BREAKING NEWS
latest

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले ‘विश्व मराठी संमेलन २०२५’

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चे उद्घाटन आज फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध स्टॉल्सवर भेट दिली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी ‘साहित्य भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय लिपींवर आधारित ‘अक्षरभारती’ पुस्तकाचे प्रकाशन तसेच, अभिजात पाठपुरावा समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण या सोहळ्यात करण्यात आले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले विश्व मराठी संमेलन असून, “अभिजात मराठी” हीच या संमेलनाची संकल्पना आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे या कवी संमेलनात बेळगाव-निपाणी येथील कवी आपल्या काव्यपाठाने रंगत आणणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले की, भाषा ही केवळ संपर्काचे साधन नाही, तर अभिव्यक्तीच्या माध्यमातून सृजन निर्मितीचे देखील साधन आहे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा राजमान्यता प्राप्त आहे. परंतु, मराठीला राजमान्यता देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठी भाषा प्रत्येक किलोमीटरवर बदलत असली तरी तिची गोडी अवीट आहे. मराठीतील बोलीभाषा आणि तिच्यातील साहित्य, काव्यप्रकार हे अतिशय वेगळे आणि मनाला भावणारे आहेत.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे, ज्याचा अत्यंत आनंद आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, “संतांच्या साहित्यात्मक रचनेतून सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार आणि वैश्विक विचार देण्याचे कार्य मराठी भाषेने नेहमीच केले आहे. मराठी भाषेची ही गौरवमयी परंपरा पुढे नेण्यासाठी ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’च्या माध्यमातून आम्ही जगभरातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करीत आहोत.” मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी मराठी विभागाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून पुढील पिढ्यांसाठी अभिजात साहित्य कसे उपलब्ध करता येईल, याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर येत्या ५ वर्षांत कोणत्याही एका देशात मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाईल, लंडनमधील मराठी मंडळाला जागेसंदर्भात मदत केली जाईल आणि दिल्लीतील मराठी शाळा अव्याहत चालण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. श्रीरंग आप्पा बारणे, आ.भिमराव तापकीर, अप्पर मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत