उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील पाच ज्येष्ठ नगरसेवकांनी थेट भाजपला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतप्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळेच आम्ही पक्ष सोडला, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर भाजप मध्ये असंतोष उफाळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उल्हासनगर महापालिकेतील
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, प्रकाश मखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी आणि मीना सोंडे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
सलग पाच वेळा निवडून आलेले जमनू पुरसवानी हे भाजपचे १९८४ पासूनचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सलग १७ वर्ष उल्हासनगर महापालिकेत गटनेता असलेले पुरसवानी सिंधी समाजातले २५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. पुरसवानी यांनी यापूर्वी भाजपचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कंटाळून उल्हासनगरातील भाजपच्या नगरसेवकांनी भाजपची साथ सोडल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे ३० कोटींचा आमदार निधी वापराविना पडून राहिला, तसेच पक्षाच्या वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. बाहेरून आलेल्या नेत्यांना पद सन्मान, पण जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान नाही अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावरच भाजपमध्ये फुट पडल्याने महायुतीतच उघड संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर युतीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. दरम्यान इतर पक्षांचा पर्याय होता मात्र हिंदुत्व आणि एनडीए मध्ये राहण्यासाठी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराचा ज्या प्रकारे विकास केला तसा विकास उल्हासनगराचा करावा, या विचाराने पाचही ज्येष्ठ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा