BREAKING NEWS
latest

स्मरणीय संमेलन! शालेय जीवनाच्या आठवणींनी स्नेहसंमेलन रंगले!



संदिप कसालकर 

मुंबई: रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित बालविकास विद्या मंदिर, जोगेश्वरी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच थाटात संपन्न झाले. या कार्यक्रमात पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग आणि सामाजिक समस्यांवर आधारित नेत्रदीपक नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले.

प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती:

या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी आणि नवनिर्वाचित आमदार अनंत (बाळा) नर होते. कार्यक्रमात मुख्याध्यापक जगदीश सूर्यवंशी आणि पर्यवेक्षक राजेंद्र निळे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.

संस्थेच्या उपक्रमांचा गौरव:

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबईचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत पालक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की, या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश मिळवले आहे, जसे की इंजिनियरिंग, डॉक्टरी, इत्यादी. याच शाळेचे माजी विद्यार्थी बाळा नर आज महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले आहेत, ही संपूर्ण संस्थेसाठी, शाळेसाठी आणि शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

आ. बाळा नर यांचे मार्गदर्शन:

प्रमुख पाहुणे आ. बाळा नर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षणातून मिळालेल्या संस्कारांचा उल्लेख केला. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी चांगले व प्रामाणिक काम करण्याचा सल्ला दिला.

गौरव व पुरस्कार वितरण:

कार्यक्रमात शाळेच्या आदर्श विद्यार्थी श्रेया सुतार आणि हर्ष भेहरे यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय, पुरस्कारप्राप्त शिक्षक अनुजा शेट्टी आणि अनघा घुगरे यांचाही सत्कार करण्यात आला.

विशेष अतिथींची उपस्थिती:

कार्यक्रमाला संस्थेचे सल्लागार सीए संतोष घाग, उपकार्याध्यक्ष अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार, सचिव यशवंत साटम, सहसचिव सुरक्षा घोसाळकर, सहखजिनदार विजय खामकर, खजिनदार विनोद बने, तसेच सदस्य उमाकांत कदम आणि दुर्गांकांत चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन:

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका योगिता पाटील यांनी केले. मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी झाले. विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

समारोप:

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले तसेच शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले. बालविकास विद्या मंदिर शाळेचा हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

जोगेश्वरी पूर्व: समृद्धी एस.आर.ए. सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, देशभक्तीच्या रंगांनी सजले मजले!


संदिप कसालकर 

मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथील समृद्धी एस.आर.ए. सोसायटीत २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी सोसायटीच्या सदस्यांनी सकाळी ध्वजारोहण करून देशभक्तीला सलामी दिली.


देशभक्तीपर सजावट व कार्यक्रमाची शान:

यंदा सोसायटीतील सर्व मजल्यांना स्वच्छता आणि देशभक्तीपर सजावट या थीमवर सजवण्यात आले होते. प्रत्येक मजल्यावर भारतीय ध्वजाच्या रंगांची सुंदर सजावट पाहायला मिळाली, ज्यामध्ये सदस्यांनी पूर्ण सहभाग घेतला. या उपक्रमामुळे सोसायटीच्या परिसरात देशभक्तीचे अद्वितीय वातावरण तयार झाले.

सैनिकांसाठी प्रेरणादायी पत्र लेखन:
सैनिकांना आदरांजली आणि प्रेरणा देण्यासाठी विशेष पत्र लेखनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सोसायटीतील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारी पत्रे लिहून सैनिकांच्या बलिदानाचा गौरव केला.

प्रश्नमंजुषा व देशभक्तीपर गीतांची मैफल:
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये देशभक्ती, भारतीय इतिहास आणि संविधानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. सोसायटीतील लहान मुलांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या गीतांनी कार्यक्रमाला वेगळाच रंगत आणली.

उत्सवाचे आयोजन आणि सहभाग:
या शानदार कार्यक्रमाचे आयोजन मंदार पोवार, प्रथमेश गावडे आणि ओंकार पाटील यांनी सोसायटीतील सर्व सदस्यांच्या सहकार्याने केले. त्यांच्या नियोजनामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.

सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग:
या कार्यक्रमात सोसायटीतील सर्व सदस्यांनी एकत्र येत आनंदात सहभाग घेतला. देशभक्तीचा रंग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता, आणि हा दिवस सोसायटीसाठी एकतेचे प्रतीक ठरला.

समारोप:
समृद्धी एस.आर.ए. सोसायटीने प्रजासत्ताक दिन केवळ साजरा केला नाही तर देशभक्तीच्या माध्यमातून सर्व सदस्यांना एकत्र येण्याचा संदेशही दिला. अशा उपक्रमांमुळे समाजात देशप्रेमाची भावना अधिक वृद्धिंगत होते.




कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.२६ : आज ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सकाळी ०७.३० वाजता राष्ट्रध्वज फडकावून आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी  ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिका उपायुक्त, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यासमयी अग्निशमन दल, सुरक्षा दल, स्थानिक पोलीस दल व एमएसएफ चे जवान यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या १४ गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा  महापालिका आयुक्त व उपस्थित  इतर अधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तु प्रदान करून सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली (पूर्व) विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरीक्त आयुक्त-२, योगेश गोडसे यांनी ध्वजवंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली. याप्रसंगी परिमंडळ २ चे  उपायुक्त अवधुत तावडे, माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सचान यांचे बंधू तसेच महापालिका अधिकारी/ कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते. त्यानंतर डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील दीडशे फुटी उंच ध्वज फडकवून महापालिका आयुक्‍त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ध्वजवंदन केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त, हर घर संविधान ही संकल्पना  सर्व मिळून राबवू आणि संविधानाचे पालन करून देशाला पुढे नेऊ अशी असे  सांगत आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एसआरपीएफ कमांडन्ट गोकुलजी आणि परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचीही समयोचित भाषणे झाली. यासमयी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, इतर माजी पदाधिकारी, महापालिका अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नागरिक बहुसंख्येने  उपस्थित होते.

परिमंडळ-३ कल्याण हद्दीतील मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि २४:  कल्याण पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरीकांवर कारवाईची मोहिम परिमंडळ-३ कल्याण चे उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण हद्दीत सुरु असुन त्या अनुषंगाने १) मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत टाटा नाका, देशमुख होम्स् जवळ, गांधीनगर झोपडपटटी, कल्याण (पुर्व) व २) महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत कल्याण (पश्चिम) रेल्वे परिसर या ठिकाणी बांगलादेशी नागरीक कोणत्याही कागदपत्राशिवाय व भारत सरकारने विहीत केलेल्या मार्गाव्यतिरीक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन बेकायदा वास्तव्यास असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीसांनी स्वतंत्र पथके तयार करुन सदर दोन्ही ठिकाणी धाडी टाकुन पडताळणी केली असता एकुण ५ बांगलादेशी नागरिक विनापरवाना भारतात राहत असल्याने त्यांना कारवाई कामी अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर त्यांची चौकशी करुन त्यांचेपैकी १) ४ बांगलादेशी नागरीकांवर मानपाडा पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर ९१/२०२५ पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४, परकिय नागरीकांचा कायदा १९४६ चे कलम १३, १४ अ (ब) प्रमाणे व २) १ बांगलादेशी महिला नागरीकांवर महात्मा फुले चौक पो.स्टे.गुन्हा रजि. नंबर ७८/२०२५ पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४, परकिय नागरीकांचा कायदा १९४६ चे कलम १३,१४ अ (ब) प्रमाणे गुन्हे दाखल करुन पुढील तपास चालू आहे.

सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीचा प्रवास ३ रुपयांनी महागला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  सर्वसामान्य प्रवाशांना दूरपर्यंतच्या ठिकाणांवर सुरक्षित पोहचवणाऱ्या लाल परीची अर्थात एसटी बसची शुक्रवारपासून ३ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने सादर केलेल्या एसटी दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळ प्राधिकरणाची गुरुवारी मंत्रालयात बैठक पार पडली. गृह तसेच अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत एसटी दरवाढीचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित निर्णय घेण्यात आला. या बैठकीत लोकप्रतिनिधी सहभागी होत नाहीत.

डिझेल, सीएनजी या इंधनासह एसटीच्या सुट्या भागांच्या किमतीत गेल्या काही वर्षांत मोठी दरवाढ झाली. एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही वाढले. मात्र, तरीही एसटीच्या भाड्यात गेल्या ३ वर्षांपासून कुठलीही दरवाढ झाली नव्हती. त्यामुळे एसटी महामंडळ प्राधिकरणाने सुचविल्यानुसार एसटीच्या दरात १४.९५ टक्के म्हणजे, ३ रुपये दरवाढ करण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने या भाडेवाढीला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑटोरिक्षा, टॅक्सीचीही दरवाढ

मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सी भाडे संघटनांनी ३ रुपयांनी दरवाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी दरवाढ लागू केली जाणार आहे. ऑटोरिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांवरून २६ रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे २८ रूपयांवरून ३१ रुपये होणार आहे. टॅक्सी, ऑटोसाठी शेवटची भाडेवाड ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पद्म पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले आहे. यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या दोघांचा त्यांच्या क्षेत्रातील कार्याचा बहुमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून, त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

सुलेखनकार अच्युत पालव, एसबीआयच्या माजी अध्यक्ष श्रीमती अरुंधती भट्टाचार्य, ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्रभूषण अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, बारीपाड्याचे वनसंरक्षक चैतराम पवार, ज्येष्ठ गायिका जसपींदर नरूला, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ बासरीवादक रोणू तथा राणेंद्र भानू मजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा, चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ. विलास डांगरे या सर्वांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. या सर्वांनी आपापल्या कर्तृत्वाने, त्या त्या क्षेत्राचा गौरव वृध्दिंगत केला आहे. या सर्व मान्यवरांनी व्रतस्थ राहून कार्य केले आहे. यामुळे या क्षेत्रांच्या लौकिकात भर घातली गेली आहे. ही बाब प्रेरणादायी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस या सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

अरण्यऋषी श्री. चितमपल्ली आणि डॉ. विलास डांगरे यांची कर्मभूमी नागपूर आणि विशेषतः विदर्भ परिसर राहिली आहे. या दोहोंचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

सरकारने दिलेला शब्द पाळला !! बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याची घोषणा महायुतीने केली होती. यावरून सध्या काही वाद-विवाद सुरू आहेत. जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे पैसे येत्या दोन दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पैसे जमा झाले की नाही, हे तपासण्याची पद्धत खाली दिली आहे.
सरकारने दिलेला शब्द पाळला

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अपात्र महिलांनी नोंदणी केली असल्याचे पडताळणीमुळे समोर आले आहे. यावरून, योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या तारखेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट केले होते की, जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी खात्यात जमा होईल.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीच्या अगदी जवळ येत असतानाही हप्ता जमा होत नसल्यानं लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती. २४ जानेवारीपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आणि १५०० रुपये जमा होण्यास प्रारंभ झाला आहे.

खात्यात पैसे आले का ? कसं तपासाल ?

लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होतात. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील, तर तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज प्राप्त होईल. जर मेसेज न आल्यास, तुमच्या बँकेच्या ऍपमध्ये जाऊन डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून पैसे जमा झाले की नाही, हे तपासू शकता. बँकेत जाऊन देखील याबाबत माहिती मिळवता येईल.

मंत्री आदिती तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करण्याबाबत प्रस्ताव पुढे येईल. यावरील शिफारस आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाईल. त्यानंतर, योजनेच्या वाढीव खर्चाची तरतूदही या अधिवेशनात केली जाईल. त्यामुळे लाडकी बहिणींना योजनेचा वाढीव हप्ता अधिवेशनानंतर मिळण्याची शक्यता आहे.