BREAKING NEWS
latest

कोकण रेल्वे मार्गावर ‘रो-रो’ सेवेतून कार वाहतूक होणार सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा थकवा. पण आता कोकण रेल्वेने यावर एक जबरदस्त उपाय शोधला आहे. ’रो-रो’ सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी ’कार ऑन ट्रेन’ ही अभिनव सेवा सुरू केली जात आहे. यामुळे आता तुम्ही स्वतः प्रवास करताना तुमची लाडकी कार थेट रेल्वेने कोकणात किंवा गोव्यात घेऊन जाऊ शकणार आहात.

कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेली अनेक वर्षे मालाने भरलेले ट्रक रेल्वे वॅगनवरून वाहून नेणारी ’रो-रो’ सेवा यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर आता खासगी चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास कार चालवण्याच्या त्रासाशिवाय अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी होणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या गर्दीत हा पर्याय अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

ही सेवा येत्या २३ ऑगस्टपासून सुरू होणार असून, यासाठीचे आरक्षण २१ जुलै २०२५ पासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खर्‍या अर्थाने ’चिंतामुक्त’ प्रवासाचा अनुभव देणारा ठरेल.

प्रत्येक कारसाठी शुल्क ७ हजार ८७५ रुपये

कारसोबत तिघांना एसी कोच अगर एसएलआर डब्यातून प्रवास करता येणार

सेवा कधीपासून सुरू ?

– कोलाड (महाराष्ट्र) येथून: २३ ऑगस्ट २०२५ पासून.

– वेर्णा (गोवा) येथून: २४ ऑगस्ट २०२५ पासून.

– ही सेवा ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.

आरक्षण कधी आणि कसे ?

-- बुकिंग सुरू: २१ जुलै २०२५.

-- बुकिंगची अंतिम तारीख: १३ ऑगस्ट २०२५.

काय आहेत फायदे ?

-- मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून सुटका.

– प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत.

– लांबच्या प्रवासात गाडी चालवण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचणार.

– कोकणात किंवा गोव्यात फिरण्यासाठी स्वतःची गाडी उपलब्ध.

ही सेवा रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा या स्थानकांदरम्यान असेल. कारसोबत केवळ तीन व्यक्तींना प्रवासची परवानगी असेल. एस.एल.आर. किंवा तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्याचे तिकीट काढावे लागेल.

कुठून कुठे धावणार ट्रेन ?

ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान उपलब्ध असेल.या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून २३ ऑगस्ट २०२५ पासून तर वेर्णा (गोवा) येथून २४ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत