डोंबिवली: दिवाळी हा सण दिव्यांचा, आनंदाचा, देवाण घेवाणीचा. नेहमीच आपण दिवाळी सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करत असतो, पण सामाजिक बांधिलकी, कर्तव्य आणि भावना या गोष्टीला प्राधान्य देत संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे, तसेच खजिनदार जाह्नवी कोल्हे यांनी, दिवाळी पूर्व शहापूर आदिवासी पाडा येथे जाऊन सर्व आदिवासी बंधू भगिनी सोबत दिवाळी साजरी केली. यामधे राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) असंख्य विद्यार्थ्यांनी देखील या भव्यदिव्य उपक्रमात आपला सहभाग दर्शवला होता.
"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे".. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या पंक्ती प्रमाणे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांचे हात सतत दुसऱ्यांना काही ना काहीतरी देण्यासाठी सदैव पुढे आणि आतुरलेले असतात. दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आदिवासी गरजू व्यक्तींना दिवाळीसाठी किराणा सामान, पणत्या, महिलांना साड्या, गृहापोयोगी वस्तू, चादरी, बेडशीट तर मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ, दिवाळीचा फराळ, अशा अत्यावश्यक व गरजेच्या वस्तू, भांडी देऊन त्यांना दिवाळीचा आनंद दिला.