BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन व यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते, प्रथम मार्गदर्शक आपले आई वडील, त्यानंतर शिक्षक व नंतर स्वतः आपण असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात आता पुढे काय ? या प्रश्नाने काहूर माजलेले असते, अशातच विश्वसनीय आणि अनुभवी मार्गदर्शक लाभला तर मनावरचा ताण हलका होतो व मार्ग मिळतो.
अशाच एका ध्येय मार्गदर्शनाच्या शिबिराचे आयोजन 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये केले गेले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच अभियांत्रिकी मध्ये सुवर्ण पदक विजेते प्रोफेसर डॉ. दिनेश गुप्ता, आयोजक मा. श्री. विश्वनाथजी राणे, मा.महापौर सौ.विनिता राणे, समाजसेवक श्री. मुकेश पाटील, मा. नगरसेविका सौ. संगीता पाटील तसेच इतर पदाधिकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. सरस्वती पूजन करून व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
लॉक डाऊन सारख्या प्रतिकूल काळात देखील ३०० पेक्षा जास्त ऑनलाईन वेबिनार, सेमिनार घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी मार्गदर्शन करणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आजच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये अनन्यभावे त्यांना समजून उमजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा ही इंजिनिअर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर होण्याची असते, काही वेळेस कमी गुण अभावी त्यांना पाहिजे त्या क्षेत्रात जाता येत नाही, परंतु अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्या क्षेत्राशी निगडीत असलेले असंख्य क्षेत्र आहेत आणि ती तुमच्या साठी सुवर्णसंधी ठरू शकते असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले. अनेक मोठ्या अयशस्वी व्यक्ती यशस्वी कशा झाल्या याचे उत्तम उदाहरण देताना "यशस्वी कथा वाचू नका, त्याने केवळ संदेश मिळतो, अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात." असे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार सांगितले. आज नावीन्यपूर्णतेने अनेक शैक्षणिक क्षेत्राचे दरवाजे उघडे आहेत, ज्या क्षेत्रात मन रमते, बुद्धीला चालना मिळते, काहीतरी करण्याची उमेद वाढते नक्कीच अशा क्षेत्राची निवड करा असा सल्लाही दिला. त्याचबरोबर उपस्थित असलेले मान्यवर प्रोफेसर डॉ. दिनेश गुप्ता यांनी देखील विद्यार्थ्यांच्या मनाचा कल ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. जगण्याचा दर्जा हा आपल्या विचारांवर असतो, परिस्थितीवर नाही.. असे आपल्या भाषणात नमूद केले. तेव्हा विचार उज्वल ठेवूनच क्षेत्र निवडा, ह्या विचारांनीच तुम्ही परिस्थिती बदलू शकता.असेही डाॅ. गुप्ता म्हणाले.
दोन तास चालू असलेल्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये सुमारे २५० च्या वर विद्यार्थ्यांनी  व पालकांनी हजेरी लावली होती. प्रत्येक मुलाच्या प्रश्नाचे समाधानकारक व विश्वसनीय उत्तरे सर्वच मान्यवरांकडून मिळाली. सर्व उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्या देऊन फुल न फुलाची पाकळी म्हणून कौतुकास्पद भेट म्हणून एपीजे डाॅ.अब्दुल कलाम यांचे 'अग्निपंख' पुस्तक दिले.

पाकची नरमाई - काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यास तयार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
तेहरान : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यावर आणि जगभरात नाचक्की झाल्यावर पाकने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीर, पाणी वाटप , व्यापार, आणि दहशतवाद यांसारख्या दीर्घकाळ प्रलंबित विषयांवर भारतासोबत संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. ते सध्या इराणच्या दौऱ्यावर असून तेहरानमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियानयांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरीफ म्हणाले, “आम्हाला आमच्या शेजारी देशासोबत शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून पाणी वाटपासारख्या समस्यांवर तोडगा शोधायचा आहे.” ते पुढे म्हणाले, “व्यापार वाढवणे आणि दहशतवादाचा सामना करणे हेसुद्धा आमच्या चर्चेचे विषय असतील.”

शरिफ म्हणाले की, “जर भारताने आमची शांततेची ऑफर स्वीकारली, तर आम्ही हे दाखवून देऊ की आम्ही प्रामाणिकपणे शांतता साध्य करू इच्छितो.” तुर्कस्तान दौऱ्यानंतर शहबाज शरीफ सोमवारी इराणमध्ये पोहोचले असून, पुढील आठवड्यात ते ताजिकिस्तान आणि अझरबैजानला भेट देणार आहेत.

दरम्यान, इराणच्या अधिकृत ‘IRNA’ वृत्तसंस्थेनुसार, अध्यक्ष पेझेश्कियान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये चिरस्थायी युद्धविरामासाठी इराणच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी प्रादेशिक शांततेसाठी संवादाला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा एक मुख्य मुद्दा म्हणजे सिंधू पाणी करार, जो भारत सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित केला होता. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली, ज्यामध्ये पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, १९६० मध्ये झालेला सिंधू पाणी करार सध्या पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादामुळे अंमलात नाही. हा करार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याचे नियमन करतो.

त्याचप्रमाणे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते की, हवामान बदल, लोकसंख्येतील वाढ आणि तांत्रिक बदलांमुळे जमिनीवर नवीन वास्तव निर्माण झाले आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पूर्णपणे आणि विश्वासार्हपणे थांबवल्याशिवाय भारत करार पुन्हा सुरु करणार नाही.

भारत सरकारने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे पाकिस्तानमधून कोणत्याही वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू केली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे.