BREAKING NEWS
latest

जगप्रसिद्ध तबलाकर झाकीर हुसैन यांचं निधन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

सॅन फ्रॅंसिस्को -  सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं हृदयविकाराच्या आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. झाकीर हुसैन यांना सॅन फ्रॅंसिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं. मात्र उपचारादरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं. झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत जशी असते अगदी तसंच होतं. वडील अल्लारखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबलावादनाचे धडे गिरवले होते. मात्र याच अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झालं आहे.
कोण होते झाकीर हुसैन ?

झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लारखा खान यांचे पुत्र होते. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. 'साझ' या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लारखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली. तसेच वयाच्या १२ व्या वर्षापासून झाकीर हुसैन यांनी देशभरात तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती.

झाकीर हुसैन यांचा अनेक पुरस्काराने गौरव

१९८८ मध्ये झाकीर हुसैन यांना पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच १९९० मध्ये त्यांना 'संगीत नाटक अकादमी'चा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तबला त्यांच्या नसनसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

प्रवासा दरम्यान गहाळ झालेली सोन्याचे दागिने असलेली पर्स टिळकनगर पोलीसांनी केली परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
डोंबिवली - लग्नसराई सुरू असल्याने मुंबईत एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी दिनांक १३ रोजी कर्नाटक वरून दांपत्य आले होते. नागराज कर्केरा आणि भारती कर्केरा असे त्या दाम्पत्याचे नाव असून त्यांनी घाटकोपर ते डोंबिवली असा रिक्षाने प्रवास केला असता ते डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत उतरले. उतरल्यानंतर भारती कर्केरा यांनी 
आपली पर्स रिक्षात विसरली असून पर्समध्ये सोन्याचा नेकलेस ५६ ग्रॅम, सोन्याची चैन ३६ ग्रॅम, सोन्याच्या बांगडया ५६ ग्रॅम, सोन्याच्या दोन अंगठया २० ग्रॅम, कानातील रिंग ५ ग्रॅम असा एकुण १७३ ग्रॅम सोने किंमत रुपये १२,९५,५००/- व रोख रक्कम ५०० रुपये असा १२,९६,०००/- रुपयांचा ऐवज गहाळ झाला आहे. रिक्षात पर्स गहाळ झालेल्याची तक्रार डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्यामध्ये प्रॉपर्टी मिसींग क्रमांक ५३१/२०२४ दिनांक १३/१२/२०२४ दाखल झाल्यानंतर यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांना कळवण्यात आले. 
विजयकुमार कदम यांनी आपल्या पोलीस ठाण्यामधील तपास यंत्रणा राबवून ते स्वतः या तक्रारीच्या अनुषंगाने तपास अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक चौगुले, पोलीस हवालदार कांबळे, पिंजारी, पगारे , पोलीस शिपाई राठोड, मुंडे सोबत सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक यंत्रणाद्वारे व कौशल्याने आपल्या वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली त्या रिक्षाच्या शोध घेतला. रिक्षा क्रमांक एमएच ४३ बीआर ९४४६ चा चालक कमल जयस्वाल असे त्या रिक्षा चालकाचे नाव असून त्या रिक्षा चालकाला ऐरोली चिंचपाडा या ठिकाणाहुन ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी व विश्वासात घेऊन ती बॅग हस्तगत करून नागराज कर्केरा आणि  भारती कर्केरा यांना सोपवण्यात आली.
सदर तपासाची उत्तम कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री.संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ कल्याण श्री.अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली श्री.सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि त्यांच्या  पथकाने केली आहे व सदरचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत केला आहे.

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी: अवधुत सावंत

परभणी - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दीले आहे. या संविधानाची शपथ घेऊन मंत्री लोकप्रतिनिधींना पद ग्रहण करावे लागते. संविधानानुसार देश चालतो. ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी या देशातून चालते व्हावे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनास्थळाची पाहणी ना.रामदास आठवले यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परभणीतील संविधान अवमान प्रकरणाची  माहिती घेतली. 

यावेळी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची सर्व चौकशी करण्याची सर्व आंबेडकरी समाजाची मागणी आहे त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची ही आरोपीची नार्को चाचणी करण्याची मागणी  आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी मागे कोण सुत्रधार आहे ? कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी स्थानिक पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. त्यांना जमत नसेल तर  या प्रकरणी क्राईम ब्रांचने चौकशी करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.

१० डिसेंबर रोजी संविधान अवामनाचा प्रकार परभणीत घडल्यानंतर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त निषेध  आंदोलन परभणीत केले. संविधान अवमान प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यानंतर निषेध आंदोलनात आंबेडकरी जनतेने कुणाचेही मोठे नुकसान केलेले नाही. तुरळक ठिकाणी केवळ २  गाड्यांच्या काचा आणि काही दुकानाच्या नाम फलकाचे नुकसान झाले आहे. या आंदोलनात विद्यार्थी महिला आणि निर्दोष कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवू नयेत. ज्या पोलीसांनी महिला आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अतीप्रमाणात मारहाण केली आहे, वस्तीमधील पार्किंग मधील गड्याफोडल्या आहेत. त्या पोलीसांची ही चौकशी व्हावी. काही समाजकंटक यांनी पोलीसांसोबत आंबेडकरी आंदोलकांवर हल्ले केले आहेत त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

अटक ४२ आंदोलकांपैकी १० जणांना जामीन मिळाला आहे पोलीस कोंबिंग ऑपरेशन करणार नाहीत निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार नाहीत असे शांतता कमिटीत ठरले असल्याची माहिती पोलीसांनी आपल्याला दिल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. याप्रकरणी आपण दिल्लीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. परभणीत कोंबिंग ऑपरेशन करू नये आणि निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत याबाबत आपण मागणी केल्याची ना. रामदास आठवले यांनी आज परभणीत पत्रकारांना सांगितले.

डोंबिवली जिमखाना येथे २१ ते २९ डिसेंम्बर रोजी होणाऱ्या 'उत्सव २०२४' साठी पत्रकार परिषद संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१५ - डोंबिवली जिमखाना हा केवळ क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठीच नव्हे, तर डोंबिवलीतील सांस्कृतिक परंपरेच्या जतनासाठी देखील ओळखला जातो. आधुनिक सुविधांसह परिपूर्ण असलेल्या जिमखान्याने नेहमीच आपल्या कार्यक्रमांद्वारे उच्च दर्जा राखला आहे. जिमखान्याचे नाव अनेक क्रीडापटूंनी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उज्वल केलेले आहे. डोंबिवली मधील विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात प्रशिक्षणाची सोय, तसेच क्रिकेट सारख्या खेळात गुणवैशिष्ट्य असलेल्या होतकरू व गरजू मुलांसाठी विशेष दरात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केलेली आहे. डोंबिवली जिमखान्याचे देशभरातील ४९ जिमखान्यांशी ऍफिलीएशन आहेत. भ्रमंती करणारे अनेक सदस्य याचा लाभ घेत असतात. डोंबिवली जिमखाना आपल्या डोंबिवली शहराचे एक प्रतिष्ठित सांस्कृतिक व क्रीडा केंद्र आहे. गेली अनेक दशके जिमखान्याने आपल्या कार्यक्रमांद्वारे समाजातील विविध स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. याचे प्रथम श्रेय आमच्या सर्व संस्थापक सदस्यांना जाते असे अध्यक्ष दिलीप भोईर म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही, डोंबिवली जिमखाना उत्सव २०२४ मोठ्या उत्साहाने आणि आनंदाच्या वातावरणात आयोजित केला जात आहे. डोंबिवली जिमखाना उत्सव हा फक्त मनोरंजनाचा नाही तर स्थानिक कलेचे आणि परंपरेचे दर्शन घडवणारा एक मंच आहे. हा उत्सव नवोदित कलाकारांसाठी संधी देत असतानाच, ग्राहकांसाठी एक मौजमजा लुटण्याचा अविस्मरणीय अनुभव देतो. उत्सव चे हे २७ वे वर्ष असून १९९७ साली उत्सवला सुरुवात झाली. उत्सव बद्दल सांगायची विशेष गोष्ट म्हणजे उत्सवचे आयोजन हे डोंबिवली जिमखान्याचे सभासद पूर्णतः स्वेच्छेने करत असतात आणि घरच्या कार्यासारखे आनंदाने पार पाडतात. गेल्या वर्षी प्रमाणेच उत्सवचे ६०% स्टॉल्स तीन महिन्यापूर्वीच आरक्षित झाले होते आता सर्व स्टॉल हाउसफुल झाले आहेत. यावर्षी शनिवार २१ डिसेंबर ते रविवार २९ डिसेंबर पर्यंत 'उत्सव २०२४' संपन्न होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे आमदार मा. श्री रवींद्र चव्हाण, खासदार मा.श्री डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मा.श्री. राजेश मोरे तसेच 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक मा. समीर कर्वे अशी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे उत्सवच्या यशाला प्रायोजक डॉ. श्रीमंत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवलीकर, महाराष्ट्र टाईम्स, झी मराठी आणि पितांबरी यांचा हातभार लागणार आहे. उत्सव मध्ये नेहमीप्रमाणे गृह उपयोगी वस्तु, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, शैक्षणिक उत्पादने, परिधान, दागिने, कला वस्तू, खाद्यपदार्थ, नाविन्यपूर्ण उत्पादने, पुस्तके, बँका, आर्थिक गुंतवणूक, सामाजिक संस्था, पोलीस सायबर सिक्युरिटी अशा विविधरंगी उत्पादनांचे आणि सेवांचे दर्शन घडणार आहे.

उत्सव मध्ये मनसोक्त फिरल्यानंतर उपलब्ध असणारे मनोरंजक खेळ आणि खानपान व्यवस्था ही लहान व थोरांसाठी आनंदाची सफरच असते आणि अशा प्रकारे उत्सव "सर्वांसाठी सर्वकाही" हे ब्रीदवाक्य नेहमीच सार्थकी लावत असतो. उत्सव मध्ये विविध आवडत्या मालिकेतील 'झी मराठी'चे कलाकार आपल्या भेटीसाठी २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर या दिवसांमध्ये येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांस एक लाख 'फ्री पास' देण्यात येणार आहेत. त्याचा वापर विद्यार्थी आनंदाने घेतात व उत्सवमध्ये सहभागी होतात. तसेच दरवर्षी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा उत्सवमध्ये क्रीडापुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाते. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून काही गरजूंना व संस्थांना विशेष सवलतीत स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट स्टॉल, उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट चवीचा पदार्थ असलेला स्टॉल, तसेच नीटनेटकेपणा व स्वच्छता याचा विचार करून काही स्टॉल धारकांना पारितोषिके दिली जातात.

उत्सवचा समारोप समारंभ रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होईल. या समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, आमदार मा. श्री रवींद्र चव्हाण खासदार मा. श्री डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मा.श्री. राजेश मोरे तसेच क.डों.म.पा.च्या आयुक्त मा. डॉ.सौ इंदुराणी जाखड तसेच पितांबरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र प्रभुदेसाई असे मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
ह्या कार्यक्रमात दरवर्षी आनंदाने व उत्साहाने महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, एम एस ई बी, फायर अधिकारी, पोलीस, ट्रॅफिक, अनेक संस्थां सहभागी होऊन उत्सव मध्ये ते आपली जबाबदारी पार पाडतात. याकरिता डोंबिवली जिमखानाची कार्यकारी समिती या सर्वांची ऋणी आहे. तसेच आपलेही सहकार्य महत्त्वाचे असून आपण सर्वांनी उत्सवाच्या यशासाठी कायमच साथ दिली आहे आणि यापुढेही सकारात्मक प्रचारासाठी सहकार्य करावे अशी विनंती मा. सचिव पर्णाद मोकाशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना केली. यावेळी व्यासपीठावर जिमखाना चे अध्यक्ष श्री. दिलीप भोईर, सचिव श्री. पर्णाद मोकाशी, खजिनदार श्री. आनंद डिचोलकर, सह सचिव श्री. सलील जोशी, कार्यकारी समिती सभासद श्री. रवींद्र मोकाशी व प्रशासनाच्या सौ.सुवर्णा वाघ हे पदाधिकारी उपस्थित होते.

तूर्तास तरी कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाचा प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या, रेल्वेगाड्या आणि स्थानकाची संख्या वाढली. मात्र कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्याने, कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. प्रवाशांचा प्रवास अवेळी होत असल्याने, त्यांच्यातून नाराजीचा सूर कायम उमटत असतो. यासाठी कोकण रेल्वेवर दुहेरीकरण करण्याची चर्चा होत होती. परंतु, कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकणवासीयांचे वाढीव रेल्वेगाड्या, थांब्यांचे स्वप्न सध्यातरी स्वप्नच राहणार आहे.

भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते. तसेच नुकताच कर्नाटक राज्यातील काही खासदार एकत्र येऊन त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, या विषयाबाबत चर्चा केली. परंतु, अद्याप ठोस असा निर्णय झाला नाही. तर, दुसरीकडे कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी नुकताच माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नातून धक्कादायक उत्तरे मिळाली आहेत. महापदी यांनी १२ नोव्हेंबर २०२४ कोकण रेल्वेचे दुहेरीकरणाबाबत माहिती विचारली. त्यानुसार दुहेरीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. फक्त कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात रोहा ते वीर ४६.८ किमी. पर्यंत रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. तर, अन्य भागात टप्पा दुहेरीकरण किंवा पूर्ण दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, असे दोन वेळा रेल्वेकडून स्पष्ट केले गेले आहे.

संपूर्ण देशभरातील रेल्वेचे दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण केले जात आहे. मात्र कोकण रेल्वेचा दुहेरीकरण करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर अशा ७४० किमी. अंतरापर्यंत पसरलेला आहे. मात्र रोहा ते वीर मार्ग वगळता अन्यत्र दुहेरीकरणाची कामे झाली नाहीत. परिणामी, कोकण रेल्वेची वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. मुंबईस्थित कोकणवासियांचे कोकणात जाताना प्रचंड हाल होतात. तर, उशिरा रेल्वेगाड्या धावणे, जादा रेल्वेगाड्या नसणे, मर्यादित स्थानकांना थांबा असणे, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. तसेच, कोकणातील अनेक गावांचा विकास करण्यासाठी अतिरिक्त स्थानके उभारण्याची मागणी आहे. याबाबत महापदी यांनी विचारले असता, अतिरिक्त स्थानके उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून उत्तर देण्यात आले.

महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या प्रस्तावनुसार 'त्या' लाडक्या बहिणींवर होणार गुन्हा दाखल ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे : महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारतर्फे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या योजनेत २ कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ घेतला आहेत. मात्र, यातील ३०-३५ लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहेत. या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

लाडकी बहीण योजने अतर्गत सर्वसमावेशक पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास (डब्लू सी डी) विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी करतील, लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील. "ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल, पण खोटी माहिती देऊन लाभ घेतला जात असेल तर अशांवर एफआयआर दाखल करण्याचा प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाने दिला आहे. ही पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येईल. जिल्हा आणि विभागीय स्तरावर पडताळणी केली जाईल," असे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, विभागाला फसव्या लाभार्थींबाबत २०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यानंतर राज्यात मंजूर झालेल्या एकूण २.५ कोटी अर्जापैकी (१% )२.५ लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यापक पडताळणीसाठी दोन ते तीन महिने लागतील अशी अपेक्षा आहे. पडताळणी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे हे आहे. एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जाची पडताळणी करायची याची स्पष्ट कल्पना येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

लाडक्या बहिण योजनेसाठी वेगळा सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता, बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबरमधील रक्कमेचे वितरण होईल, महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांनी सूचना देणे आवश्यक आहे. या सूचनांनंतर 'जीआर' जारी केला जाईल, "वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारीपासून वितरित केली जाईल की नाही याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, त्यानंतर एक 'जीआर जारी' केला जाईल. शिवाय, हिवाळी अधिवेशनात एक पूरक बजेट जारी करावे लागेल.

लाडकी बहिण'ची पडताळणी कशी होणार ?

लाडकी बहिण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा भर आहे. या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार ? ते जाणून घेऊया.

उत्पन्नाचा दाखला
अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख असणे आवश्यक आहे. त्याची माहिती देणारे कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे.

आयकर प्रमाणपत्र
लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा, अशी अट आहे. त्यामुळे त्याची छाननी केलेली जाईल.

सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन
जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चारचाकी वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेती
पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा
एका कुटुंबातील फक्त २ महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.