डोंबिवली : डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी स्कूलजवळील पुलाचा ९० फूट रस्त्याकडे उतरणारा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे रखडलेला आहे. त्यामुळे या पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर नागरिकांना करता येत नसून, परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे.
दिनांक २० ऑगस्ट रोजी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवक दिपेश पुंडलिक म्हात्रे आणि नगरसेविका खुशबू चौधरी यांनी या महत्त्वपूर्ण विषयावर आवाज उठवला. हा पूल डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, ९० फूट रस्त्याकडे जाणारा मार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तसेच त्यासंदर्भातील प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावून ९० फूट रस्त्याकडे उतरणाऱ्या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि नगरसेविका खुशबू चौधरी यांनी महासभेत केली.
या मागणीची दखल घेत महापौर आणि महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांची तातडीने बैठक घेऊन जमीन अधिग्रहणासह पुलाच्या कामातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
या पुलाचा ९० फूट रस्त्याकडे जाणारा मार्ग पूर्ण झाल्यास डोंबिवली पूर्व-पश्चिम वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी होऊन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा प्रश्न आता प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावा आणि नागरिकांना या पुलाचा पूर्ण लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा नगरसेवक दिपेश पुंडलिक म्हात्रे आणि नगरसेविका खुशबू चौधरी यांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा