कल्याण - वालधुनीनदी कल्याण व परिसर सफाई व सुशोभीकरण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतुद करण्याची मागणी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी केडीएमसी च्या नवनिर्वाचित महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत पत्र दिले आहे.
वालधुनी नदी ही बदलापूर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, कल्याण मार्गे खाडीला जाऊन मिळते. या नदीची लांबी सुमारे १३ कि.मी असून कल्याणच्या हद्दीतील लांबी सुमारे ४ कि.मी इतकी आहे. नदीच्या सफाई बाबत तसेच परिसर सुशोभिकरणाबाबत समितीमार्फत गेली अनेक वर्ष पाठपुरावा केला जात आहे. कल्याण-डोबिवली महानगरपालिकेमार्फत वालधुनी नदीला मिळणारे नाले प्रत्येक वर्षी साफ करण्यात येतात. तथापि प्रत्यक्ष नदी पात्राच्या आवारात सफाई अथवा कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. ही बाब पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याबाबत, केडीएमसीला कामे करण्यास अडचंणी येत आहेत.
नदीच्या पात्रात एमआयडीसी मधील कारखाने केमिकलयुक्त पाणी प्रक्रियेविना सोडतात. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील समिती पाठपुरावा करत आहे. कल्याण परिसरातील नदी किनाऱ्याची सफाई व सुशोभीकरण झाल्यास, कल्याणच्या नागरिकांना या ठिकाणी एक चांगले विरंगुळ्याचे स्थान निर्माण होऊ शकेल व या परिसरातील टाकण्यात येणारा कचरा, डेब्रिज देखील उचलले जाऊन परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने या कामासाठी प्रथम टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन उपरोक्त काम पाटबंधारे विभागास करण्यास आदेशित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.