BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर च्या स्पोर्ट्स पिकनिकचा धमाल आनंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विद्यार्थ्यांना घडवणारा शिल्पकार म्हणजे शिक्षक आणि त्यांची स्वप्न साकार करणारी संस्था म्हणजेच 'जे एम एफ' शिक्षण संस्था. दरवेळीच 'जे एम एफ' शिक्षण संस्था ही नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असते. असाच एक आगळा वेगळा उपक्रम 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी 'स्पोर्ट्स पिकनिक' चे आयोजन पनवेल येथील 'विसावा' रिसॉर्ट येथे केले. आनंद उत्साहाच्या भरात 'जन गण मन' इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर चे जवळपास पालक, विद्यार्थी शिक्षक मिळून १२०० च्या संख्येत उपलब्ध होते. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात 'स्पोर्ट्स पिकनिक' चे आयोजन करण्यात आले. 
निसर्गाच्या सान्निध्यात हरवून गेलेली सर्वच मुले, पालक ही बस मधून नाचत गात जातानाचा आनंद घेत होती. रिसॉर्ट वर पोहचल्यावर सर्वांनी येथेच्छ नाश्त्यावर ताव मारला, त्यानंतर जन गण मन विद्यामंदिर चे पालक, पाल्य आणि शिक्षक यांनी तरण तलावामध्ये खेळण्याचा आनंद लुटला व त्याचवेळी जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करून दाखवले. इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी योगा, झुम्बा, डांबल्स, पिरॅमिड, या आणि अशाप्रकारचे अनेक प्रदर्शने करून सर्वांची मने जिंकली. दोन तासाच्या अवधीनंतर जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेची मुले, पालक, शिक्षक तरण तलावा मधे जाऊन आनंद घेऊ लागली व जन गण मन विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा खेळ प्रात्यक्षिक प्रदर्शन दाखवून पालकांची मने जिंकली. झुंबा नृत्य करताना पालकांनी देखील समाविष्ट होऊन नृत्य करण्याचा आनंद घेतला. आनंददायी आणि उत्साही वातावरणामध्ये प्रेक्षकवर्ग व विद्यार्थी यांचा आनंद द्विगुणित होत येथेच्छ भोजनावर ताव मारून सर्वजण तृप्त झाले.
जादूचे प्रयोग हे स्पोर्ट्स पिकनिकचे विशेष आकर्षण होते. जादू म्हणजे स्वप्नवत जग. चुटकी वाजवून इच्छित प्राप्त व्हावे असे हे बालमन. जादूगार संदीप परदेशी यांनी विस्मयरित्या अनेक जादूचे प्रयोग करून मुलांना दाखवले, त्यातच जल्लोष करून मुले आणि पालक हरवून गेली. शिशु विहार मधील वैदिक आणि दिव्या या बालकांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन समाधानी झाले. आयुष्यामध्ये दुःखाची झालर असेल तरच त्या सुखाचा अर्थ व किंमत कळते, त्याचा आनंद घेता येतो असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले आणि आज सारी दुःख, विवंचना बाजूला ठेऊन आज जो आनंद तुम्ही लुटला तो पाहून मी कृतकृत्य झालो असे उद्गार काढले.
रोजची तारेवरची कसरत करणाऱ्या माझ्या भगिनींना आजची सुट्टी ना डबा, ना स्वयंपाक अशी मिळाली , मला खूप आनंद होतं आहे की तुम्ही सर्वांनी उत्साहाने सहभाग दर्शवून आपल्या मुलांबरोबर आपले बालपण जगलात, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी सर्व मुलांचे कौतुक करून त्यांना पदक, चषक,  प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी जातीने सर्व विद्यार्थी पालकांची काळजी घेऊन सहकार्य केले, त्याच बरोबर इयत्ता चौथी मधील विद्यार्थीनी हिया हीच्या वडिलांनी देखील मुलांना  मैदानावर योग्य पद्धतीने बसवून देण्याचे सहकार्य केले. मुख्याध्यापक ज्योति व्यंकट रामन, श्री. आमोद वैद्य, उप-मुख्याध्यापिका ममता राय, तेजावती कोटियन, शिशु विहार उप-मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर सर्व  शिक्षक, कलात्मक शिक्षक सौ.श्रेया कुलकर्णी, सौ.कविता गुप्ता, दीपा तांबे, अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, रमेश वगे, सौ.वैशाली शिंदे, दिपाली सोलकर यांनी मुलांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले. सर्व पालक वर्गानी आयोजित केलेल्या एक दिवसीय सहलीचे भरभरून वर्णन केले. सर्वांचे आवडीचे आइस्क्रीम खाऊन आनंदाने सर्व विद्यार्थी, पालक वर्ग परतीच्या प्रवासाला निघाला.

महायुतीचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण हे सलग चौथ्यांदा जिंकत भाजपाला डोंबिवलीचा गड राखण्यात यश प्राप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
    
डोंबिवली : विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे सलग चौथ्यांदा जिंकले. डोंबिवली विधानसभा मतदार संघ हा भाजपाचा बाल्लेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा जिंकले. 

राज्य निवडणूक आयोगाकडून उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवार रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, डोंबिवली मतदार संघाचा विजय हा विचारधारेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन महिन्यात प्रचंड मेहनत केली. मी नेहमीच सांगतो हे शहर महायुतीचा बालेकिल्ला राहिला असून हे चौथ्यांदा सिद्ध झालं आहे. गेली चाळीस वर्ष जनसंघाने हा बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. मी मतदारांचे खूप खूप आभार मानतो. खरं तर महायुतीचे सगळे कार्यकर्ते पेटून कामाला लागले होते. हा निर्णयाचा कौल  मतदारांनी दिला आहे असे ते म्हणाले.

महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना १२३८१५ मते मिळाली तर त्याचें प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी शिवसेना (उबाठा) चे उमेदवार दीपेश म्हात्रे यांना ४६७०९ मिळून रवींद्र चव्हाण यांनी ७७१०६ मतांची आघाडी घेत त्यांचा विजय निश्चित झाला.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी मतमोजणी केंद्रांवर माध्यम कक्षाची सुविधा उपलब्ध..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता शनिवार,दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. याकरिता मतमोजणी केंद्रांवर वृत्त संकलन करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रादेशिक व जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींना हिरव्या रंगाचे प्राधिकारपत्र देण्यात आले आहे, अशाच माध्यमांच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
     
माध्यम कक्षात माध्यम प्रतिनिधींना संपर्क करण्यासाठी इंटरनेट, संगणक, टिव्हीची व चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना माध्यम कक्षापर्यंतच आपला मोबाईल वापरता येईल.
     
मतमोजणी केंद्राच्या दारावरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या जागेवरूनच स्टील कॅमेरा किंवा मुव्हीज कॅमरा वापरता येईल. कोणतेही आक्षेपार्ह चित्रण करता येणार नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी कक्षाच्या आतमध्ये मोबाईल घेवून जाण्यास परवानगी असणार नाही. याठिकाणी माध्यम कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत मर्यादित माध्यमांच्या प्रतिनिधींचा गट करुन पाहणी करता येईल. माध्यम कक्षातून फेरीनिहाय माहिती, परवानगी मिळालेले छायाचित्र माध्यम कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसिध्दीसाठी देण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक विभाग व एकत्रित माध्यम कक्षाने कळविले आहे.

उद्या कळणार मतदारांचा कौल कुणाकडे ते महायुती की महाविकास आघाडीकडे..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी परवा (दि. २०) राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान सुरळीत पार पडले. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तेच्या पटावर कोण बाजी मारते याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहीले आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये पार पडलेल्या मतदानात जनता काय कौल देते हे उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळपासून राज्यभर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संध्याकाळ पर्यंत राज्यात महायुती सत्तेत येणार की महाविकास आघाडी हे चित्र स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला असून मागच्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या उघड होणार आहे.

मुंबईत ३६ मतदारसंघासाठी ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी साठी २७०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संयंत्रे संबंधित मतदारसंघांच्या स्ट्रॉंग रूममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकूण ३६ स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) व स्थानिक पोलीस तैनात आहेत. हे सर्व स्ट्रॉंग रूम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत. उद्या मुंबईतील मतमोजणी केंद्रापासून ३०० मीटरपर्यंत गर्दी करण्यास बंदी घातली आहे.

डोंबिवलीत १६ टक्क्यांनी वाढलेल्या २७ हजार नवमतदारांचे झुकते माप कुणाच्या पारड्यात ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीमध्ये अनेक वर्षे मतदानाचा टक्का हा वाढता वाढत नव्हता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच तो १६ टक्क्यांनी वाढून ५६.१९ टक्के एवढा झाला. २०१९ मध्ये येथे ४०.७६ टक्के मतदान झाले होते.

यंदाच्या लोकसभेला ५१.६६ टक्के मतदान झाले होते, म्हणजे विधानसभेला त्यात पाच टक्के वाढ झाली. १६ टक्के वाढीव मतदान मंत्री रवींद्र चव्हाण की दीपेश म्हात्रेच्या पारड्यात हे उद्या शनिवारी स्पष्ट होईल. २७ हजार नवमतदारांचे झुकते माप कुणाच्या पारड्यात हेही मतदान यंत्रात बंद झाले आहे.

१ लाख ७५ हजार ९४० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

डोंबिवलीत एकंदरीत तीन लाख १३ हजार १२२ मतदारांपैकी एकूण एक लाख ७५ हजार ९४० एवढे मतदान झाले. त्यामध्ये ९१,८५८ पुरुष आणि ८४,०८८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

२०१९ मध्ये १,४५,१३८ एवढे मतदान झाले होते, त्यावेळी चव्हाण यांचा ४२ हजार मतांनी विजय झाला होता, त्यांनी मनसेमध्ये असलेले मंदार हळबे यांचा पराभव केला होता.

मतमोजणी साठी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शासकीय यंत्रणा सज्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. मतमोजणीची रंगीत तालीम शुक्रवारी दुपारी २ वाजता येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे होणार आहे.

मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी १५० अधिकारी, कर्मचारी तसेच १५० पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी १९ टेबल्सवर होणार असून, मतमोजणीच्या एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशिन्स सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या तळमजल्यावरील स्ट्राँगरूम मध्ये केंद्रीय निवडणूक निरीक्षक व निवडणूक प्रतिनिधी यांच्यासमक्ष सीलबंद करण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रूमच्या भोवती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह केंद्रीय निमलष्करी दल, राज्य राखीव दल आणि राज्य पोलिस अधिकारी असा २४ तास त्रिस्तरीय पहारा तैनात करण्यात आला आहे.

कल्याण गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांना विनापरवाना दोन देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुसं कब्जात बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आले यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे पोशि. मिथुन राठोड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत दि. १८/११/२०२४ रोजी विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील बावनचाळ, रेल्वे मैदान डोंबिवली पश्चिम येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बावनचाळ, गणेश मंदिर जवळ जावून सापळा लावून इसम नामे सुधीर रामनिवास ठाकुर (वय: २२ वर्षे) राहणार. नगला जगमोहन गाव, तहसिल-फतेहाबाद, जिल्हा आग्रा, राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेवुन त्याच्या  कब्जातुन ९०,०००/- रूपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल व ४०००/- रूपये किंमतीचे ०४ जिवंत काडतुस असा एकूण  ९४,०००/- रूपये किंमतीचे ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवत काडतुसे विनापरवाना बेकायदेशिर रित्या स्वतःच्या कब्जात बाळगलेला असताना सापडल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले होते.
त्यानंतर इसम नामे सुधीर रामनिवास ठाकुर याच्या कब्जात विनापरवाना बेकायदेशिर रित्या ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिंवत काडतुसे मिळून आल्याने त्याने मा. पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांचेकडील मनाई आदेशाचा भंग केल्याने त्याचे विरुद्ध पोशि. मिथुन राठोड नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी विष्णुनगर पोलीस ठाणे, डोंबिवली पश्चिम येथे भारतीय शस्त्र कायदा कलम ३,२५ व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास गुन्हे शाखा, घटक-३. कल्याण कडून करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा.आशुतोष डुंबरे साो, पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, व मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि. संतोष उगलमुगले, पोउपनि. विनोद पाटील, पोलीस अंमलदार अनुप कामत, किशोर पाटील, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विलास कडु सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.