मुंबई : नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेगवान तसेच सुलभकरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येईल. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याचदिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे.
प्रशासकीय कामकाजात सुलभता आणणे तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वेग आणणे, यासाठी सर्व विभाग तथा खाती यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये सुलभता आणली आहे.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. असे असले तरी, वर्षभरात होणारे विवाह पाहता ही आकडेवारी नक्कीच कमी आहे. याची कारणे प्रशासनाने शोधली असता लक्षात आले की, मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता, महानगरपालिकेकडे केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५००/- इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे म्हणाले की, या दोन्ही सेवा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहेत. या दोन्ही नवीन सेवांमुळे विवाह नोंदणीची प्रक्रिया आणखी जलद होईल. तसेच, विवाह नोंदणीचे प्रमाण वाढेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.
मुंबईतील धावपळीचे, धकाधकीचे आयुष्य लक्षात घेता, नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिकांनाही कामकाजाच्या दिवसांमध्ये अतिरिक्त सुट्टी घेऊन विवाह नोंदणीसाठी महानगरपालिकेकडे यावे लागते. कारण, सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कार्यकाळात, विवाह नोंदणीसाठी नवदाम्पत्य व साक्षीदारांना विवाह निबंधकासमोर (विभागीय आरोग्य अधिकारी) यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सबब, नोकरदार असो किंवा व्यावसायिक, पती-पत्नी किंवा त्यांचे साक्षीदार यांना आपल्या कामकाजाच्या दिवशी सुटी घ्यावी लागते. यामुळे संबंधितांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही अडचण दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठवडा अखेरीस (वीक एन्ड) म्हणजे शनिवार व रविवार या दोन्ही सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या कालावधीत विवाह नोंदणी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये, दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी - 'ए', 'सी', 'ई', 'एफ दक्षिण', 'जी दक्षिण', 'एच पूर्व', 'के पूर्व', 'पी दक्षिण', 'पी उत्तर', 'आर मध्य', 'एल', 'एम पश्चिम', 'एस' या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. तर, दर रविवारी 'बी', 'डी', 'एफ उत्तर', 'जी उत्तर', 'एच पश्चिम', 'के पश्चिम', 'पी पूर्व', 'आर दक्षिण', 'आर उत्तर', 'एन', 'एम पूर्व', 'टी' या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
दरम्यान, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या पाच दिवसांमध्ये होणारी विवाह नोंदणीदेखील जलद व्हावी, संबंधितांना वारंवार महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी आणखी एक सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून ही सेवा ओळखली जाईल. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या ३० विवाह नोंदणी कोट्यामधून २० टक्के म्हणजे एकूण ६ विवाह नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' म्हणून राखीव राहतील. या जलद नोंदणीचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना, सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करुन त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. मात्र, या दोन्ही विवाह नोंदणी सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (पब्लिक हॉलिडे) उपलब्ध नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा