मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून ठाण्यात आणि पुढे मुंबईत थेट प्रवेश करता येणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे.
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावरुन ठाण्यात येण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी असते. मात्र आता या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. मुंबई आणि ठाण्यातून प्रवास करणाऱ्या रहिवाशांना आता लवकरच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर या समृद्धी महामार्गाशी थेट जोडता येणार आहे.
(भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान उन्नत मार्ग आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए ने (भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान २९.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग, एलिवेटेड ब्रिज उभारण्याची योजना आखली आहे. या उन्नत मार्गासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. भिवंडी येथील आमने ते ठाणे येथील साकेत या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवाशांना विनाअडथळा थेट मुंबईत प्रवेश करता येणार आहे. नव्या आमने ते साकेत या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.
ठाणे ते मुंबई प्रवास होणार सुखकर
सध्या भिवंडीतून आमने ते ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे जवळपास दीड ते दोन तास लागतात. तसंच ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जातानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए 'इस्टर्न फ्री वे' चा विस्तार करणार आहे. घाटकोपर येथील छेडानगर ते आनंदनगर दरम्यान हा फ्री वेचा विस्तार केला जाणार आहे. या मार्गाचं कामही सुरू करण्यात आलं आहे. छेडानगर ते आनंदनगर हा मार्ग १२.९५५ किलोमीटर लांबीचा असेल. तसंच या मार्गावर सहा लेन असतील. या कामासाठी २६८३ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसंच आनंदनगर ते साकेत (ठाणे) या मार्गावरही उन्नत मार्गाचं काम सुरू आहे. हा मार्ग ८.२४ किलोमीटर लांबीचा असून यासाठी १८७४ कोटी खर्च येईल. एखादा महामार्ग जेव्हा बनतो तेव्हा विकासाची दालनं खुली करतो त्यामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरुन विनाअडथळा मुंबईत जाता येईल. भिवंडी-आमने ते ठाणे-साकेत, साकेत ते आनंदनगर आणि आनंदनगर - छेडानगर-घाटकोपर आणि पुढे सध्याच्या 'इस्टर्न फ्री वे' ने दक्षिण मुंबईत पोहोचणं अतिशय सुलभ होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा