BREAKING NEWS
latest

रात्री बिनकामाचे मोकाट फिरणाऱ्यांना काढाव्या लागतील उठा बश्या - पोलीस उपायुक्त अतुल झेंडे..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
कल्याण : गेल्या काही दिवसापासून ठाणे शहर  पोलीस विभाग ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण वाढती गुन्हेगारी व नवीन वर्ष साजरा करण्यासाठी लोकं बाहेर पडत असून काही अनुचित घटना घडून अतिप्रसंग घडू नयेत यासाठी पोलीसांतर्फे  कल्याण-डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उशिरा रात्री बिनकामाने मोकाट फिरणारे तसेच नशेखोर यांना लगाम घालण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कंबर कसली आहे. 
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी रात्री शंभर फुटी रोड  कोळसेवाडी, डोंबिवली, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिनकामाने फिरणारे नशेखोर यांच्यावर पोलीस उपायुक्तांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमध्ये रात्री उशिरा बिनकामाने फिरणारे आणि नशेखोर यांना पोलीस ठाण्यात नेऊन शंभर उठा बश्या काढून सोडण्यात आले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सध्या पोलीस विभाग ऍक्शन मोड वर असल्याने महिला वर्गांनी या कारवाईचे स्वागत आणि प्रशंसा केली आहे.

भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष माजी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा करत पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेच असतील असे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले आहे. बावनकुळे यांनी प्रदेश संघटनपर्व समिती नेमली असून तीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या संघटनात्मक बांधणी नियोजनाची जबाबदारी यानिमित्ताने चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात २१ डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले आहे. या पर्वाची सुरुवात नागपूर येथून कऱण्यात आली.

दुसरी समिती प्रदेश अनुशासन समिती नेमली असून तीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा.अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांना सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

तिसरी समिती प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची म्हणून नेमली आहे. अभियानाचे प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) तथा बीड येथील प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जारी केली.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

बीड : सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आज अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यांच्या या कृतीवर प्राजक्ता माळीने आक्षेप घेतल्याची माहिती आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा उल्लेख केला. प्राजक्ता माळी हिच्यासोबत सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना याचंही नाव सुरेश धस यांनी घेत टीका केली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना करुणा मुंडे यांनी देखील प्राजक्ता माळी यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर प्राजक्ता माळी हिला सातत्याने ट्रोल केलं जात होतं. प्राजक्ता माळी ही सर्वसामान्य मराठी कुटुंबातून अथक परिश्रम घेऊन पुढे आलेली मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिला सोशल मीडियावरुन सातत्याने ट्रोल केलं जात होतं. विशेष म्हणजे आज भाजप आमदार सुरेश धस यांनी तिचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल प्राजक्ता माळी हिने घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरशे धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्या आगामी काळात अडचणी वाढतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाबाबत वेगवेगळे आणि धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी आज बीडच्या एसपींची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अनेक खळबळजक दावे केले. त्यांनी आज परळीत इव्हेंट मॅनेजमेंट कशापद्धतीने होतो याचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचं नाव घेतलं होतं. सुरेश धस यांनी केलेल्या या कृतीवर प्राजक्ता माळी हिने आक्षेप घेतला आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले ?

“आकाची इथं १०० एकर जमीन आहे, तिकडे जमीन आहे, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही त्यांचे सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा”, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता.

ग्रामीण भागांनाही जोडत सुरू होणार कल्याण ते तळोजा मेट्रो..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहेत. शहरांत मेट्रोचे काम वेगाने होत आहेत. मेट्रोमुळं प्रवासाचा वेळ तर वाचतो पण इंधनाचीही बचत होते. एमएमआरडीए ने आता ऑरेंज मेट्रो लाईन १२ चे काम हाती घेतले आहे. या मेट्रोचे काम ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून कल्याण आणि तळोजा अशी दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. एकूण २३,७५६  किमीचा कॉरिडोर असणार आहे. 

एमएमआरडीए ने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो लाईन १२ ला दोन इंटरचेंज असणार आहेत. एक मुंबई मेट्रो लाईन ५ वरील कल्याण एपीएमसी आणि दुसरा नवी मुंबई मेट्रो लाईन १ वरील अमनदूत (तळोजा) येथे कनेक्ट होणार आहे. या मेट्रोमुळे कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होईल आणि प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येणार आहे. 

मेट्रो मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वडवली स्टेशनशी जोडलेल्या निळजे गाव येथे डेपो तयार करण्यात येत आहे. जेणेकरुन येथे मोठ्या दुरुस्ती, किरकोळ दुरुस्ती, अवजड उपकरणे बदलणे आणि चाचण्या करता येणार आहे. हे डेपो ३०.१२ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणार आहे. सहा-कार गाड्यांच्या २४ रेकसाठी १२ स्टॅबलिंग लाईन, भविष्यासाठी नियोजित अतिरिक्त ३ सह तीन तपासणी/देखभाल लाईन आणि चार वर्कशॉप लाईन्सचा समावेश असेल. डेपो आणि संबंधित कामांसाठी एमएमआरडीएने ५७ हेक्टर सरकारी जमीन संपादित केली आहे.

ही असतील स्थानके..

कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली(खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा, या स्थानकांचा समावेश असणार आहे.

भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड डाॅ.मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : भारताचे १४ वे  पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते. 

माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांचा जन्म दि.२६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ.सिंग यांनी सन १९४८ साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. सन १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर सन १९६२ साली डॉ.सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केले. त्यांचे इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे. सर्व सामान्यांचे मत आहे की, असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय- डाॅ.मनमोहन सिंह यांनी सन १९९१मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. डाॅ.मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं. डाॅ.मनमोहन सिंह यांनी देशाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ.मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. डॉ.मनमोहन सिंग यांनी भारताचे १४वे पंतप्रधान होते. डॉ.मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे.
        
डॉ.मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी  युएनसीटीएडी सचिवालयात काही काळ काम केले. यानंतर सन १९८७ आणि १९९० या काळात त्यांची जीनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉ. मनमोहन सिंग यांनी सन १९७१ साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर सन १९७२ साली डॉ.मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी अर्थमंत्रालयात अनेक महत्वाची पदे भूषवली. यात अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद,रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद या पदांचा समावेश होता. यानंतर सन १९९१-१९९६ या पाच वर्षांच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते. हा काळ स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो.डॉ.मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले धोरण तयार केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. डॉ.मनमोहन सिंग यांना सन १९८७ या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण मिळाला. त्यानंतर भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान- १९९५, अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड- १९९३ आणि १९९४, केम्ब्रिज विद्यापीठाचा अ‍ॅडम स्मिथ पुरस्कार- १९५६, केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार, असे काही विशेष पुरस्कार मिळाले. याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बूनसारख्या अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉ.मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सन १९९३मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. डाॅ.मनमोहन सिंह यांनी सन २००४ ते २००९ असे दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.
      
भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांचं दि.२६ डिसेंबर, गुरुवारी निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरात शोककळा पसरली आणि राजकीय वर्तुळात सात दिवसांचा दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ.मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मांत त्यांना प्रचंड रस होता. डाॅ.मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली.
!! भारताचे महान नेते डाॅ.मनमोहन सिंग यांच्या पावन चरणी सप्ताहभर ही श्रद्धासुमने समर्पित !!

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये सांताक्लॉजच्या सहवासात नाताळ सण आनंदात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : सर्व मुलांचा आवडता आणि आनंद देणारा सण म्हणजे नाताळ. शाळेला दहा दिवसांची सुट्टी आणि त्यातच कल्पना विश्वात रममाण होऊन सांताक्लॉज भेटीला येऊन काहीतरी भेटवस्तू मिळणार हे निरागस मन. 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर शाळेने जल्लोषात नाताळ सण साजरा केला. सर्व मुली लाल रंगाचे पोशाख परिधान करून आले होते. जणू काही ब्रह्मा रंगतालयात लाल पऱ्या अवतरल्या आहेत असे वातावरण होते. तर सर्व मुले सांताक्लॉज च्या वेषात आले होते. 'जिंगल बेल्स' च्या संगीतावर सर्वच जण थिरकत होते.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर पदाधिकारी यांनी येशू ख्रिस्ताच्या प्रतिमे पुढे मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले, त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्ताचे प्रार्थना गायन केले. सर्व मुलांनी नाताळच्या विविध वस्तू स्वतः हाताने बनवून आणून शाळा सजवली होती. हस्तकला शिक्षिका सपना येंनंम व दीपा तांबे यांनी सुबकपणे ख्रिसमस ट्री, स्नो मॅन अशा बऱ्याच हस्तकला वस्तू मुलांना शिकवून त्यांच्या कडून तयार करून घेतल्या. लोकांनी केलेली अवहेलना सहन करून देखील , जगाला शांततेचा मार्ग दाखविणारा एक अमर आत्मा म्हणजे येशू ख्रिस्त. स्वतःच्या हृदयात शांतता आणि दयेची ज्योत तेवत ठेऊन जगाला जो उपदेश येशू ख्रिस्ताने केला आहे अशा सामर्थ्याला जगी तोड नाही,असे उदगार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले. तर सर्वांगाला खिळे ठोकत असतानाही 'हे ईश्वरा या लोकांना माफ कर' असे म्हणणारा साक्षात येशू म्हणजे ईश्वराचाच अंश आहे आणि त्यांनी केलेल्या उपदेशाचे आपण पालन करणे म्हणजेच येशूच्या जन्म दिवसाची येशूला दिलेली सर्वोत्तम भेट आहे, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
सकाळी नऊ ते अकराच्या वेळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यामधे अनेक उत्साही पालकांनी नृत्य, गिटार वादन सादर केले. सर्व पालकांना संस्थापक व सचिव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व चषक देण्यात आले. सांताक्लॉज चे आगमन होताच सर्व मुलांनी एकच जल्लोष केला व भेटण्यासाठी सर्व मुलांनी सांताक्लॉज भोवती गराडा घातला, तर सांताक्लॉज ने देखील सर्वांना आलिंगन देऊन चॉकलेट, केक, बिस्कीट, आणि अनेक भेटवस्तू त्याच्या पोटलीतून काढून वाटल्या. केक कापून सर्वांनी नाताळ सण साजरा केला, व जल्लोषात बेभान होऊन नाचू लागले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवी मधील संयुक्ता व आयुशी या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन आरोही हिंगमिरे ने केले व आनंदाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहे. जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतीमधील ४३ गावांत ४ हजार ५२३ लोकांना त्यांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २७ डिसेंबर, रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  ५० लाख मालमत्ता प्रॉपर्टीचे आभासी वितरण करणार असून, यावेळी लाभार्थ्यांना ते प्रॉपर्टी कार्डच्या उपयुक्ततेसंदर्भात संबोधित करणार आहेत. या  दरम्यान गाव स्तरावर सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. 
          
जिल्हा परिषदेनेही प्राथमिक स्वरुपात ३९ ग्रामपंचायतींमध्ये या कार्यक्रमानंतर संबंधित गावांत कार्डवाटप व मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) प्रमोद काळे यांनी दिली.
         
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व योजनेची अंबलबजावणी करण्यात येते आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकतधारकाला मालमता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध करून देताना संबंधित मिळकृती धारकाला 'दस्तेवजाचा हक्क' प्रदान करत आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत ३.१७ लाख गावांमधून ड्रोन सर्वे पूर्ण करण्यात आलेले असून १.१९ लाख गावांतून २.१९ कोटी प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. 

या ४३ गावांत प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन

नावाळी, भंडार्ली, गोटेघर, उत्तरशिव, वालीवली, फळेगाव, नवगाव, देवगाव, वांजळे, कुडवली, कळमखांडे, खांदारे, कासगाव, राव, मानिवली खुर्द, शाई, पाडाळे, शिरवली, तळवली तर्फे गोरड, तळवली, बारागाव, पिंपळगाव, कळंभाड (भोंडीवले), अल्याणी, नांदवळ, फोफोडी, डिंभे, पुणधे, नारायणगाव, फुगाळे, वेडवहाळ, गांडूळवाड, अस्नोली तर्फे कुंदे, चावे, कांदली, वेढे, सागांव, घोटगांव, धामणे, वाडी, ढोके, चिरड, कान्हेर, दहिवली इत्यादी अशा एकूण ४३ गावांतील नागरिकांना प्रायोगिक तत्वावर पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानंतर कार्ड वाटप केले जाणार आहे.

प्रॉपर्टी कार्डचा उपयोग काय?

या स्वामित्व योजनेतून मिळणाऱ्या प्रॉपर्टी कार्डला मोठे महत्व आहे. आता मालमत्तेवर कर्ज काढता येणार आहे, मालकीचा पुरावा असल्याने मालमत्तेचे विवाद कमी होणार आहेत, ग्रामपंचायतीलाही कर आकारणी करणे शक्य होवून गाव विकास साध्य होणार आहे, अन्य काही उत्पन्नाचे स्रोत्र निर्माण होणार आहेत, मात्र या योजनेबाबत ग्रामीण क्षेत्रातील लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये जनजागृतीची आवशकता आहे.