डोंबिवली दि.३१ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी डोंबिवली येथे ठाणे पोलीस कमिशनरेट यांच्या माध्यमातून "रन फॉर युनिटी" या एकता दौड चे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ ते ८ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमांस डोंबिवलीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठाणे पोलीस कमिशनरेट आयोजित 'एकता दौड' आप्पा दातार चौक येथून सुरू होऊन गणेश मंदिर संस्थान - नेहरू रोड - भाजी मार्केट - फडके रोड - मदन ठाकरे चौक या मार्गे परत आप्पा दातार चौक येथे समाप्त झाली. कार्यक्रमादरम्यान डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे नागरिकांसाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी या प्रदर्शनास विशेष उत्साहाने भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात रामनगर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग) सुहास हेमाडे, डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड, सोनी मराठी वरील क्राईम पॅट्रोल मधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता तथा निवेदक सतीश नायकोडी, डोंबिवलीतील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्य, तसेच शाळा-कॉलेजमधील एनएसएस व एनसीसी विद्यार्थी आणि स्पोर्ट्स ऍकॅडमी चे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सुमारे २५० ते ३०० नागरिक "रन फॉर युनिटी" या एकता दौड कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. या प्रसंगी डोंबिवली पोलीसांकडून योग्य ती दक्षता घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीसांकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा