BREAKING NEWS
latest

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर कल्याण मध्ये महापालिका निकालानंतर जीवघेणा हल्ला.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील कैलासनगरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. अंबादास कांबळे असे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून जखमी अंबादास कांबळे यांना हल्ल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते अंबादास कांबळे यांना जीवघेणी मारहाण झाली. किरण पावशे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. किरण पावशे हा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

स्थानिक नागरिकांनी जखमी अंबादास कांबळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे निवडणूक निकालानंतरही राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जखमी अंबादास कांबळे यांनी आरोप करताना म्हटलं की 'किरणने जातीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. निवडणुकीत शिंदे गटाचं काम केल्याने मारहाण केली. त्याने लोखंडी फायटरने एकट्यानेच मारहाण केली.

भाविकांच्या सेवेत आजपासून मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१८ : कल्याणमधील श्री मलंगगडावर आता भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा अखेर  सुरू झाली आहे. रविवारी भाजपा आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. आजपासून सुरू झालेल्या या फ्युनिक्युलर सेवेमुळे भाविकांना मलंगगडावर जाणं अधिक सोपं, सुरक्षित आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, सुप्रीम कंपनीकडून भाविकांसाठी दोन दिवस ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री मलंगगड यात्रेच्या आधीच आता भाविकांच्या सेवेत फ्युनिक्युलर सेवा यंदा दाखल झाल्याने यंदाच्या यात्रेत भाविकांना मोठी सोय होणार आहे.

हा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव २००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली आणि अखेर यंदा २०२६ मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे.

मलंगगडावर, हाजी मंगलला कल्याण, मुंबई, नवी मुंबईतून अनेक भाविक येतात. जाण्यासाठी अंदाजे २६०० पायऱ्या चढून वर गडावर जावं लागतं. हा गड चढण्यासाठी जवळपास २तास लागतात. मात्र आता फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून सुरू झाल्याने हे २ तासांचं अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करून जाता येईल. या सुविधेच्या देखरेखीसाठी ७० जण असून १२० जण यातून प्रवास करू शकतात, अशी माहिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सेवेला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रालयातून फ्युनिक्युलर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. श्री मलंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मलंगगडावर जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागत असे, ज्यामुळे अनेक भाविकांना त्रास होत असे. आता या फ्युनिक्युलर सेवेमुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही सहजपणे गडावर जाता येणार आहे. या सेवेमुळे मलंगगडावरील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

काय आहे फ्युनिक्युलर सेवा ?

फ्युनिक्युलर ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे, ट्रॉली सारखी सुविधा आहे. गुरुत्वाकर्षण आणि केबल्सचा वापर करून मागे-पुढे अशा दोन गाड्या एका उंच उतारावर चालवल्या जातात. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतो. फ्युनिक्युलर सेवा लिफ्ट आणि ट्रेन अशा दोघांची मिळून तयार झालेली सेवा आहे.

या फ्युनिक्युलर सेवेसाठी पाठपुरावा करणारे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकार्पणाच्या वेळी अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याला शिंदे गटाचे खासदार आणि पदाधिकारी अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे भव्य स्वरूपात उद्‌घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.१८ - ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटलच्'या ठाणे शहरातील दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन आनंद भवन सोसायटी, भक्ती मंदिर रोड, तीन हात नाका, नेक्सा शोरूमच्या वर,  ठाणे येथे आज मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडले. या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाच्या  उद्‌घाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे लाडके लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवेचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री.निरंजन डावखरे यांनी देखील कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमात मा. श्री.नरेश म्हस्के यांनीही उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणेकरांसाठी सुरू झालेल्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी ठाणे शहरातील नगरसेवक, नामवंत डॉक्टर, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रेम, विश्वास आणि पाठबळामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ठाणे शहरासाठी सर्वोत्तम, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा देण्याचा आमचा संकल्प पुढेही तितक्याच निष्ठेने सुरू राहील.”
ठाणे येथील हे नवीन रुग्णालय 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवाविस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून, ठाणेकरांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक नवा विश्वास निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) आयोजित 'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड' समारोह संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आयोजित Vocational Excellence Award (व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड) कार्यक्रमाचे सुंदर आयोजन हे शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी रोटरी भवन डोंबिवली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे हे निवृत्त माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी श्री. महेश झगडे हे होते. ह्या वर्षीचा पुरस्कार हा विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आला त्यात चित्रलेखा वैद्य (पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन), चारुदत्त कोलारकर (सामाजिक सेवा), अर्णव पटवर्धन (युवा पक्षीतज्ज्ञ) आणि सुधाश्री ट्रस्ट (सामाजिक कार्य) ह्यांना प्रदान करण्यात आला. शेला, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे प्रमुख स्वरूप होते. तसेच विशेष असा जीवन गौरव पुरस्कार हा श्री. जे के. साबू ह्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 
'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड'' समारोहासाठी डोंबिवली मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) चे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, क्लब चे सचिव विनायक आगटे, प्रकल्प प्रमुख मानस पिंगळे, प्रकल्प संचालक दीपक नेरकर, माजी रोटरी जिल्हा प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर, रोटरी सदस्य आरती बापट, संगीता पाखले, वीणा बेडेकर, शंतनू पुराणिक, पूनम यादव, वर्षा नेरकर राजन सावरे, सतीश अटकेकर, मंजिरी घरत, क्लब चे माजी अध्यक्ष कौस्तुभ कशेळकर, रघुनाथ लोटे, राधिका गुप्ते पुढील वर्षीचे अध्यक्ष अथर्व जोशी आणि इतर अनेक क्लब चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे रोटेरिअन विश्राम परांजपे ह्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १६ जानेवारी - महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारे सोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले. मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.

भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.

देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत. पक्षासाठी २४ तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. रविंद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम "निवडणूक सिद्धता" म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. त्यातच अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत रविंद्र चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकासकामे करताना संपूर्ण महाराष्ट्रात हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरली असं दिसत आहे. आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके प्रखरतेने माध्यमांसमोर दिसलं तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे १८ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' ठाणे शहरात आपल्या दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन करत आहे. हे अत्याधुनिक नेत्ररुग्णालय १८ जानेवारी २०२६ रोजी ठाणे पश्चिम येथे सुरू होत आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून, मा. श्री. नरेश म्हस्के हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठाणे व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित आहे.
पांचपाखाडी, भक्ती मंदिर रोड येथे सुरू होणाऱ्या या नव्या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा तसेच लेझर उपचार यांसारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सन १९७२ साली सुरू झालेल्या अनिल आय हॉस्पिटलने आज डोंबिवली (पूर्व व पश्चिम), ठाणे, कल्याण, पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये आपल्या सेवांचा विस्तार केला असून, हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

याबाबत बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांनी दिलेल्या प्रेम व विश्वासामुळेच आम्ही ठाणे शहरात दुसरे रुग्णालय सुरू करत आहोत. दर्जेदार, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.” ठाणे शहरातील नागरिकांसाठी हे नवीन रुग्णालय नेत्रसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाची उपलब्धी ठरणार आहे.
कार्यक्रम तपशील
📅 दिनांक: १८ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी १० ते दुपारी २
📍 पत्ता: अनिल आय हॉस्पिटल,
दुसरा मजला, भक्ती मंदिर रोड,
पंचपाखाडी, नेक्सा शोरूमच्या वर, ठाणे (पश्चिम)
संपर्क: ९९२५२३५९६९

सार्वत्रिक महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी निवडणूक यंत्रणा सज्ज!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१३ - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक  २०२५-२६ साठी महापालिका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, या सार्वत्रिक निवडणूकीत ३१ पॅनलमध्ये बहुसदस्य पध्दतीने निवडणूक संपन्न होणार आहे. या निवडणूकीसाठी १५४८ मतदान केंद्रांवर आणि ३८२ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. यापैकी १०१३ मतदान केंद्रे तळ मजल्यावर, ९ मतदान केंद्रे पहिला मजल्यावर, ४७१ मतदान केंद्रे पार्टीशन स्वरुपात, ५५ मंडपात असणार आहेत. महापालिका क्षेत्रात एकुण १४,२५,०८६ इतकी मतदारांची संख्या असून, त्यापैकी एकुण ७,४५,६६४ पुरुष मतदार, एकुण ६,७८,८७० स्त्री मतदार व इतर मतदारांची संख्या ५५२ इतकी आहे. 

महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी (निवडणूक निर्णय अधिकारी २ व ४ ची मतमोजणी एका ठिकाणी) होणार असून, त्यांची माहिती खालील प्रमाणे..

१. निवडणूक निर्णय अधिकारी - १ यांचेकडील पॅनल क्रमांक – २, ३ व ४ ची मतमोजणी बिर्ला वन्य, केडीएमटी इमारत, तळ मजला, शहाड (पश्चिम).

२. निवडणूक निर्णय अधिकारी - २ यांचेकडील पॅनल क्रमांक – १, ५, ६ व १० ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

३. निवडणूक निर्णय अधिकारी - ३ यांचेकडील पॅनल क्रमांक – ७, ८ व ९ ची मतमोजणी प्रभाग क्षेत्र ३/क चे कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र,‍ आधारवाडी, कल्याण (‍पश्चिम).

४. निवडणूक निर्णय अधिकारी - ४ यांचेकडील पॅनल क्रमांक – ११, १२ व १८ ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

५. निवडणूक निर्णय अधिकारी - ५ यांचेकडील पॅनल क्रमांक – १३, १४, १५ व १६ ची मतमोजणी साकेत कॉलेज, १०० फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, काटेमानिवली, कल्याण (पूर्व).

६. निवडणूक निर्णय अधिकारी - ६ यांचेकडील पॅनल क्रमांक – २०, २६, २७ व २८ ची मतमोजणी आयईएस पाटकर विद्यालय, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या स्टील्ट हॉलमध्ये.

७. निवडणूक निर्णय अधिकारी - ७ यांचेकडील पॅनल क्रमांक – २१, २२, २३ व २५ ची मतमोजणी कडोंमपा शाळा क्र. २०, रेती बंदर रोड, मोठा गांव, डोंबिवली (पश्चिम).

८. निवडणूक निर्णय अधिकारी - ८ यांचेकडील पॅनल क्रमांक – २९ व ३० ची मतमोजणी धनजी नानजी चौधरी विद्यालय हॉल, पहिला मजला, नांदीवली, डोंबिवली (पूर्व).

९. निवडणूक निर्णय अधिकारी - ९ यांचेकडील पॅनल क्रमांक – १७, १९ व ३१ ची मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व).