मुंबई : न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस
(BHMS) डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील (MMC) नोंदणी बंद ठेवण्याचा तातडीचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि सेंट्रल मार्ड (MARD) या डॉक्टरांच्या संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर सरकारने हा निर्णय जारी केला आहे. बीएचएमएस (BHMS) डॉक्टरांनी ३ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यात यावी, यासाठी मुंबईत मोठे आंदोलन केले होते. मात्र, होमिओपॅथी डॉक्टरांचा एमएमसी (MMC) मध्ये समावेश करण्यास ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी (IMA आणि मार्ड) जोरदार विरोध दर्शवल्याने वैद्यकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला होता.
वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती आणि वातावरण निवळेपर्यंत, तसेच नोंदणीची योग्य कार्यपद्धती निश्चित होईपर्यंत नोंदणी थांबवणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस (BHMS) डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करणे संयुक्तिक राहणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयाकडे लागले आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये बीएचएमएस (BHMS)डॉक्टरांच्या नोंदणीला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि मार्ड (MARD) ने आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता. यापूर्वी झालेल्या संपामुळे आरोग्य सेवेवर झालेला परिणाम लक्षात घेता, प्रशासनाने दोन्ही बाजू समजून घेऊन मध्यस्थीचा मार्ग अवलंबला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा