BREAKING NEWS
latest

चीनमध्ये पुन्हा हॉस्पिटल फुल्ल होत असून कोरोनाच्या ५ वर्षानंतर या 'एचएमपीव्ही' रोगाच्या संक्रमणामुळे पुन्हा लागणार का लॉकडाऊन ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

चीन : सध्या चीनमध्ये एका गूढ आजाराने थैमान घातले आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमुळे रूग्णालय पुन्हा फुल्ल झाले आहेत. या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहेत. चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. चीनमधील कोरोना आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. चीनवर त्यावेळी जगभरातून टीका झाली होती. जगभरात लॉकडाऊन लागले होते. आता इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (एच एम पी व्ही) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चीनमध्ये श्वसनासंबंधीच्या आजारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. खासकरून रुग्णालयात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने हा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. त्याची लक्षण ही सर्दी-पडशा सारखी आहेत. यामध्ये ताप, खोकला, नाक वाहणे, श्वास घेताना धाप लागणे वा श्वास घेण्यास कष्ट पडणे अशी लक्षणं दिसत आहेत. चीन सरकार अथवा डब्ल्यूएचओ ने याविषयी कोणताही अलर्ट दिला नाही. हा आजार वातावरणातील बदलामुळे झाला की चीन सरकारने पुन्हा एकदा हलगर्जीपणा केला हे समोर आलेले नाही.


खरंच आहे का महामारी ?

समाज माध्यमांवर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल होत आहे. चीनमधील अनेक दवाखाने सध्या अबालवृद्धांमुळे गजबजले आहेत. सध्या ही गर्दी अधिक दिसत असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदलामुळे आणि थंडीच्या लाटेने चीनमध्ये आजार बळावले आहे. कोरोनानंतर अनेक लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. अशावेळी वातावरण बदलानंतर सर्दी-पडशाचे प्रमाण वाढले आहे. इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (एच एम पी व्ही) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात यापूर्वी हे आजार या देशात बळावले होते. हा नवीन आजार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आर एस व्ही आणि इन्फ्लुएंजा चा देखील कहर

एच एम पी व्ही व्यतिरिक्त, इतर विषाणू देखील चीनमध्ये पसरत आहेत, त्यापैकी आर एस व्ही (रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस) आणि इन्फ्लुएंझा प्रमुख आहेत. हे सर्व विषाणू एकत्रितपणे संसर्गाचे प्रमाण वाढवत आहेत आणि परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. चीनमध्ये सध्या अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत असं चित्र दिसून येत आहे. तर यामुळे जगभरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एचएमपीव्ही ची काय आहेत लक्षणे ?

एचएमपीव्ही ची लक्षणे खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास लागणे आणि अशक्तपणा यासारख्या सामान्य सर्दीप्रमाणे सुरू होतात. परंतु यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये, विशेषत: लहान मुले आणि वृद्धांमध्ये न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, या विषाणूवर सध्या कोणतीही विशिष्ट लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्याचे उपचार केवळ लक्षणे नियंत्रणाच्या आधारे केले जात आहेत.

रिक्षात गहाळ झालेले २२ तोळे सोन्याचे दागिने तांत्रिक पद्धतीने तपास करत डोंबिवली पोलीसांनी केले परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक ०१ जानेवारी रोजी नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना एका कुटुंबीयांचे २२ तोळे सोन्याचे दागिने व कपडे असलेली बॅग रिक्षात गहाळ झाल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली होती. 

मिळालेल्या माहिती नुसार अश्विनी अजय कृपेकर (वय: ४४ वर्षे), राहणार डोंबिवली (पूर्व) एमआयडीसी मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशन रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांच्या बॅगेतील २२ तोळे सोन्याचे दागिने असलेले ज्याची किंमत एकूण रुपये १८,५०,०००/- (अठरा लाख पन्नास हजार) तसेच कपडे असलेली बॅग रिक्षामध्ये विसरल्या असल्याबाबतची तक्रार रामनगर येथील डोंबिवली  पोलीस ठाणे मध्ये देण्यात आली होती.

याप्रसंगी रामनगर येथील  डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोहवा. मंगेश वीर यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे तांत्रिक पद्धतीने त्या रिक्षा नंबरचा शोध घेऊन व रिक्षा चालकाचा पत्ता शोधून काढत तक्रारदाराचे २२ तोळे सोन्याचे दागिने व कपड्याची बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांनी त्यांना परत मिळवून दिली. तक्रारदारांनी डोंबिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

सहा वर्षांच्या विलंबानंतर पुन्हा सुरू होणार डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपूल प्रकल्प..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या डोंबिवलीतील महत्त्वाच्या ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम आता पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ६० घरांना भरपाई जाहीर केली आहे. हा उड्डाणपूल बांधल्यानंतर कल्याण ते डोंबिवली हा समांतर मार्ग पूर्ण होणार असून, लोकांना कल्याणहून डोंबिवलीमार्गे ठाकुर्लीकडे जाताना ठाकुर्लीतील गर्दीच्या गल्लीतून जावे लागणार नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी केली. यामध्ये जुन्या डोंबिवलीतील घनकचरा प्रकल्प, मोठागाव येथील एसटीपी प्रकल्प, कचोरे रोड, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प आणि कल्याण स्टेशनच्या सॅटीस प्रकल्पाचा समावेश आहे.

पाहणीदौऱ्या दरम्यान महापालिका आयुक्त डॉ.इंदूरणी जाखड यांनी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि प्रकल्पांमधील अडथळे कसे दूर करता येतील. जुन्या डोंबिवलीतील घनकचरा प्रकल्पाबाबत जाखड चर्चा करत असताना स्थानिकांनी घनकचरा प्रकल्पाला विरोध करत तो दुसरीकडे हलवण्याची मागणी केली. या भेटीनंतर इंदूरणी जाखड यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होऊन उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले.

हे काम लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर उड्डाणपुलाचे उर्वरित काम एमएमआरडीएकडून करण्यात येणार असल्याचे जाखड यांनी नमूद केले. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल, एमएमआरडीएद्वारे बांधला जात आहे, हे २०१८ मध्ये पूर्ण झाले होते, तर पुढील उड्डाणपुलाचे काम ठाकुर्ली बाजूला ९० फूट रोडला जोडण्यासाठी अपूर्ण आहे कारण सुमारे ६० घरे यामुळे बाधित होणार आहेत असे त्या म्हणाल्या.

राज्य शासनाकडून कल्याण-डोंबिवलीचा पाणी प्रश्न मार्गी लावत ३५७.१७ कोटीच्या अमृत योजनेला मंजुरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने ३५७ कोटी १७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे. यामुळे २७ गावांना अनेक वर्षापासून भेडसावणारा पाणी प्रश्न पुढील अनेक वर्षासाठी सुटणार आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या २७ गावातील नागरिकांची अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नातून सुटका होणार असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रोकांत शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना तीव्र पाणी टंचाई भेडसावत असल्याने नागरिकांकडून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी होत होती. म्हणून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या त्रुटी दूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना केली जाणार आहे अशी विचारणा केली असता कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, निवडणूक प्रचारादरम्यान देखील २७ गावातील नागरिकांची ओढाताण प्रकर्षाने दिसून आल्यामुळे आमदार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात या भागासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करावी तसेच पाण्याचा कोटा  वाढविण्याची मागणी केली होती. तर या भागाचे कल्याण लोकसभा खासदार असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार बैठका घेत वाढीव निधी मंजूर करण्याकरिता सतत प्रयत्नशील होते. त्यांनी या योजनाचा वेग वाढवत पाणी प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या प्रयत्नानंतर या योजनेसाठीच्या वाढीव निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
२७ गावात २८ जलकुंभ, २ भूस्तर टाक्या आणि ११ पंप हाऊस, वितरण व्यवस्था  यासारखी कामे करण्यासाठी राज्य शासनाने ३५७ कोटी १७ लाखाचा निधी मंजूर केला आहे. यामुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेची कामे वेगाने पूर्ण होऊ शकणार आहेत. एकीकडे निधी मंजूर करतानाच ही सर्व कामे मे अखेर पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून दिलेल्या मुदतीत कोणत्याही परिस्थितीत ही कामे पूर्ण करत नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचे निर्देशच आमदार राजेश मोरे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळेच नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेत त्याची तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉकटर श्रीकांत शिंदे यांचे आमदार राजेश मोरे आणि या २७ गावातील नागरिकांनी आभार मानले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्र कार्यालयासाठी एकूण १६० किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी संयंत्रे कार्यान्वित केलेली आहेत. महापालिकेच्या मोहीली येथील जल शुध्दीकरण प्रकल्प व कपोते वाहनतळ येथे प्रत्येकी १२० किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी संयंत्रे आस्थापित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या १५ इमारतींवर ०.४४ मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा संयत्रे आस्थापित असून प्रती वर्षी ६.३४  लक्ष सौर उर्जा युनिट उत्पादन होत आहे.

कल्याण-डॉबिवली महानगरपालिका क्षेत्रात सन २००७ पासून नविन इमारतीवर सौर उर्जा संयंत्रे उभारणे पासून बंधनकारक केलेले आहे. सौर उर्जा संयंत्रे उभारल्यानंतरच विकासक यांना नवीन इमारतीसाठी नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. सन २००७ ते २०२१ या कालावधीत १८३२ इमारतींवर १,१०,२२,५८५ लिटर्स प्रती दिन क्षमतेच्या सौर उष्ण जल संयत्राची उभारणी विकासकाकडून करण्यात आली आहे. सौर उष्ण जल संयत्रामुळे महापालिका क्षेत्रातील इमारती मधील गरम पाणी करणेसाठी विजेचा भार कमी झाला असून दरवर्षी १८ कोटी पारंपारीक वीज युनिटची बचत होत आहे.

सन २०२१ पासून नगरविकास विभागाच्या युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली नुसार महानगरपालिका क्षेत्रातील नवीन इमारतीवर सौर उर्जा निर्मिती करणारी सौर संयंत्रे बसविणे बंधनकारक केलेले आहे. सन २०२१ ते डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत एकूण १९४ नविन इमारतीवर ३.५ मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारे सौर संयत्रे विकासकाकडून आस्थापित करुन घेण्यात आलेली आहेत. सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून दरवर्षी ५०.४० लक्ष सौर उर्जा वीज युनिटची निर्मिती होणार आहे. या हरित उर्जा निर्मितीतून इमारतीसाठी आवश्यक उदवाहन, वॉटर पंप, पॅसेज लाईट,आऊट डोअर लाईट या सामायिक बाबींसाठी आवश्यक विजेची गरज भागणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, कॉलेज, रहिवासी संस्था, सरकारी कार्यालये, मॅराथॉन स्पर्धा, डोंबिवली जिमखाना उत्सव या सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या विद्युत कर्मचाऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या पथनाट्याचे एकूण २६ प्रयोग करुन सौर ऊर्जेबाबत जनजागृती केली. तसेच दि.१४ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२४ या राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहात आकर्षक माहिती पत्रकांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी उर्जा संवर्धन व सौर उर्जा या बाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. सौर उर्जा ही हरीत उर्जा असून काळाची गरज आहे. सौर उर्जा संयंत्रे आस्थापित करणाऱ्या नागरीकांना महापालिकेतर्फे दरवर्षी मालमत्ता करात १ टक्का सुट देण्यात येते, त्यासाठी नागरीकांनी सौर उर्जा संयंत्रे कार्यान्वित असल्याचा दाखला दरवर्षी महापालिकेत सादर करावा लागतो अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.