गिता खरे या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. गिता खरे यांच्या बरोबर शिवाजीराव यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या प्रकाराने शिवाजीराव जोंधळे यांच्या कुटुंबीयांवर अन्याय झाला. शिवाजीराव यांनी मिळकतीमधून आसनगाव सह अनेक ठिकाणी जागा घेऊन तेथे शिक्षण संस्थेची उभारणी केली. गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना ब्लॅकमेलिंग करून, जोंधळे कुटुंबीयांना अंधारात ठेऊन या सर्व मिळकती स्वत:च्या नावावर ब्लॅकमेलिंग च्या दबावाने करून घेतल्या. या विषयावरून शिवाजीराव आणि मुलगा सागर यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले.
जानेवारी २०२२ मध्ये शिवाजीराव यांना यकृताचा कर्करोग झाला. कौटुंबिक वितुष्ट दूर सारून मुलगा सागरने त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. चेन्नई, मुंबई, डोंबिवलीतील रुग्णालयात शिवाजीराव यांच्यावर उपचार करण्यात आले. सागर यांची शिवाजीरावांबरोबरची जवळीक खरे कुटुंबीयांना आवडली नाही. सागरने वडिलांसाठी स्वतः यकृत देण्याची तयारी सुद्धा केली. ती गिता खरे यांनी व्देषातून नाकारली. सागर व शिवाजीराव एक झाले तर आपणास शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करता येणार नाही म्हणून गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना कर्करोगाच्या योग्य उपचारापासून वंचित ठेवले. खोटी कारणे डॉक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवले. या निष्काळजीपणातून शिवाजीराव यांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला, असे सागर यांनी त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या वडिलांच्या मृ्त्यूस गीता खरे कुटुंब जबाबदार असल्याने त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सागर यांनी पोलिसांकडे केली होती. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने हस्तक्षेप केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचा आरोप सागर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे कल्याण जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. तर अधिक माहितासाठी गिता खरे यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्या कारणाने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
« PREV
NEXT »