ठाणे, दि. २० : मुंबई-शहर आणि उपनगरात गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी मराठी-अमराठी वादाचे अनेक प्रसंग घडून येत आहेत. आज झालेल्या अशाच एका वादावादीत एका मराठी तरुणाने लोकल ट्रेनमध्ये हिंदीमध्ये बोलल्यामुळे मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे निराश होऊन आत्महत्त्या केली आहे. कल्याण पूर्व तिसगांव नाका येथे राहणारा अर्णव खैरे मुलुंडच्या 'केळकर कॉलेज' मध्ये सायन्स शाखेत शिकत होता. १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. गर्दीच्या डब्यात अर्णवने इतरांना बाजूला होण्यासाठी सहज हिंदीत “थोडा आगे हो..” असे म्हटले. एवढ्यावरून काही अनोळखी प्रवाशांनी त्याला घेरले. “मराठी बोलता येत नाही का ?”, “मराठी बोलण्याची लाज वाटते का ?” अशा उलटसुलट प्रश्नांनंतर त्याला बेदम मारहाण केली.
अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेला अर्णव पुढच्या ठाणे स्टेशनला उतरला, भावनिकदृष्ट्या कोसळलेला तो मागील लोकल पकडून मुलुंडला पोहोचला. त्याने कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पूर्ण केले, पण मनात खोलवर बसलेला अपमान आणि भीती त्याला स्वाभाविक राहू देईना. दुपारी तो घरी परतला आणि वडिलांना फोन करून त्याने संपूर्ण प्रसंग सांगितला.
सायंकाळी ७ वाजता वडील जितेंद्र खैरे घरी पोहोचले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुग्णालयात नेले असता रात्री ०९.०५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडिलांच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा