BREAKING NEWS
latest

'राज्यपाल हटवा’, शिंदे गटातून उमटला सूर; मराठी व्यक्तीला राज्यपाल पद देण्याची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून वेगवेगळ्या प्रकारे राज्यपालांवर टीकेची झोड उठत आहे. यापूर्वी विरोधक राज्यपालांना धारेवर धरत असल्याचे चित्र होते, मात्र आता सत्ताधारी आमदारांकडून राज्यपालांना हटविण्याची मागणी होत असल्याचे चित्र आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान नितीन गडकरी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्याने यापूर्वी संभाजीराजे यांनी राज्यपाल हटविण्याची मागणी करणार असल्याचे वक्तव्य केले होते.

  आतापर्यंत संभाजी ब्रिगेड, खासदार संजय राऊत, उदयराजे भोसले, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे इत्यादी नेत्यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे राज्यपालांविरोधात चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे, आता थेट शिंदे गटातील आमदाराने राज्यपालांविरोधात संताप व्यक्त केला असून, राज्यपालांना राज्यातून हटविण्याची मागणी केली आहे.

  शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, “ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, ज्यांना राज्य काय आहे हे कळत नाही अशा व्यक्तीला आपल्या दिलदार राज्याच्या 'राज्यपाल'पदी ठेवण्यात येऊ नये. हल्लीच्या राज्यपालांना कुठे पाठवायचे तिथे पाठवा परंतू महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसालाच राज्यपालपदी बसवा”, अशी विनंती संजय गायकवाड यांनी भाजपकडे केली आहे.

  यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी सूचक मत व्यक्त करताना प्रकरणाची सावरासावर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खुद्द सहकारी पक्षातील आमदारांकडून राज्यपाल विरोधी सूर उमटत असल्याने, या प्रकरणाला निवळने सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान ठरणार आहे.प्रसंगी केंद्र सरकारला देखील यामध्ये मध्यस्थता करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत