BREAKING NEWS
latest

विवाह नोंदणी सुट्टीच्या दिवशीही होऊन त्याचदिवशी मिळणार नोंदणी प्रमाणपत्र..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

मुंबई :  नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेगवान तसेच सुलभकरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येईल. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याचदिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे. 

प्रशासकीय कामकाजात सुलभता आणणे तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वेग आणणे, यासाठी सर्व विभाग तथा खाती यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये सुलभता आणली आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. असे असले तरी, वर्षभरात होणारे विवाह पाहता ही आकडेवारी नक्कीच कमी आहे. याची कारणे प्रशासनाने शोधली असता लक्षात आले की, मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता, महानगरपालिकेकडे केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५००/- इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे म्हणाले की, या दोन्ही सेवा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहेत. या दोन्ही नवीन सेवांमुळे विवाह नोंदणीची प्रक्रिया आणखी जलद होईल. तसेच, विवाह नोंदणीचे प्रमाण वाढेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

मुंबईतील धावपळीचे, धकाधकीचे आयुष्य लक्षात घेता, नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिकांनाही कामकाजाच्या दिवसांमध्ये अतिरिक्त सुट्टी घेऊन विवाह नोंदणीसाठी महानगरपालिकेकडे यावे लागते. कारण, सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कार्यकाळात, विवाह नोंदणीसाठी नवदाम्पत्य व साक्षीदारांना विवाह निबंधकासमोर (विभागीय आरोग्य अधिकारी) यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सबब, नोकरदार असो किंवा व्यावसायिक, पती-पत्नी किंवा त्यांचे साक्षीदार यांना आपल्या कामकाजाच्या दिवशी सुटी घ्यावी लागते. यामुळे संबंधितांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही अडचण दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठवडा अखेरीस (वीक एन्ड) म्हणजे शनिवार व रविवार या दोन्ही सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या कालावधीत विवाह नोंदणी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये, दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी - 'ए', 'सी', 'ई', 'एफ दक्षिण', 'जी दक्षिण', 'एच पूर्व', 'के पूर्व', 'पी दक्षिण', 'पी उत्तर', 'आर मध्य', 'एल', 'एम पश्चिम', 'एस' या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. तर, दर रविवारी 'बी', 'डी', 'एफ उत्तर', 'जी उत्तर', 'एच पश्चिम', 'के पश्चिम', 'पी पूर्व', 'आर दक्षिण', 'आर उत्तर', 'एन', 'एम पूर्व', 'टी' या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

दरम्यान, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या पाच दिवसांमध्ये होणारी विवाह नोंदणीदेखील जलद व्हावी, संबंधितांना वारंवार महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी आणखी एक सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून ही सेवा ओळखली जाईल. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या ३० विवाह नोंदणी कोट्यामधून २० टक्के म्हणजे एकूण ६ विवाह नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' म्हणून राखीव राहतील. या जलद नोंदणीचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना, सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करुन त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. मात्र, या दोन्ही विवाह नोंदणी सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (पब्लिक हॉलिडे) उपलब्ध नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशी निमित्त ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहरात ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जना निमित्त होणाऱ्या मिरवणुका व या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व हे उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

सणांच्या काळात गर्दीचा फायदा घेत चैन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स व मोटारवाहन चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी विशेष शाखा व गुन्हे शाखेतील साध्या वेशातील पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत.
सोशल मिडीयावरून धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओ पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीया सेलला विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.

बंदोबस्तासाठी उप-पोलीस आयुक्त ११, सहाय्यक पोलीस आयुक्त २६, पोलीस निरीक्षक १००, तसेच ७००० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार, मुंबई व लोहमार्ग पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या व ८०० होमगार्ड्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय बंदोबस्तादरम्यान सर्व ठिकाणी ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाच्या या तयारीमुळे दोन्ही सण शांततेत व उत्साहात पार पडतील, असा विश्वास पोलीस आयुक्त यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस कासारवडवली पोलिसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा अग्नीशस्त्र बाळगणे खरेदी-विक्री करणाऱ्या तसेच समाजात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त ठाणे यांनी सुचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त, व मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर यांनी विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याकरिता आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ५, ठाणे शहर श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम चालू आहे. त्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीत व अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे खरेदी-विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक ०१/०९/२०२५ रोजी कासारवडवली पोलीस ठाणे तपास पथकाचे सपोनि. मनिष पोटे यांना नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे याठिकाणी एक इसम बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र विक्री करण्याकरीता येणार असल्याचे खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांना कळविल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी सापळा लावुन दिनांक ०१/०९/२०२५ रोजी २२:५५ दरम्यान इसम नामे जोगिन्दर लछीराम राजभर (वय: २७ वर्षे), धंदा: प्लंबर, राहणार: कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम मुळ राहणार ग्राम तणवा, ता. जखनिया, जि. गाझीपुर, राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे असलेल्या लाल रंगाची सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीन सह व ०२ जिवंत काडतुसे किंमत अंदाजे रु.६५,६००/- मिळुन आले. सदर अग्निशस्त्र व काडतुसे त्यांनी बेकायदेशीर बाळगल्याबाबत त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे कडील मनाई आदेशाचा भंग केला आहे, त्याच्या विरूध्द कासारवडवली पोलीस स्टेशन गु.र.नं ८१९/२०२५ भा.ह.का.क. ३, २५ सह म. पो. अधिनियम कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, वागळे इस्टेट, ठाणे, श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती कोल्हटकर, सपोनि. मनिष पोटे, पोउपनिरी. नितीन हांगे, सुनिल सुर्यवंशी, पो. अंमलदार. जगदीश पवार, जयसिंग रजपुत, गोरक्षनाथ काळे, संदीप तुपे यांनी केलेली असून पुढील तपास सपोनि. मनिष पोटे हे करीत आहेत.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी "महामुंबई मंथन" चे संपादक व विशाल वी. शेटे यांचे विरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक १३/०८/२०२५ रोजी 'महामुंबई मंथन' या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती समाजातील लोकांचा अवमान करणारी बातमी सुपारी घेऊन छापून आणल्यामुळे "महामुंबई मंथन" चे संपादक व संस्थापक अध्यक्ष (सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) चे विशाल वी. शेटे यांनी या प्रकरणाला कटकारस्थान रचून आर्थिक देवाण-घेवाण करून शहरात जातीय दंगल घडवून आणू पाहणाऱ्या 'अविष्कार बार रेस्टॉरंट' तसेच 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' चे मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौ. आशा अभय गोरे या सर्व जातीवाद्यांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कलम ३(१) (आर) (एस) (टी) (यु) व्ही प्रमाणे तसेच बी.एन.एस कायदा कलम २९९, ३५२, ३५६, ६१, ७ प्रमाणे तसेच इतर संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याबाबत यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्षणराव अंभोरे यांनी अशी मागणी डोंबिवली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे यांच्याकडे केली आहे.
:
दिनांक १३/०८/२०२५ रोजी 'महामुंबई मंथन' या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती जमातीतील लोकांचा अवमान करणारी बातमी वृत्तपत्रावर छापून प्रसिद्ध करण्यात आली त्या संबंधात ह्या अगोदर संविधान चौकात बाजूलाच असणाऱ्या 'अविष्कार बार रेस्टॉरंट' व 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' असणाऱ्या रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये अनाधिकृत अतिक्रम केलेला 'अविष्कार बार रेस्टॉरंट' तसेच रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालवणारे 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' तसेच त्या बिल्डिंगमध्ये अनाधिकृतपणे काम चालू असल्याच्या तक्रारी महानगरपालिका व पोलीस स्टेशनला याआधी देण्यात आलेल्या असून याचाच मनात राग धरून पैशाच्या जोरावर काही जातीयवादी पत्रकार/संपादक हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करून एकत्रित येऊन कटकारस्थान रचून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी रेस्टॉरंट बारचे मालक लॉजिंग चालक-मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौं. अशा अभय गोरे, 'महामुंबई मंथन' वृत्तपत्राचे संपादक व विशाल वि. शेटे (संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) या सर्वांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे तसेच इतरही संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी असे पत्र दिनांक २१/०८/२०२५ रोजी देण्यात येणाऱ्या ह्या तक्रारी अर्ज संदर्भात संबंधितांवरती चौकशी होऊन ३०/०८/२०२५ पर्यंत गुन्हा दाखल करण्यात यावा असे मागणीत नमूद करण्यात आलेले होते. फौजदारी गुन्हे दाखल न करण्यात आल्यास कुठलीही सूचना न देता दिनांक १०/०९/२०२५ पर्यंत गुन्हे दाखल नाही केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाणे कार्यालयावर पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये शहरातील सर्व बहुजन पक्ष सामील होणार असल्याची नोंद व माहिती लक्षणराव अंभोरे यांनी  प्रसिद्धी पत्रकातुन दिली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता व माझे अस्तित्व' चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  अगणित पदव्या प्राप्त केलेले 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे हे नेहमीच वेगवेगळ्या नवीन विषयाची हाताळणी करून त्या विषयांमधील सखोलता विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यरत असतात. मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा विषय होता ' कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (Artificial Intelligence) जे सध्याच्या काळात कुतुहलाचा आणि नवीन काही शिकण्याचा विषय झाला आहे. याच विषयावर आणि या सारख्या अनेक विषयांवर खूप काही शंका कुशंका विद्यार्थ्यांच्या मनात रेंगाळत असतात त्यासाठीच चर्चासत्राचे आयोजन केले गेले. दहा दिवसांसाठी 'जे एम एफ' चा गणपती बाप्पा मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये विराजमान झाला आहे. बाप्पाची आरती करून चर्चासत्राची सुरुवात झाली.
गणपती हा बुद्धीचा दाता आहे, म्हणूनच मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने अनेक नवनवीन गोष्टी निर्माण करतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तर आजच्या युगात स्वतः मध्ये प्रगल्भता आणून विकास करावा हे सांगताना अनेक तज्ञांची नावे घेऊन उदाहरण दिले. एखादे चित्र मनात साकारून कल्पनेतून ते सजीव करणे म्हणेजच स्वप्न पडणे होय. याच स्वप्नांना अस्तित्वात आणून, रेखाटलेल्या चित्रांना सजीव करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence या तंत्रज्ञान माध्यमातून साकारले जाते. सध्याच्या काळात रोजच्या जीवनातील घडामोडी मध्ये Artificial Intelligence हा महत्वाचा घटक ठरला आहे. तंत्रज्ञानाने माणूस किती पुढे जातो त्यासाठी AI हे चपखल उदाहरण आहे. नवनवीन, प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे चेहरे बनवून त्यामधून सहजपणे व्हिडीओ बनवता येतात. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने  संगणक बनवला, त्यामध्ये अनेक विषयांचे प्रोग्राम आखून देऊन सर्वांना सहज सोयीचे माध्यम उपलब्ध करून दिले. तर अनेक अभ्यासक्रम देखील माहिती करून दिले. थोडक्यात काय तर पूर्वी आपण अभ्यास करताना मार्गदर्शिका अर्थात गाईड वापरत असू तेच आता AI च्या माध्यमातून सुलभपणे गाईड उपलब्ध झाले आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षरित्या वाचून तुमच्या शंकेच निरसन होते.
सारासार विचार करता जी गोष्ट जास्त फायदेशीर होऊन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहते तिचीच दुसरी बाजू ही तोट्याची देखील असू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, जग जवळ आले, अनेक गोष्टी साकारायला मिळाल्या, परंतु त्याचा परिणाम असा झाला की माणूस विचार करून आपल्या बुद्धीने जे कार्य करत होता ती बुद्धिमत्ता खुंटत चालली आहे, सहजरित्या मिळालेल्या गोष्टीचा आनंद हा असतोच परंतु त्या गोष्टीवर  विचार करून ती कल्पना शक्तीने अंमलात आणून साकारलेल्या गोष्टीचा आनंद हा आभाळा एवढा आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. परंतु काळाबरोबरच आपणही चालले पाहिजे म्हणूनच AI हे माध्यम तुम्हा तुम्हां आम्हाला नवीन दिशा देणारे आहे म्हणूनच काळानुसार रोजच्या घडामोडी मध्ये सतर्क राहा असेही सांगितले.
प्रसार माध्यमाचे मुख्य आयोजक श्री.रोहित राजगुरु व त्यांच्या चमू ने कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे अनेक चित्र दाखवून त्यांचे चलचित्र कसे तयार करता येते हे देखील विद्यार्थ्यांना दाखवले. जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय व वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी व सर्व शिक्षक या चर्चासत्रात उपस्थित होते. अनेकांनी प्रश्न विचारून उत्तरे देखील घेतली. वंदे मातरम् म्हणून चर्चासत्राची सांगता झाली.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाबाबत गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळाले आहे. सरकारने याबाबतचा जीआर काढल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडत आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे आणि ते आंतरवाली सराटी च्या दिशेने निघाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेला जीआर

१. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

२. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेले आहे. पैठण (प्रतिष्ठाण) ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक म्हणून आज सुद्धा त्याच दिमाखाने उभा आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दि.१७ सप्टेंबर, १९४८ साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमितून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी-वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तिर्थक्षेत्रे निर्माण झाली. जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पाने नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी आहेत.

३. मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमितून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, जगमित्र नागा, एकनाथ, सेना न्हावी व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमिमध्ये सहिष्णूता, भागवत धर्माचा प्रसार, भूतदया, समानतेचा संदेश दिला आहे. तसेच श्री गुरू गोविंद सिंघजी यांची समाधी नांदेड येथे असून त्याठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. या कारणाने मराठवाड्यात आजसुद्धा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे. मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात. या नद्याने यांतील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे. गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तिरावर वसलेला आहे.

४. असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दि. ०१ नोव्हेंबर, १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दि.०१ मे, १९६० पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. तत्कालिन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी या भागातील कुणबी, कुणबी मराठा तसेच मराठा- कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दि.०७ सप्टेंबर, २०२३ रोजी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत. उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी/दौरे करून बैठका घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी याकारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे ७ हजार पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतली आहेत. तसेच, देशाची जनगणना आणि त्याअनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरिता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली आहेत. याचदरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणात क्षेत्रिय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने आतापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारशी शासनाने स्विकारल्या आहेत व याआधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे. यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे.

५. तथापि, मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी-मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीस हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निदेशित करण्यात आले असून, त्याकरिता उक्त समितीस दि.३१ डिसेंबर, २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची (औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड व उस्मानाबाद) माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहू कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता. या कागदपत्रांमध्ये / गॅझेटिअरमध्ये (सन १९२१ व सन १९३१) कुणबी/कापू अशा नोंदी आहेत. यापुर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १८ च्या पोट कलम १ मध्ये आणि नियम, २०१२ च्या नियम ४ मधील उप-नियम (२) मधील खंड (च) मध्ये (च) नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४, दि.१८ जुलै, २०२४ अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, मराठा समाजास कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे. आता, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन वाचा क्र.१ व क्र.३ अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करुन सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

समिती सदस्यः

१. ग्राम महसूल अधिकारी
२. ग्रामपंचायत अधिकारी
३. सहायक कृषी अधिकारी

मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि.१३.१०.१९६७ पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे.

या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील.

श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठण विक्रमाची 'ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंड' मध्ये झाली नोंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पिंपरी, दि २ : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी ऋषिपंचमी दिवशी हजारो महिला भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात. यावर्षी ३५ हजार २१५ महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे. याची नोंद 'ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड' मध्ये करण्यात आली आहे. या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र 'ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड' या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांना नुकतेच प्रदान केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनेही डॉ. दीपक हरके यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी डॉ. हरके यांनी गणेश भक्त, भाविकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.