डोंबिवली : ५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे हाडाचे शिक्षक आणि स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती, त्यांच्या सन्मानार्थ सर्व भारतीय हा दिवस शिक्षक दीन म्हणून साजरा करतात.
'जे एम एफ' संस्थेमध्ये देखील मोठ्या उत्साहात शिक्षक दीन पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुमारे ३० मान्यवर शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांना 'जे एम एफ पुरस्कार २०२५' ने पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान, गुजराथ, दिल्ली अशा अनेक ठिकाणाहून शिक्षाविद शिक्षकांची उपस्थिती प्रार्थनीय होती. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जाह्नवी राजकुमार कोल्हे त्याच बरोबर मुख्य अतिथी श्री. एस.सत्यकुमार, (हेवी वॉटर बोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच विशेष अतिथी पद्मश्री पुरस्कृत श्री. गजानन जगन्नाथ माने, श्री. ए.के.सिन्हा, श्री. बी.एम.सिन्हा, डॉ. मोसेझ, श्री. युवराज कोल्हे, श्री. कोळेकर, डॉ. कुमार, श्री. परशुराम भांगे गुरुजी, सौ. पुष्पा भांगे व उपस्थित असलेले सर्व विभूषित शिक्षकगण तसेच इतर पदाधिकारी यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रशिक्षक रमेश वागे, सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम ढोलताशे वाजवून व नृत्य शिक्षक अभिषेक देसाई व सौ. कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वागत नृत्य करून जल्लोषात स्वागत केले. सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते मान्यवरांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनानिमित नाट्य शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या दिग्दर्शनाखाली मुलांनी लघुनाट्य सादर केले तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक मोठे शिक्षक होऊन गेले.
यावेळी प्रसार माध्यमाचे मुख्य श्री. रोहित राजगुरु, अखिल नायडू, आकाश व त्यांच्या चमूने तयार केलेली विभूषित शिक्षकांची लघु चित्रफित दाखवण्यात आली तर 'जाह्मविज मल्टी फाऊंडेशन' चा २५ वर्षाचा प्रवासाचा माहितीपट देखील दाखवण्यात आला. शिक्षक कसा असावा तर प्रेम आणि उद्वेग यांचा समतोल साधणारा असावा, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढविणारी असते तर वेळप्रसंगी पाठीवर मारलेली तीच थाप ही वाईट वळणावरून चांगल्या मार्गावर नेणारी असते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिक्षणाने माणूस मोठा होतो तर अनुभवाने माणूस शहाणा होतो, पृथ्वीतलावरील सर्वोच्च श्रेष्ठ पद व सन्मान कोणते असेल तर ते शिक्षक होण्याचे. आणि हे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही. ज्ञान दानाचे कार्य करत असताना देखील विद्यार्थी दशेतली शिकण्याची दुर्दम्य इच्छा असणे म्हणजे शिक्षक. शिक्षकांचे ऋण हे कधीही न फिटणारे असते किंबहुना ते न फेडता त्या साठलेल्या व्याजावर मिळालेल्या ज्ञानाच्या यशाचे मनोरे बांधावेत असे सांगून, आज अनेक उच्चशिक्षित, विभूषित शिक्षक मंडळींना "जे एम एफ शिक्षाविद २०२५" पुरस्कार प्रदान करताना मला वाटते की एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला दिलेला आशीर्वादच आहे. असेही ते म्हणाले.
ज्या प्रमाणे मातीला आकार देऊन कुंभार मडके बनवतो त्याच प्रमाणे बालमनाच्या कोऱ्या पाटीवर श्री गणेशा लिहून भविष्य घडवतो तो शिक्षक होय, शिक्षणाला मर्यादा नाहीत आणि शिकायला वय नाही आणि शेवटपर्यंत शिकणारा आणि शिकवणारा असतो तो म्हणजेच शिक्षक. असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने रौप्य महोत्सव मानचिन्ह, 'जे एम एफ' शिक्षाविद पुरस्काराचे मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल प्रदान करण्याकरिता उपस्थित व निवडक ३० मान्यवर शिक्षकांना मंचावर बोलावून श्री. एस.सत्यकुमार अध्यक्ष, हेवी वॉटर बोर्ड, भारत सरकार, मुंबई, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जाह्नवी कोल्हे, यांच्या हस्ते पूरस्कार देण्यात आले. तर संस्थेतील सर्व शिक्षकांना चांदीची गणपती व लक्ष्मी ची प्रतिमा देण्यात आली. पुरस्कार विजेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. एकनाथ चौधरी, सौ. श्रेया कुलकर्णी, श्री. योगेश शिरसाट, शर्वरी मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्या ज्योती व्यंकटरामण यांनी केले. राष्ट्रगान गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम 'ना भूतो ना भविष्यती' असा झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा