BREAKING NEWS
latest

ठाकरेंची साथ सोडणाऱ्या महिला नेत्याच्या गळ्यातच महापौर पदाची माळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२२ : मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाला आरक्षण जाहीर झालं आहे. यानंतर आता भाजपच्या काही महिला नगरसेवकांचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. ठाकरे गटाला केवळ ६५ जागांवर यश मिळालं. तर भाजपला ८९ जागांवर यश मिळालं. भाजप हा मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा मुंबईतील क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबईत २९  जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे मुंबई महायुतीला ११६  जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतसाठी ११४ जागांची आवश्यकता होती. पण महायुतीला त्यापेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. पण तरीही महापौर पदाच्या सोडत पर्यंत भाजप आणि शिवसेनेला धाकधूक होती. कारण महापौर पदाची सोडत ही एसटी प्रवर्गासाठी असती तर सत्ताधारी पक्षांचे त्या प्रवर्गातील उमेदवार जिंकून आलेले नाहीत. केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे एसटी प्रवर्गातील दोन उमेदवार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आणि ठाकरेंच्या शिलेदाराच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा रंगली होती.

यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या महिला नेत्याच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. खरंतर भाजपकडे तब्बल ४९ महिला नगरसेविका जिंकून आल्या आहेत. यापैकी अनेक महिला नगरसेवकांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. तसेच महापौर पदाची सोडत ही सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमधील राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शितल गंभीर, योगिता सुनील कोळी यांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत आहे. पण असं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेत एकेकाळी काम केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचंदेखील नाव मुंबईच्या महापौर पदासाठी चर्चेत आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या काही महिन्यांआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. पण त्यांचा फेब्रुवारी २०२४ मध्ये निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत. स्वत: तेजस्वी घोसाळकर या दुसऱ्यांदा महापालिकेत निवडून गेल्या आहेत. तसेच पतीच्या निधननंतर मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली होती.

तेजस्वी घोसाळकर हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला होता. पण काही दिवसांनी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं होतं. तेजस्वी घोसाळकर या दहीसर येथील वॉर्ड क्रमांक २ येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय अनुभव पाहता भाजपकडून त्यांची मुंबई महापालिकेच्या महापौर पदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. असं असलं तरी भाजप धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला तर वेगळ्याच चर्चेत नसलेल्या चेहऱ्यालाही महापौर पदाची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत