BREAKING NEWS
latest

गुजरातमधील ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी च्या एकमेव आमदाराने राजीनामा देत शरद पवारांना दिला धक्का..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  सध्याच्या घडीला देशात गुजरात मधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन पक्षात मुख्य टक्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधक जोर लावत आहेत. 

  यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे गुजरातमधील एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी राजीनामा दिला आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पोरबंदरमधील कुटियाना येथून कंधाल जडेजा यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. कंधाल जडेजा हे २०१२ पासून कुटियाना मतदारसंघातून निवडून येत आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मतांनी जिंकून येत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता.

  राज्यसभा निवडणुकीवेळी कंधाल यांनी बंडखोरी केली होती. उमेदवारी न मिळाल्याने कंधाल जडेजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे. राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी कंधाल जडेजा यांनी पक्षादेश झुगारुन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. कंधाल जडेजा यांनी ११ नोव्हेंबरलाच कुटियानामधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत उमरेठ, नरोडा आणि देवगड बारिया या तीन जागांसाठी आघाडी केल्याचे जाहीर केले होते. पक्षाविरोधात जाऊन उमेदवारी दाखल करणाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  दरम्यान, गुजरात विधानसभेच्या १८२ मतदार संघांसाठी निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर ला  होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत