मुंबई : भाद्रपद गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली. राजाला अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तू या नेहमीच एक उत्सुकतेचा विषय ठरतो. या वर्षी चर्चा आहे ती अमेरिकन डॉलरच्या हाराची. गणेशाला देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी नवसापोटी मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले. पहिल्याच दिवशी ४६ लाख रुपयांची रोकड जमा झाली असून दानपेटीत कोट्यावधीचे सोने-चांदी व परदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळाले आहे. त्यात विशेष म्हणजे भाविकाकडून आलेला अमेरिकन डॉलर्सचा हार.
बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी दानपेट्यांतील नोटांची मोजणी करत असून त्यात ₹ १०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांसह परदेशी नोटाही आढळल्या. लालबागच्या राजाला भाविकांकडून मिळालेल्या दानामध्ये दोन लाख रुपये किमतीचा सोन्याचा मोदक, सोन्याची पावपले, हार, मुकुट, अंगठ्या, नाणी, सोन्याचे गणपती तसेच एक किलो वजनाची चांदीची वीट, चांदीचे मोदक, गणपती, मुकुटं, हार, पाळणे, समया आणि फुलघरे यांचा समावेश आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची रोकड आणि अगदी क्रिकेट बॅटसुद्धा दानपेटीत मिळाली आहे असे मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा