BREAKING NEWS
latest

डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली येथे ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे दि. ०९/०१/२०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महात्मा गांधी येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार शशीकांत गांगुर्डे यांनी अपघात कुठल्या चुकीमुळे होतात याची कारणे आणि घडणाऱ्या अपघाताची आकडेवारी या बदल माहिती दिली. विद्यार्थांना रस्ता सुरक्षा विषयी सुरक्षित प्रवास कसा करावा, रस्ता सुरक्षाचे नियम याची सुद्धा माहिती करून दिली. 
या अभियानात डोंबिवली वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. बोरसे सर यांनी पोलीस विभागाचे आभार मानले. या वेळी ट्राफिक वॉर्डन सोमासे ट्राफिक वॉर्डन निलेश झेमसे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना मिळणार ७ वा हप्ता..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिला जाणारा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. फडणवीस सरकारने याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे, आणि आशा व्यक्त केली आहे की, मकर संक्रांतीच्या सणाच्या अगोदर, १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होईल. यामुळे मकर संक्रांती सणाच्या आनंदात आणखी भर पडणार आहे.

जानेवारीचा हप्ता लवकर मिळणार

सध्या या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांमध्ये एकूण ९००० रुपये महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने, महिलांमध्ये जानेवारी हप्त्याबद्दल उत्सुकता होती. पण मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा हप्ता लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे.

मकर संक्रांतीला खास भेट

मकर संक्रांती हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जर महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेत मिळाला, तर त्यांचा सण अधिक आनंददायक होईल. सरकारचा हा निर्णय महिलांसाठी एक खास भेट ठरणार आहे.

रकमेतील वाढ होण्याची शक्यता

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात महिलांना मिळणाऱ्या हप्त्यात वाढ होऊ शकते. सध्या दरमहाला १५०० रुपये दिले जात असले तरी, हा हप्ता २१०० रुपये प्रति महिना करण्याची शक्यता आहे. या बदलामुळे महिलांना आणखी मोठा फायदा होईल.

लाडकी बहीण योजनेचे फायदे

* महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत.
* सणासुदीच्या काळात वेळेवर पैसे मिळाल्याने आर्थिक स्थैर्य.
* भविष्यात रकमेतील वाढ झाल्यास महिलांना अधिक लाभ.
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी महत्त्वाची मदत.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारीचा हप्ता एक मोठा आनंदाचा क्षण ठरणार आहे. मकर संक्रांतीच्या सणाला महिलांना मिळणारी आर्थिक मदत त्यांना सण साजरा करण्यासाठी अधिक सक्षम बनवेल. तसेच भविष्यात रकमेतील वाढीमुळे महिलांना अधिक फायदे मिळण्याची शक्यता आहे.

रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील साडेचार हजार कुटुंबांना मिळणार घरगुती महानगर गॅस जोडणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील ४५०० कुटुंबांना घरगुती महानगर गॅस जोडणी उपलब्ध करून मिळणार आहे. रिजन्सी अनंतम हे डोंबिवलीतील सर्वात मोठे व आधुनिक सोयी सुविधा युक्त असे गृह संकुल असून जवळच्या एमआयडीसी निवासी विभागात घरगुती महानगर गॅसचा पुरवठा गेले पाच सहा वर्षे अगोदरपासूनच होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्या प्रयत्नांमुळेच डोंबिवलीच्या घरा घरात महानगर गॅस पोहचला आहे. संपूर्ण डोंबिवली पूर्व येथे जवळ जवळ ८०% घरांना घरगुती गॅस जोडणीने जोडले गेले आहे. डोंबिवली पश्चिम साठीची रेल्वे क्रॉसिंग जोडणी पूर्णत्वास आली असून लवकरच घरा घरात जोडणीला प्रारंभ होणार आहे.

परंतु गेले अनेक वर्षापासून ह्या संकुलाला मात्र रिजन्सी अनंतमचे बिल्डर आणि महानगर गॅस लिमिटेड  ह्यांच्यात महानगर गॅस  पुरवठ्याची लाइन टाकण्याबाबत काही वाद होता, त्यामुळे रिजन्सी अनंतम मधील कुटुंबियांना गॅस जोडणी साठी विलंब लागत होता. त्या बाबत नुकतीच काही रहिवाश्यांनी तक्रारीतून थेट आपली कैफियत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्याकडे मांडली. यानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी त्वरित महानगर गॅस लिमिटेड चे संबंधित अधिकारी यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून बैठक घेतली व रिजन्सी अनंतमचे बिल्डर यांना संपर्क करुन लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत कळविले. त्यानुसार मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी, रिजन्सी ग्रुप चे अधिकारी आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत शिवसेना उप-जिल्हा प्रमुख राजेश कदम, उप-तालुका प्रमुख राहुल गणपुले आणि खासदार कार्यालय प्रमुख प्रफुल देशमुख यांच्यात बैठक पार पडली. बुधवारी नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिजन्सी अनंतम बिल्डर ह्यांच्या मार्फत राहुल भतीजा यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीला घरगुती गॅस जोडणी बाबतचा ना हरकत दाखला महानगर गॅस लिमिटेड चे डोंबिवली विभाग अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी रिजन्सी ग्रुप आणि महानगर गॅस अधिकारी यांच्यासह आमदार राजेश मोरे, राहुल गणपुले, सागर दुबे, रिजन्सी अनंतम मधील रहिवासी लता अरगडे, शरद साहू, विक्रम शर्मा आणि अनंतम सार्वजनिक कार्यक्रम समितीचे सभासद उपस्थित होते. सर्व उपस्थित रहिवाश्यांनी आमदार राजेश मोरे यांच्यामार्फत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.

राज्यातील १९५० प्रकल्प स्थगित करत 'महारेरा' चा बिल्डरांना दणका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : इमारतीचं बांधकाम पूर्ण करुन घरांचा ताबा देण्याची म्हणजेच पझेशनची तारीख उलटून गेल्यानंतरही 'महारेरा'कडे कोणतीही माहिती अपडेट न करणाऱ्या प्रकल्पांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण म्हणजेच 'महारेरा'ने १० हजार ७७३ प्रकल्पांविरोधात कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी १९५० प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. या विकासकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय आता पुढील टप्प्यामध्ये कारणे दाखवा नोटीसला प्रतिसाद न देणाऱ्या ३४९९ प्रकल्पांवर कारवाई करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

नोटीसला किती जणांनी दिलं उत्तर

मागील महिन्यात काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या प्रकल्पांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. उत्तर देण्यासाठी निर्धारित करुन दिलेल्या ३० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण ५३२४ प्रकल्पांनी प्रतिसाद दिला. यामधील ३५१७ प्रकल्पांनी ओसी सादर केली तर ५२४ प्रकल्पांनी मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे. तर प्रतिसाद देणाऱ्या कागदपत्रांची सध्या छाननी सुरु आहे. दरम्यान प्रकल्पाची थेट नोंदणी रद्द करणे किंवा स्थगित करणे, प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई सोबतच या प्रकल्पातील कुठल्याही सदनिकेच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी न करण्याच्या सूचनांसह जिल्हा निबंधकांना देणे याशिवाय प्रकल्पांचे बँक खाते गोठवणे अशा प्रकारची कारवाई महारेराकडून केली जात आहे.

कोणत्या जिल्ह्यातील किती प्रकल्प रद्द ?

स्थगित करण्यात आलेल्या प्रकल्पांपैकी सर्वाधिक २४० प्रकल्प रायगडमधील आहेत. त्या खालोखाल स्थगित प्रकल्पांपैकी २०४ प्रकल्प ठाण्यातील आहेत. तसेच नवी मुंबई आणि उपनगरांमधील ११ प्रकल्प स्थगित करण्यात आलेत. पालघरमधील १०६ प्रकल्प स्थगित झाले आहेत. मुंबईतील ५१ प्रकल्प स्थगित करण्यात आलेत. जिल्हानिहाय विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूर आणि आहिल्यानगरमधील प्रत्येकी १ प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. ठाण्यातील २ प्रकल्प रद्द केले आहेत. साताऱ्यासहीत कोल्हापूरमधील तीन प्रकल्प रद्द करण्यात आलेत. तर नाशिक आणि मुंबई उपनगरातील प्रत्येकी ४ प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. पालघरमधील ५ प्रकल्प रद्द करण्यात आलेत. रायगडमधील ६ प्रकल्प रद्द केले आहेत. सर्वाधिक म्हणजे १४ रद्द प्रकल्प है पुण्यातील आहेत.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'सायबर जागृकता दिवस' उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : पाेलीस स्थापना दिनानिमित्त ठाणे पाेलीस आयुक्तालयाकडून दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२५ या आठवड्यात सायबर गुन्हे जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येताे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनियर काॅलेज येथे 'सायबर गुन्हे जागृकता दिवस' साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात जे एम एफ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.राजकुमार काेल्हे, सचिव डाॅ.प्रेरणा काेल्हे, विष्णूनगर पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री.दाभाडे, श्री.ओम देसाई (सायबर अवेअरनेस टिम), श्री. युवराज तायडे (विष्णु नगर पाेलीस स्टेशन), मुख्याध्यापक श्री.अमाेद वैद्य (राज्य मंडळ), उप-मुख्याध्यापिका तेजावती कोटीयन आदी मान्यवर उपस्थित होते. 
संस्थेचे अध्यक्ष डाॅ. राजकुमार काेल्हे व डाॅ. प्रेरणा काेल्हे यांनी पाेलीस बांधवांना पाेलीस स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पाेलीस निरीक्षक श्री.दाभाडे यांनी सायबर गुन्हेगारीवर कशा प्रकारे मात करावी या विषयावर विद्यार्थ्यांना माेलाचे मार्गदर्शन केले. श्री.ओम देसाई (सायबर अवेअरनेस टिम) यांनी सध्या 'सायबर क्राईम' काेराेना काळातील काेविडच्या विषाणू सारखा पसरत आहे असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून कसा बचाव करता येईल या विषयी माेलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी  प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमाेद वैद्य यांनी केले व आभार प्रदर्शन डाॅ. तेजावती काेटीयन यांनी केले.

वाहनधारकांनी आपल्या सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविणे अत्यावश्यक !

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या जीसएआर ११६२ (एचएसआरपी) दि. ०१.१२.२०१८ व दि. ०६.१२.२०१८ नुसार दिनांक ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

त्यानुसार दि.०१.०४.२०१९  पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी व तिसऱ्या नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे याकरीता  https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या वेबसाईटवर सर्व वाहनधारकांनी दि.३१ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

तसेच दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनां एचएसआरपी व तिसऱ्या नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या किमान एचएसआरपी बसविणाऱ्या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. सदर जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागाने तयार केलेल्या एचएसआरपी पोर्टलवर दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दि. ०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी वर नमूद केलेल्या अधिकृत एचएसआरपी उत्पादकांकडून वाहनांवर बसविण्यात आलेले एचएसआरपी हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्यावत केले जाईल. इतर कोणत्याही एचएसआरपी निर्मात्याकडून / पुरवठादाराकडून बसविलेल्या एचएसआरपी  मोटार वाहन कायदा आणि नियमांच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईसाठी पात्र असतील.