BREAKING NEWS
latest

दिव्यातील ओमकार नगर नाले परिसरात नवजात मुलगी आढळल्याने खळबळ..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२५ डिसेंबर : दिवा येथील ओमकार नगर परिसरातील नाल्यात आज सकाळी एक नवजात मुलगी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नाल्याजवळून जाणाऱ्या नागरिकांना जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता नाल्यात एक नवजात अर्भक असल्याचे दिसून आले.

ही बाब लक्षात येताच परिसरातील एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट नाल्यात उतरून त्या चिमुकलीला बाहेर काढले. नागरिकांच्या मदतीने तात्काळ बाळाला उपचारासाठी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सदर नवजात मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू आहेत.

या अमानुष कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नवजात बाळाला नाल्यात टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत