मुंबई : येथील 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक' च्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे आरबीआय कडून काल कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या बँकेत कुंपणानेच शेत खाल्ल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही बँक डबघाईला येण्यामागील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. बँकेचा पूर्व जनरल मॅनेजर ऍण्ड अकाउंट हेड हितेश प्रवीणचंद मेहता विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेचे तब्बल १२२ कोटी रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याला अटक केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईनंतर अनेक खातेधारकांनी बँकेबाहेर रांगा लावत आपल्या ठेवींची विचारणा केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं खातेधारक आणि ठेवीदारांचा नाईलाज झाला आहे.
हितेश मेहता बँकेच्या महाव्यवस्थापकपदी असताना दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यावेळी पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यातून १२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. बँकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात हितेश आणि आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलीसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. पुढील तपासासाठी प्रकरण 'ईओडब्ल्यू' कडे वर्ग करण्यात आलं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँकेविरोधात कारवाई केली. मुंबईस्थित या बँकेमध्ये जवळपास १.३ लाख ठेवीदारांच्या ठेवी असून, साधारण ९० टक्क्यांहून अधिक खातेधारकांच्या खात्यांमध्ये ५ लाखांहून अधिक रक्कम ठेव स्वरुपात ठेवण्यात आली होती. बँकेतील काही खात्यांची तपासणी केली असता अपेक्षित तपशील हाती न आल्यानं आरबीआयनं या बँकेवर कारवाई केली. हे निर्बंध १३ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. आता बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. यासोबतच, बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा