उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष व महिला खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या पुरुषांची भारतीय रेल्वे विरुध्द तर महिलांची विमान प्राधिकरण विरुध्द लढत होईल.
भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली होती. रेल्वे-कर्नाटक वगळता प्रेक्षकांना चुरशीच्या सामने पाहण्यास मिळाले.
उपांत्य फेरीच्या पुरुष गटाच्या सामन्यात महाराष्ट्रने कोल्हापूरला १९-१५ असे नमविले. मध्यंतराची १०-८ ही २ गुणांची आघाडीच महाराष्ट्रास विजय मिळवून देऊन दिली. रामजी कश्यपने दोन्ही डावात १.४०, १.१० मि. संरक्षणची खेळी केली. अनिकेत पोटेने (१.२० मि. व ४ गुण) अष्टपैलू कामगिरी केली. निहार दुबळेने ४ तर सूयश गरगटे व प्रतिक वाईकर यांनी प्रत्येकी ३ गुण संघास मिळवून दिले. सूयश गरगटेने १.२० मि. संरक्षण व प्रतिक वाईकरने १ मि. संरक्षण केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महेश शिंदेच्या २.४० मिनिटे शानदार संरक्षणाच्या खेळीमुळे भारतीय रेल्वेने कर्नाटकचा ११-९ असा डावाने दणदणीत विजय मिळविला. कर्नाटकच्या धनराजची खेळी अपुरी पडली.
उपांत्य फेरीच्या महिला गटात महाराष्ट्राने दिल्लीस १९-१० असे पराभूत केले. प्रियांका इंगळे व काजल भोर यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी ५ गुण संघास मिळवून दिले. प्रियांका भोपी बरोबरच अपेक्षा सुतार, संपदा मोरे व दिपाली राठोड यांनी प्रत्येकी २.१० मिनिटे अशी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. दिल्लीकडून सीमाची अष्टपैलू खेळी (१.१० मि. संरक्षण) अपुरी पडली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय विमान प्राधिकरण संघास ओरिसावर १२-१० असा विजय मिळविता कडवी झुंज द्यावी लागली. अर्चना व स्मरणिका यांच्या भक्कम संरक्षणाच्या खेळीमुळे ओरीसाने मध्यंतरास ६-६ असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर मात्र, विमान प्राधिकरण संघाच्या ऋतुजा (२.००, १.४० मि. व ४गुण) मोनिका (१.३०, १.५० मि. व २ गुण), एम वीणा (२.५०,२.१० मि.) व तेजस्विनी (२.५० मि.) यांनी बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला.
राष्ट्रीय स्पर्धेतील अष्टपैलू ठरणार्या पुरुष व महिला खेळाडूला अनुक्रमे एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेत एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेत्या खेळाडूला उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा