प्रतिनिधी: अवधुत सावंत
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत महाविकास आघाडीची साथ धरली असली तरी नवीन पक्षांना आपल्यासोबत जोडत भाजप - शिंदे गटाविरुद्ध वेगळे राजकीय डावपेच आखण्याचे प्रयत्न सध्या दिसून येत आहे. मुंबईतील शिवाजी मंदिर येथे प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या पुर्नस्थापना करण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकत्र आल्याचे दृश्य बघायला मिळाले. वंचितकडून याआधीच उद्धव ठाकरे गटाला एकत्र येण्याकरिता प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नव्हते. मात्र नुकतेच हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांना एकत्रित येण्याची साद घालण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देश सध्या गुलामगिरीकडे जात आहे. अशा वेळी आपण उघड्या डोळ्याने हे सर्व बघणार का ? निद्रेच्या आहारी गेलेल्या लोकांना जागविण्याचे गरज आहे, ते कार्य आपल्यालाच करावे लागेल. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी उडी घेत समाजाला जागविले होते, तेच कार्य आज करण्याची गरज असल्याने एकत्र येणे गरजेचे आहे. आतापर्यंत घटनेप्रमाणे किती कार्य झाले आणि घटनाबाह्य किती कार्य झाले हे बघणे तसेच त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. सध्या हे बघण्याचे धाडस कुणामध्ये नाही, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका मांडली तसेच येत्या काळातील लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत दिले. यामुळे लवकरच वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती झाल्यास, नवल वाटण्यासारखे काही नाही असे म्हणावे लागेल. या कार्यक्रमाच्या मंचावरून या दोन्ही नेत्यांनी जणू आगामी काळात होणाऱ्या युतीची घोषणाच केली असे देखील म्हटल्यास गैर ठरणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा