डोंबिवली : आगामी विधानसभा मतदार संघासाठी भाजपाने कंबर कसली असून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर भाजपाने दावा केला आहे. या विधानसभेवर दोन वेळेला शिवसेनेचा उमेदवार विजयी झाले नाही. यावेळी भाजपचा उमेदवार म्हणून कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांचे नाव आघाडीवर आहे.
२०१४ आणि २०१९ साली भाजपा - शिवसेना युतीने विधानसभा निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळेस युतीतून शिवसेनेचा उमेदवार उभा करण्यात आला होता. २०१९ साली मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील हे निवडून आले होते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर दावा जाहीर केला आहे.
भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पेडणेकर अशा तिन्ही मंडळ अध्यक्षांनी कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी तसेच कोर कमिटी यांच्याकडे ११४-कल्याण ग्रामीण विधानसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी असे पत्र दिले आहे.
याबाबत भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर म्हणाले, कल्याण ग्रामीण विधानसभा यापूर्वी युतीमधुन सन २०१४ व २०१९ दोन्ही वेळा शिवसेना पक्षाने लढवली होती. परंतु दोन्ही वेळा शिवसेनेला हार पत्करावी लागली होती. या निवडणुकीत कल्याण ग्रामीण विधानसभा हा भारतीय जनता पार्टीलाच मिळणे आवश्यक आहे. या विधानसभा क्षेत्रात एकूण ३६० बूथ असून त्यातील निम्मे बूथ हे डोंबिवली ग्रामीण मंडळ विभागात येतात. नुकत्याच झालेल्या कल्याण लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान हे कल्याण ग्रामीण विधानसभा मधून झाले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघासाठीही मोठ्या प्रमाणात मतदान ग्रामीण विधानसभेमधूनच झाले. कल्याण ग्रामीण विधानसभेतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक गेली पाच वर्ष या विधानसभेमध्ये काम करत आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. भाजपला यंदा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून नक्कीच विजयश्री खेचून आणता येईल असा ठाम विश्वास आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा