मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर - १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बहुप्रतीक्षित राज्यस्तरीय स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २४ किशोर व किशोरी संघ सहभाग नोंदवणार आहेत.
जेतेपदासाठी रंगणारी चुरस
किशोर गटात गतविजेते धाराशिव तर किशोरी गटात गतविजेते सोलापूर जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मात्र सर्वच गटांत प्रचंड तगडे प्रतिस्पर्धी असल्याने यंदाची स्पर्धा अत्यंत चुरशीची व उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक सामन्यात वेग, चपळता आणि डावपेचांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्याची तयारी
या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ (भारतीय क्रीडा मंदिर), सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. उद्घाटनप्रसंगी शिवकुमार लाड (विश्वस्त, श्री समर्थ व्या. मंदिर), 'पेडणेकर ज्वेलर्स'चे आनंद पेडणेकर, प्रा. डॉ. जी. के. ढोकरट (प्राचार्य – बीपीसीए, शारीरिक शिक्षण महाविद्यालय), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, श्री समर्थ व्या. मंदिर व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष ऍड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय पातळीचे स्वप्न
या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून आगामी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.
किशोर गट – गटवारी
'अ' गट – धाराशिव, बीड, जालना; 'ब' गट – ठाणे, पालघर, जळगाव; 'क' गट – पुणे, रायगड, लातूर; 'ड' गट – सातारा, मुंबई उपनगर, हिंगोली; 'इ' गट – सांगली, नंदुरबार, सिंधुदुर्ग; 'फ' गट – नाशिक, रत्नागिरी, धुळे; 'ग' गट – सोलापूर, मुंबई, परभणी; 'ह' गट – छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड.
किशोरी गट – गटवारी
'अ' गट – सोलापूर, रायगड, नंदुरबार; 'ब' गट – धाराशिव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग; 'क' गट – सांगली, छत्रपती संभाजीनगर, लातूर; 'ड' गट – पुणे, पालघर, जळगाव; 'इ' गट – ठाणे, धुळे, परभणी; 'फ' गट – सातारा, मुंबई, हिंगोली; 'ग' गट – नाशिक, मुंबई उपनगर, बीड; 'ह' गट – रत्नागिरी, जालना, नांदेड
ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खो-खो खेळाडूंसाठी कौशल्य, आत्मविश्वास आणि भविष्यातील यशाचा भक्कम पाया ठरणार असून मुंबईतील क्रीडाप्रेमींना चार दिवस अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा