BREAKING NEWS
latest

'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिरच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा 'निरोप समारंभ' कार्यक्रम साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  शाळेत जाण्याची सुरुवात हा मुलांच्या आयुष्यातला पहिला टप्पा असतो. त्यानंतर शालेय जीवनातला शेवटचा टप्पा म्हणजे माध्यमिक शिक्षण इयत्ता दहावी. दिनांक २८ जानेवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिरच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा   कार्यक्रम संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये पार पडला. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व अन्य पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन केले व स्वागत समारंभ होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना मुलांमध्ये उत्साह द्विगुणित झाला होता. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावना यांची झालर दिसत होती. दहावीचे पर्व संपणार हा आनंद तर शाळा, मित्र सोडून जाणार या भावनेने मन हेलावत होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मित्रांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संपूर्ण मधुबन वातानुकुलीत दालन हे फुलांनी, फुग्यांनी सजवले गेले होते. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींचे स्वागत करण्यासाठी इयत्ता नववी मधील विद्यार्थी सज्ज झाले होते. फुलांच्या वर्षावात इयत्ता दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे जोशात आगमन झाले. नृत्य, वादन, भाषण, कौतुक सोहळा या सर्व गोष्टींची जणू मेजवानीच होती. सर्व मुलांनी आपापल्या कला सादर केल्या, शाळेविषयी, शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा..' आज तुम्हा सर्वांना बघुन आम्हाला आमच्या दहावी मधले दिवस आठवले, विद्यार्थी दशेतले क्षण हे नेहमीच सोनेरी क्षण असतात, शाळा, अभ्यास, मित्र या पलीकडे कोणतेच चिंतेचे विश्व नसते, असे   संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले. आयुष्य हे एखाद्या चेंडूच्या टप्प्यासारखे असते, टप्पे घेत घेत पुढे जायचे असते, त्यामधे खड्डे येणार, अडथळे येणारच परंतु माघार न घेता पुढे चालायचे असते, आशीर्वाद हे कायमच पाठीशी असतात परंतु इच्छाशक्ती ही स्वतःची असते, त्यामुळे तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावरच तुम्ही जग जिंकू शकता, आणि आशीर्वाद हा तुमच्या मधल्या इच्छाशक्तीला मिळालेला प्रेरणा स्त्रोत असतो, म्हणून कायमच आमचे तसेच आई वडिलांचे  आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत, तुम्ही तुमचे स्वप्न साकार करा, असे वक्तव्य डॉ. राजकुमार कोल्हे यांनी केले.

शाळेत शिकत असताना कधी एकदा शाळेतून बाहेर पडतो असे अनेकदा वाटत असते, शाळेच्या नियमातून, बंधनातून मुक्त होण्यासाठी बाहेरचे जग खुणवत असते, अशी गोष्ट वाटणे हे स्वाभाविकच आहे कारण हे अल्लड वय आहे, परंतु ज्या क्षणी तुम्ही शाळेतून बाहेर पडाल त्या क्षणी तुम्ही मागे वळून पाहिलं तर फक्त तुम्हाला तुमच्या आठवणीच दिसतील, सकाळी सात वाजता शाळा भरल्याचा घंटेचा आवाज, प्रांगणात उभे राहून प्रार्थना म्हणत होतो त्याचा आवाज तुमच्या कानात घुमणार , शिक्षकांनी केलेली शिक्षा देखील तुम्हाला प्रेमच वाटणार अशा अनेक गोष्टी मनात ठेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याची वाटचाल करणार, तुम्हाला लहानाचे मोठे होताना बघितले आहे, असे भावपूर्ण उद्गार संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले तर स्वतः शाळेच्या संस्थापिका असून देखील आईच्या भावनेने त्यांनी मुलांना प्रेम दिले, हेलावलेल्या मनाने सर्वांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.
       
सोनेरी क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सर्व मुलांनी संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि सर्व आपल्या आवडत्या शिक्षकांबरोबर फोटो काढले. सर्व मुलांना भेटवस्तू देऊन अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत