BREAKING NEWS
latest

पालिका अधिकाऱ्या महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप कॉलवर सेटलमेंटसाठी मागितले 'शरीरसुख'..

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका वरिष्ठ लिपिकाने चक्क महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पीडित महिलेने दाद मागूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत काही दिवसांपूर्वी वरिष्ठ लिपिक भूषण पाटील याचा वाद झाला होता. कामाच्या कारणावरून त्याने या महिलेला इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमानित केले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यावेळी हा वाद मिटवला, मात्र भूषण पाटील एवढ्यावरच थांबला नाही. त्याने या वादाचा सूड घेण्यासाठी एक वेगळीच चाल खेळली.

काही दिवसांनंतर भूषण पाटील याने पीडित महिलेला व्हॉट्सअऍप कॉल केला. तुझ्यासह आणखी एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असल्याचे सांगून त्याने तिला घाबरवले. दुसऱ्या कर्मचाऱ्याने माझ्याशी सेटलमेंट केली आहे, त्यामुळे त्याची कारवाई मी थांबवली आहे, असा दावा त्याने केला. यानंतर त्याने पीडित महिलेला विचारले की, तू मला काय देशील? मला तुझ्याकडून शरीरसुख हवे आहे, अशी थेट मागणी त्याने फोनवरून केली.

महापालिका प्रशासनाची धक्कादायक भूमिका

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने तातडीने आपल्या वरिष्ठांकडे धाव घेत घडलेली घटना सांगितली. मात्र, इतका गंभीर आरोप असूनही महापालिका प्रशासनाने भूषण पाटील याच्यावर कोणतीही तात्काळ कारवाई केली नाही. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून पीडित महिलेने अखेर मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलीसांनी या प्रकरणी भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

भूषण पाटीलचा वादग्रस्त इतिहास

विशेष म्हणजे भूषण पाटील हा अधिकारी यापूर्वीही वादात राहिला आहे. केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाच घेताना पकडण्यात आले होते, त्यावेळी भूषण पाटील यालाही अटक झाली होती. या प्रकरणामुळे तो जवळपास २ वर्षे निलंबित होता. इतका गंभीर इतिहास असतानाही त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले आणि आता त्याने महिला कर्मचाऱ्यासोबत असे गैरवर्तन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत