BREAKING NEWS
latest

मायभूमी ग्राम विकास संस्थेमार्फत शिवणे येथे वॉलनट स्कूल चे सुरक्षित-असुरक्षित स्पर्श जनजागृती सत्र..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवणे - 'मायभूमी ग्राम विकास संस्था' यांच्या पुढाकारातून वॉलनट स्कूलच्या सहकार्याने शिवणे येथे इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थ्यांसाठी “सुरक्षित व असुरक्षित स्पर्श” या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. बालसुरक्षेबाबत लहान वयातच जागरूकता निर्माण करणे आणि मुलांना स्वसंरक्षणाची मूलभूत कौशल्ये देणे हा मायभूमी ग्राम विकास संस्थेचा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.

या सत्राचे मार्गदर्शन मायभूमी ग्राम विकास संस्थेचे उपाध्यक्ष, प्रशिक्षक व बालहक्क कार्यकर्ते श्री. प्रमोद पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने चर्चा करत “माझे शरीर माझे आहे” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश प्रभावीपणे दिला. शरीरातील खाजगी अवयव कोणते, त्यांना कोणालाही स्पर्श करू द्यायचा नाही आणि आपणही कोणाच्या खाजगी अवयवाला स्पर्श करायचा नाही, हे त्यांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत स्पष्ट केले. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श आणि गोंधळात टाकणारा स्पर्श यातील फरक उदाहरणांसह समजावून सांगत मुलांना संभाव्य धोक्यांविषयी सजग राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांना अस्वस्थ किंवा धोकादायक परिस्थितीत “NO” म्हणणे, त्वरित त्या ठिकाणाहून दूर जाणे "GO" आणि विश्वासातील मोठ्या व्यक्तीला सांगणे "TELL" या तीन महत्त्वपूर्ण कृतींबाबत माहिती देण्यात आली. तसेच “सुरक्षित वर्तुळ” या संकल्पनेद्वारे मुलांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तींची ओळख करून देत मदत कशी घ्यायची याचे प्रशिक्षण देण्यात आले.

मायभूमी ग्राम विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे मुलांमध्ये बाललैंगिक अत्याचारासारख्या गंभीर घटनांविषयी आवश्यक जागरूकता निर्माण होत असून, सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श ओळखण्याची क्षमता वाढत आहे. या सत्रानंतर मुले घरी पालकांशी संवाद साधतील, ज्यामुळे पालकांनाही या विषयाचे गांभीर्य समजून कुटुंब पातळीवर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास चालना मिळेल. मुलं आणि पालक दोघांमध्येही विश्वास, संवाद आणि सजगता वाढवणे हे मायभूमी ग्राम विकास संस्थेचे मुख्य ध्येय आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष अस्मिता रेपे,  उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव संतोष रेपे, सदस्य अंकुश रेपे व काजल पाटील काम करत आहेत.

या सत्राला शाळेचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. मुख्याध्यापिका राजश्री व्यंकटेश, मुख्य प्रशासक श्वेता मोहोळ, उपमुख्याध्यापिका अमृता दशपूत्रे व शिक्षकवर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा जनजागृती कार्यक्रमांसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सत्र अधिक प्रभावी बनवले.

मायभूमी ग्राम विकास संस्था भविष्यातही बालसुरक्षा, बालहक्क आणि कुटुंब सक्षमीकरण या विषयांवर सातत्याने कार्य करत राहणार असून समाजात सुरक्षित आणि सशक्त बालपण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत