BREAKING NEWS
latest

शिंदे गटाने सुचवीला महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला, अजितदादांची अडचण होणार ?

प्रतिनिधी: अवधूत सावंत

मुंबई : प्रताप सरनाईक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी महापौरपदाच्या निवडीविषयीही भाष्य केले आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एकूण २९ महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. चव्हाण यांच्या याच विधानावर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते प्रताप सरनाईक यांनी महायुतीत महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला समोर आणला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नव्या विधानानंतर आता अजितदादांची अडचण होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा महापौर..

प्रताप सरनाईक यांनी महापालिकेच्या निवडणुका आणि महापौरपद यावर भाष्य केले आहे. हे महायुतीचे सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर होता. तिथे त्याच पक्षाला महापौरपद दिलं पाहिजे. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाला महापौरपद मिळाला पाहिजे ही महायुतीची सूत्रे असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली हे सरकार उत्तम काम करत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

महायुतीत प्रतिनिधीत्त्व कसे दिले जाते ?

आम्ही आगामी निवडणुका महायुतीतच लढवणार आहोत. हे ठरवल्यामुळे ज्या पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये पूर्वीपासून होती, पूर्वीपासून ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक महापालिकेत निवडून येत होते, त्या पक्षाचा महापौर, द्वितीय स्थानावर ज्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले, त्या पक्षाला उपमहापौरपद तसेच तृतीय स्थानावर असलेल्या पक्षाला स्थायी समितीचे अध्यक्षपद, अशा प्रकारचे महायुतीत वाटप केले जाते, अशी माहितीही त्यांनी दिली.

तीन नेते जो निर्णय घेतील ते..

मात्र शेवटी आम्ही किती काहीही बोललो तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे, असेही सरनाईक म्हणाले. तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांनी मला फार मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही वावरत आहात. तुमच्या कार्यपद्धती योग्य प्रकारे होती की नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे मतही सरनाईक यांनी मांडले.

ड्रग्स तस्करीवर प्रताप सरनाईक काय म्हणाले ?

गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर हे मराठीच्या मुद्द्यामुळे चर्चेत आहे. याच मीरा भाईंदरमधील ड्रग्स तस्करीवरही सरनाईक यांनी भाष्य केले. मीरा-भाईंदर शहर काही प्रयोगशाळा नाहीये. इकडे ड्रग्स माफिया घुसलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय चाललेला आहे. काही लोकांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरसुद्धा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. आरोपीसह 58 पुड्या ड्रग्स पोलीस स्टेशनला नेऊन देण्यात आल्या. त्यानंतरही त्या पुड्यांसह आरोपीला पोलिसांनी सोडून दिलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा असे तीन पक्ष आहेत. मुंबईत भाजपा आणि शिवसेनेची ताकद आहे. असे असताना मुंबईत ज्याचे जास्त नगरसेवक किंवा ज्याचा अगोदर महापौर होतो, त्याचाच महापौर असा फॉर्म्यूला ठरला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. त्यामुळे आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत