BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता व माझे अस्तित्व' चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  अगणित पदव्या प्राप्त केलेले 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे हे नेहमीच वेगवेगळ्या नवीन विषयाची हाताळणी करून त्या विषयांमधील सखोलता विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यरत असतात. मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा विषय होता ' कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (Artificial Intelligence) जे सध्याच्या काळात कुतुहलाचा आणि नवीन काही शिकण्याचा विषय झाला आहे. याच विषयावर आणि या सारख्या अनेक विषयांवर खूप काही शंका कुशंका विद्यार्थ्यांच्या मनात रेंगाळत असतात त्यासाठीच चर्चासत्राचे आयोजन केले गेले. दहा दिवसांसाठी 'जे एम एफ' चा गणपती बाप्पा मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये विराजमान झाला आहे. बाप्पाची आरती करून चर्चासत्राची सुरुवात झाली.
गणपती हा बुद्धीचा दाता आहे, म्हणूनच मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने अनेक नवनवीन गोष्टी निर्माण करतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तर आजच्या युगात स्वतः मध्ये प्रगल्भता आणून विकास करावा हे सांगताना अनेक तज्ञांची नावे घेऊन उदाहरण दिले. एखादे चित्र मनात साकारून कल्पनेतून ते सजीव करणे म्हणेजच स्वप्न पडणे होय. याच स्वप्नांना अस्तित्वात आणून, रेखाटलेल्या चित्रांना सजीव करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence या तंत्रज्ञान माध्यमातून साकारले जाते. सध्याच्या काळात रोजच्या जीवनातील घडामोडी मध्ये Artificial Intelligence हा महत्वाचा घटक ठरला आहे. तंत्रज्ञानाने माणूस किती पुढे जातो त्यासाठी AI हे चपखल उदाहरण आहे. नवनवीन, प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे चेहरे बनवून त्यामधून सहजपणे व्हिडीओ बनवता येतात. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने  संगणक बनवला, त्यामध्ये अनेक विषयांचे प्रोग्राम आखून देऊन सर्वांना सहज सोयीचे माध्यम उपलब्ध करून दिले. तर अनेक अभ्यासक्रम देखील माहिती करून दिले. थोडक्यात काय तर पूर्वी आपण अभ्यास करताना मार्गदर्शिका अर्थात गाईड वापरत असू तेच आता AI च्या माध्यमातून सुलभपणे गाईड उपलब्ध झाले आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षरित्या वाचून तुमच्या शंकेच निरसन होते.
सारासार विचार करता जी गोष्ट जास्त फायदेशीर होऊन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहते तिचीच दुसरी बाजू ही तोट्याची देखील असू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, जग जवळ आले, अनेक गोष्टी साकारायला मिळाल्या, परंतु त्याचा परिणाम असा झाला की माणूस विचार करून आपल्या बुद्धीने जे कार्य करत होता ती बुद्धिमत्ता खुंटत चालली आहे, सहजरित्या मिळालेल्या गोष्टीचा आनंद हा असतोच परंतु त्या गोष्टीवर  विचार करून ती कल्पना शक्तीने अंमलात आणून साकारलेल्या गोष्टीचा आनंद हा आभाळा एवढा आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. परंतु काळाबरोबरच आपणही चालले पाहिजे म्हणूनच AI हे माध्यम तुम्हा तुम्हां आम्हाला नवीन दिशा देणारे आहे म्हणूनच काळानुसार रोजच्या घडामोडी मध्ये सतर्क राहा असेही सांगितले.
प्रसार माध्यमाचे मुख्य आयोजक श्री.रोहित राजगुरु व त्यांच्या चमू ने कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे अनेक चित्र दाखवून त्यांचे चलचित्र कसे तयार करता येते हे देखील विद्यार्थ्यांना दाखवले. जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय व वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी व सर्व शिक्षक या चर्चासत्रात उपस्थित होते. अनेकांनी प्रश्न विचारून उत्तरे देखील घेतली. वंदे मातरम् म्हणून चर्चासत्राची सांगता झाली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत