प्रतिनिधी: अवधुत सावंत
सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालयाचा कारभार असल्याने विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांबाबत राजकीय वर्तुळातून करण्यात आलेल्या विधानांनी गृहखात्याच्या स्वतःच्याच मंत्र्यांवर वचक नसल्याची ओरड झाली होती, ज्यामध्ये अब्दुल सत्तारांचे प्रकरण चांगलेच प्रकाशझोतात आले होते. पुन्हा एकदा हा मुद्दा नव्याने उचलून धरण्यात आला आहे, त्याच अनुषंगाने विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.
विरोधी पक्षातील महिलांनी राज्यातील सत्ताधारी नेते महिलांबाबत बेताल वक्तव्य करतात परंतू त्यांना गृह खात्याकडून तसेच सत्ताधारी नेत्यांकडून समज दिला जात नाही अशी तक्रार राज्यपालांकडे केली आहे. प्रसंगी गृहखात्याच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आले आहे. या महिला लोकप्रतिनिधींची राज्यपालांसोबत बैठक आटोपताच तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेण्यास पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यापीठ कायदेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे आली असून राज्यपालांनी काही महत्वपूर्ण बाबतीत त्यांना सूचना देखील केल्याचे समजते. प्रसंगी राज्य सरकारमधील नेते मंडळींच्या बेताल वक्तव्याबाबतीत देखील राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या विधानाने राजकीय वातारवरण तापले होते आता विरोधी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड महिलेच्या विनयभंग प्रसंगी चर्चेत आहे. त्यामुळे या सर्व स्थितीमुळे कुठेतरी महिलांबाबतीत मुद्दे राजकीय वातावरण तापवताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा