कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील बेकायदेशीर आणि अनधिकृतरीत्या चालणाऱ्या लेडीज बारवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ चे अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी धडक कारवाई केली. या मोहिमेअंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ताल रेस्टॉरंट ऍण्ड बार वर छापा टाकला.
गुप्त माहितीच्या आधारे २३ नोव्हेंबर रोजी 'ताल रेस्टॉरंट ऍण्ड बार' वर छापा टाकण्यात आला असता बारमध्ये नियमबाह्यरीत्या जास्त बारबाला ठेवून अश्लील नृत्य सुरू असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान हॉलमध्ये एकूण १५ बारबाला नाचत असल्याचे समोर आले. तसेच बारमालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, पुरुष वेटर्स आणि काही ग्राहक अशा १३ जणांनी या गैरप्रकारांना प्रोत्साहन दिल्याचेही पोलीसांनी नोंदवले.
या सर्व २८ जणांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११७२/२०२५ अन्वये बीएनएस कलम २९६, २२४(२), ५४, ३(५) तसेच डान्स बार बंदी कायदा २०१६ चे कलम ३, ४, ८(१) (२) (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान 'ताल बार' चे मालक, चालक, मॅनेजर आणि कॅशियर अशा एकूण ६ आरोपींना महात्मा फुले पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाणे करीत आहे. उपायुक्त कार्यालय परिमंडळ-३ च्या विशेष पथकाने बेकायदेशीर व नियमभंग करणाऱ्या लेडीज बारवर सुरू केलेली मोहिम पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा