BREAKING NEWS
latest

दुर्गम शाळांसाठी स्वच्छतेचा नवा अध्याय!

संदिप कसालकर 

अलर्ट सिटीजन फोरम संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि एरियन फाउंडेशन, मुंबई यांच्या CSR सहकार्यातून "प्रोजेक्ट डिग्निटी - दुर्गम शाळांसाठी स्वच्छता सुविधा" या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या अंतर्गत सावरखिंड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आले असून, आज या सुविधांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा

ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता ही मोठी समस्या राहिली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अस्वच्छ किंवा अपूर्ण सुविधांमुळे शिक्षण सोडावे लागते. हा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने अलर्ट सिटीजन फोरम आणि एरियन फाउंडेशनने हा विशेष उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाद्वारे शाळेत स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले असून, यामुळे मुलांना आता स्वच्छतेच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे.

मुलींसाठी मासिकपाळी नियोजन कक्ष - आरोग्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

हा उपक्रम केवळ स्वच्छतागृहापर्यंत मर्यादित न राहता मुलींसाठी स्वतंत्र मासिकपाळी नियोजन कक्ष उभारण्यावरही भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागात अद्याप मासिकपाळी संदर्भात जागृतीचा अभाव दिसून येतो. मुलींना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे शालेय जीवन व्यत्ययग्रस्त होते. या नियोजन कक्षामुळे मुलींना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात मासिकपाळी व्यवस्थापन करता येईल, तसेच त्यांना स्वच्छतेबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळेल.

स्वच्छतेच्या दिशेने एक मोठी पुढाकार!

"प्रोजेक्ट डिग्निटी" हा केवळ एका शाळेसाठी नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी एक दिशादर्शक उपक्रम ठरणार आहे. अशा सुविधा अधिकाधिक दुर्गम शाळांमध्ये पोहोचाव्यात, यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे अलर्ट सिटीजन फोरम आणि एरियन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छता आणि आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली.

समाजासाठी सकारात्मक बदल घडविणारा उपक्रम

शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी हा उपक्रम निश्चितच आनंददायक आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे शिक्षणासोबतच स्वच्छता आणि आरोग्यासाठीही पोषक वातावरण निर्माण होते. अलर्ट सिटीजन फोरम आणि एरियन फाउंडेशनच्या सामाजिक भान आणि सेवाभावी वृत्तीचे विशेष कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील शाळांसाठी अशी उपक्रमशीलता भविष्यातही सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


जोगेश्वरी शिवदर्शन SRA निवडणुकीत १६ उमेदवार मैदानात! भ्रष्टाचार संपवण्यासाठी निर्धार!

संदिप कसालकर (वार्ताहर)

मुंबईतील जोगेश्वरी शिवदर्शन एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित), डि वार्ड, जोगेश्वरी (पूर्व) या संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, संस्थेतील पारदर्शक आणि न्याय व्यवस्थेसाठी योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य उमेदवार निवडा!

संस्थेच्या सध्याच्या व्यवस्थेतील अनियमितता आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. योग्य आणि पारदर्शी प्रशासनासाठी जबाबदार उमेदवार निवडण्याचा निर्धार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांची अधिकृत यादी:

प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत एकूण १६ उमेदवारांचे नाव आहे. यामध्ये भोगवेकर समीर माधवकर, चौहान अनिल भगवानदास, धोळम राजेंद्र मुकुंद, गुरव वसंत काशीराम, जाधव संतोष कृष्णा, मोटा जसुमती मुलचंद, पालव दीपक महादेव, परब उषा भीमसेन, पाटील सचिन पांडुरंग, पाटील उमेश पांडुरंग, राजपूत सुनीता महेंद्र, सावळा भरत ठकर्षी, मांडवकर छाया विष्णू, पडळेकर महेश अनंत, काडेचार बसवराज फकीरप्पा आणि गलांडे दादासाहेब आर या नावांचा समावेश आहे. या उमेदवारांनी संस्थेच्या पारदर्शक कारभारासाठी निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

संस्थेच्या आधीच्या कामगिरीचा आढावा:

  • संस्थेने आणि विकासकाने येथील झोपडीधारकांना विश्वासात न घेऊन केलेल्या कामात आपल्या संघाने शासन दरबारी अनेक तक्रारी आणि त्याचा पाठपुरावा केला आहे.
  • प्रकल्प ज्या मूळ दलालांमुळे लांबणीवर आला त्या मधुकर गोमणे बाबत शासन दरबारी तक्रार केली.
  • २००८ साली शिवालिक व्हेंचर्स ह्या विकासकामार्फत प्रकल्पामध्ये दिरंगाई झाल्याने त्याचा पाठपुरावा केला.
  • ओमकार व्हेंचर्स मार्फत करण्यात येणारा आपला प्रकल्प २०१८ पासून बंद आहे त्याचा आपल्या संघाने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
  • थकीत घरभाडे न दिल्यामुळे विकासकाच्या विक्री घटकांवर स्थगिती आणली.
  • विक्री घटकांवर स्थगिती आणल्यामुळे आपल्या १०७ रहिवाश्यांना आपल हक्काचे घर मिळाले तसेच काही रहिवाश्यांना धकीत घरभाडे मिळवून दिले.
  • १०७ रहिवाश्यांना धकीत घरभाडे मिळणे बाबत पाठपुरावा करत आहोत.
  • तात्पुरत्या निवासस्थानी राहणाऱ्या रहिवाश्यांच्या वतीने न्यायालयात धाव घेतली.
  • थकीत घरभाडे आणि हक्काचे घर लवकरात लवकर मिळावे यासाठी काही रहिवाश्यांच्या वतीने न्यायालयात धाव घेतली.
  • कार्यक्षम नसलेल्या विकासकावर १३/२ मार्फत कारवाही करून नविन विकासकाची नेमणूक केली.
  • कार्यक्षम नसलेल्या जुन्या कमिटिला बरखास्त केले जे आपल्या प्रत्येक तक्रारिवर विकासकाला सुरक्षित करण्यासाठी त्याच्या बाजूने एसआरएला नाहरकत पत्र देत होते.
  • आपल्या प्रकल्पासाठी बिनकामाचा आणि परिसरातील लोकांना घातक असा RMC प्लांट नष्ट केला.
  • अनेक रहिवाशांचे वारसपत्र बनवून दिले.
  • स्थानिक लोकप्रतिनिधिंकडे वारंवार आपल्या प्रकल्पाचा आढावा घेतला.

स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता!

ही निवडणूक संस्थेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अनेक सभासदांनी या निवडणुकीत पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे मुद्दे प्राधान्याने पाहण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाची माहिती:

📅 मतदान दिनांक: २३ मार्च २०२५

⏰ वेळ: सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत

संस्थेच्या पुनर्विकासासाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी कोण निवडून येणार? कोणता गट विजय मिळवणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे!



मीरा-भाईंदर महापालिकेत खळबळ! मनसेने ३ फुटांचं पत्र ठेवलं आयुक्तांच्या टेबलावर!


संदिप कसालकर (वार्ताहर)

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्याने मोठा वाद उफाळून आला आहे. अग्निशमन विभागातील कर्मचारी आणि वैद्यकीय आरोग्य विभागातील लिपिक यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला असून, शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली थेट महापालिका आयुक्तांना ३ फूट लांबीचं पत्र देऊन या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे.


मनसेचा अनोखा पद्धतीने निषेध!

सामान्यतः महापालिकेला निवेदने आणि पत्रे दिली जातात, पण यावेळी मनसेने वेगळा मार्ग अवलंबला. "A4 साईजच्या कागदाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, म्हणून थेट ३ फूट लांबीचे पत्र देऊन प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला," असे संदीप राणे यांनी स्पष्ट केले. या पत्रात कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार!

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले नाही तर त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळते. असे असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने कर्मचारी अस्वस्थ आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे प्रकार समोर आले असून, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

संदीप राणे यांचा थेट सवाल – "आयुक्त साहेब, उत्तर द्या!"

"महापालिकेत नव्या आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्थिती जैसे थे आहे. आता तरी कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन मिळेल का? की हा बेजबाबदार कारभार असाच सुरू राहणार?" असा थेट सवाल मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे.

मनसेचा इशारा – अन्यथा तीव्र आंदोलन!

जर लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिले गेले नाही, तर मनसे आणखी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका प्रशासन हादरले असून, आता आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने तातडीने यावर निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा, मनसेच्या आंदोलनामुळे हा विषय अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही!

तहसीलदारांचा रामनगर पोलिसांना खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. बांधकामासाठी लागणारा सातबारा आणि नकाशे बनावट तयार केले गेले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलिसांना खोटे सातबारे, मोजणी नकाशे आणि बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

डोंबिवलीत रेरा नोंदणी घोटाळ्यात ६५ बेकायदा बांधकामं उभी राहिली असल्याची बाब उघडकीस आली आहे. या ६५ बेकायदा इमारत प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन तक्रार केली होती. बेकायदा इमारतीच्या बांधकामाकरिता खोटे सातबारा आणि मोजणी नकाशे वापरले गेले आहेत, या प्रकरणाची चौकशी करुन करावाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश आले असून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना अटक होईल, अशी आशा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच प्रांत कार्यालयाचे देखील त्यांनी आभार मानले आहे.

प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले होते. या चौकशीअंती इमारतीसाठी वापरलेले जाणारे सातबारा आणि मोजणी नकाशे खोटे आहेत ही बाब लक्षात आली. त्यानंतर तहसीलदार शेजाळ यांनी डोंबिवली रामनगर पोलिसांना पत्राद्वारे या संदर्भात त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या प्रकरणात हे आदेश दिले गेले आहेत, त्या प्रकरणात खोटे सातबारा आणि नकाशे 'मेसर्स. साई डेव्हलपर्स' तर्फे भागीदार शालिक भगत आणि त्यांचे साथीदार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करुन पुढील तपास करणार आहेत. बिल्डरांसोबत खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या लवकरच अटक होईल, अशी अपेक्षा दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी आरपीएफ पोलीस दलातील महिला पोलीस सन्मानित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : जगात ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिवस' म्हणून साजरा केला जातो. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरपीएफ पोलीस स्टेशन डोंबिवली येथे तैनात असलेल्या महिला पोलीस  दलातील कर्मचारी सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला व महिलांच्या सुरक्षेबाबत 'स्मार्ट सहेली' अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षितता पाळण्याबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या. महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त करत आरपीएफ पोलिसांचे आभार मानल्याची माहिती डोंबिवलीतील आरपीएफचे निरीक्षक गजेंद्र राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

बनावट फोन पे द्वारे दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी गजाआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
कल्याण : बनावट फोन पे ऍपवर पैसे पाठवल्याचे दाखवून किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २६ फेब्रुवारी रोजी दुपारी कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका येथील आर.के.बाझार या सुपर मार्केटमध्ये दोन इसम येवुन त्यांनी फिर्यादी यांच्या सुपर मार्केट मधुन किराणा सामान मधील ६२९३/- रू. किंमतीच्या वस्तु विकत घेतल्या. फिर्यादी यांच्या भावाला ऑनलाईन बिल भरतो असे सांगुन त्यांनी हे बिल अदा केल्याबाबत बनावट फोन पे ऍपवर दाखवुन बिल पेड न करता फिर्यादी यांची फसवणुक केली. याबाबत  विशाल बोडके यांच्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

या दाखल गुन्ह्याचा कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनि. गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. सिराज शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून या गुन्ह्यातील फसवणुक करून गेलेले आरोपी पंकज पाटील (वय: २२ वर्षे), व अनिल कांबळे (वय: २४ वर्षे), दोघेही राहणार ठाणे या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे सखोल तपास करून कोळसेवाडी पोलीस स्टेशन व मानपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींच्या ताब्यातुन एकुण १६ हजार ४५५ रूपये किंमतीचा  किराणा माल वस्तु व एकुण चार मोबाईल फोन असा मुद्दे‌माल जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलीस उप-आयुक्त अतुल झेंडे व सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या  मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनि. गणेश न्हायदे, पोनि. प्रशासन नाईक यांच्या  सूचने प्रमाणे सपोनि. दर्शन पाटील, पोउनि. सिराज शेख, पोहवा.  बोरसे, सांगळे, कापडी, जरग, सांगळे, पोशि. सोनावळे, गिते यांच्या पथकाने यशस्वीपणे केली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये रंगला महिला दिवस कार्यक्रम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : जगात आठ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 'स्त्री' या शब्दाचाच अर्थ असा आहे की  'स' म्हणजे सशक्त आणि 'त्री' म्हणजे त्रिभुवनात जिची सत्ता आहे ती म्हणजे स्त्री. दिनांक ८ मार्च रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पुरुष शिक्षकांपेक्षा स्त्री शिक्षकांची संख्या जास्त असल्याकारणाने स्त्री शक्ती आणि विचारांचा सन्मान केला गेला. शाळा, महाविद्यालय मधील सर्व पुरुष शिक्षक व ऑफिस कर्मचाऱ्यांनी उत्तमरित्या महिला दिनाचे आयोजन व्यवस्थापन करून सर्व महिला शिक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. सर्व पुरुष शिक्षकांनी संपूर्ण मधुबन वातानुकुलीत दालन फुलांनी सजवले होते, सर्व महिलांचे आगमन होताच त्यांच्या कपाळाला केशरी गंध लावून त्यांचे औक्षण केले गेले.
 संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्व महिला शिक्षकांना व्यासपीठावर स्थानापन्न होऊन त्यांचा सत्कार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि त्यांचे सहकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. वेद पुराणापासून स्त्री ला अनादी शक्तीचे रूप मानले गेले आहे आणि त्याचा उल्लेख देखील वेदांता मध्ये आहे. ब्रह्म देवाने ब्रह्मांड निर्माण केले परंतु प्रथम स्त्री ला म्हणजेच सरस्वतीला जन्मास घातले. केवळ मातृत्व प्राप्त झाले आहे म्हणून ती स्त्री नाही तर दोनच हात असून सुद्धा अष्टभुजा निर्माण करून सर्व गोष्टी बिनचूक पणे पुढे तारून नेते म्हणून ती सशक्त, प्रेमळ, वेळ प्रसंगी कणखर होते ती स्त्री. असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी वक्तव्य केले तर केवळ आजच्या एकाच दिवशी स्त्री ला सन्मान न मिळता ती ३६५ दिवसांची सन्माननीय देवी आहे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
केवळ वडिलांचे नाव देऊन मुलांची ओळख पूर्ण होत नाही तर मातृत्वाच्या सोसलेल्या कळा, जिजाऊंसारखी दिलेली शिकवण, सावित्री बाईंनी दिलेला शिक्षणाचा वसा आणि वारसा यामुळे स्त्री ही कर्तृत्वाची जननी आहे म्हणून देवाधिकांना आजही त्यांच्या आईच्याच नावाने ओळखले जाते, त्यामधे गंगापुत्र भीष्म, देवकी नंदन कृष्ण, कौसल्या सूत श्रीराम, कुंती पुत्र अर्जुन अशा अनेक नामावली आहेत जिथे स्त्रीचा अलौकिक महिमा ऐकायला मिळतो आहे असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
      
सर्व पुरुष शिक्षकांनी सकाळ पासूनच स्वतः भेळ बनविण्यासाठी सर्व पूर्व तयारी चे नियोजन केले होते. सर्वजण एकजुटीने कार्यरत होऊन स्वादिष्ट अशी सर्वांना आवडणारी चटपटीत भेळ बनवली व सर्व उपस्थित महिला वर्गाला हातात आणून दिली. उखाणे घेणे, फॅशन शो, शाब्दिक कोडी, अशा अनेक प्रकारचे खेळ रंगले होते. प्राध्यापक एकनाथ चौधरी, प्राचार्य आमोद वैद्य, उप प्राचार्य अलपेश खोब्रागडे, शिक्षक योगेश शिरसाठ, तेजस पाटील, संकेत कुपटे, करण कोटा, वैभव सर, घनश्याम दादा, सोमेश भांगे, अमन, मोहीत आणि बाकीचे सर्व सहकारी शिक्षक वर्ग या सर्वांनी मिळून उत्तम आयोजन करून महिला दीन साजरा केला व सर्व महिला वर्गाला आनंद दिला.