BREAKING NEWS
latest

ऊर्जा क्षेत्रात भारताची ऐतिहासिक कामगिरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : भारताच्या ऊर्जा क्षेत्राने २०२५ मध्ये दोन ऐतिहासिक टप्पे पार करत स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी देशाची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता ५०० गीगावॉटचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करत ५००.८९ गीगावाटवर पोहोचली. ही कामगिरी दीर्घकालीन धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या एकूण क्षमतेपैकी २५६.०९ गीगावॉट म्हणजेच ५१% पेक्षा अधिक क्षमता गैर-जीवाश्म इंधन स्रोतांमधून प्राप्त होते, ज्यामध्ये सौर, पवन, जलविद्युत आणि अणुऊर्जा यांचा समावेश आहे. उर्वरित २४४. ८० गीगावॉट क्षमता जीवाश्म इंधनावर आधारित आहे. सौर ऊर्जा १२७.३३ गीगावॉट आणि पवन ऊर्जा ५३.१२ गीगावॉट पर्यंत पोहोचली आहे, जी भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रगती दर्शवते.

वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) भारताने २८ गीगावॉट गैर-जीवाश्म क्षमता आणि ५.१ गीगावॉट जीवाश्म इंधन क्षमता निर्माण केली, यावरून स्वच्छ ऊर्जा क्षेत्र किती वेगाने विस्तारत आहे हे स्पष्ट होते. याच वर्षी २९ जुलै २०२५ हा दिवस भारतासाठी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. त्या दिवशी देशाच्या एकूण २०३  गीगावॉट वीज मागणीतून ५१.५% वीज नवीकरणीय स्रोतांद्वारे पुरवली गेली. त्यात सौर ऊर्जा उत्पादन ४४.५५ गीगावॉट, पवन ऊर्जा २९. ८९  गीगावॉट आणि जलविद्युत उत्पादन ३०.२९ गीगावॉट इतके होते. याचा अर्थ असा की प्रथमच भारताने एका दिवसात अर्ध्याहून अधिक वीज हरित स्रोतांद्वारे निर्माण केली हे परिवर्तनाचे ऐतिहासिक संकेत आहे.

या प्रगतीमुळे भारताने COP26 मध्ये घेतलेल्या पंचामृत संकल्पांपैकी एक २०३० पर्यंत ५०% विद्युत क्षमता गैर-जीवाश्म स्रोतांद्वारे प्राप्त करणे हे लक्ष्य पाच वर्षे आधीच पूर्ण केले आहे. हे यश भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनातील नेतृत्व सिद्ध करते, जे स्थिर आणि विश्वासार्ह ग्रिड व्यवस्थापनासह साध्य झाले आहे. यामुळे उत्पादन, स्थापनेपासून ते देखभाल आणि नवकल्पनांपर्यंत अनेक रोजगार संधी निर्माण होत आहेत, ज्याचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना मिळत आहे.

ऊर्जा मंत्रालय आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) यांनी सर्व वीज निर्मिती कंपन्या, ट्रान्समिशन युटिलिटीज, सिस्टम ऑपरेटर आणि राज्य संस्थांना त्यांच्या योगदानासाठी अभिनंदन दिले आहे. भारताचा ऊर्जा क्षेत्रातील हा टप्पा जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जा नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहे आणि भविष्यातील हरित भारताच्या दिशेने एक ठाम पाऊल आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत