BREAKING NEWS
latest

उद्धव ठाकरेंना अतुल भातखळकरांचा बोचरा सवाल !


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

   उद्धव ठाकरे यांनी एका महिलेला मुख्यमंत्रीपदी बसविण्याच्या वक्तव्यावरून अतुल भातखळकर यांनी बोचरा सवाल केला आहे. कोण असावी बरं ती महिला ?, असे छोटेशे ट्विट शेअर करत त्यांनी कुतुहल निर्माण केले आहे.  अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना घरातील किंवा मर्जीतील महिलेलाच तर मुख्यमंत्रीपदी बसवायचे नाही ना अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा अतिरेकी हस्तक्षेप होत असल्याचे आरोप यापूर्वीच झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर पुन्हा एकदा रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

  मध्यंतरी शिवसेनेतून फुटून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दिपाली सय्यद यांनी देखील पक्ष सोडत असताना संजय राऊतांसह थेट रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेतील खोके मातोश्रीवर येण्याचं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना लागली आहे. सुषमा अंधारे आणि निलम गोऱ्हे या सर्व चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोपही दिपाली सय्यद यांनी केला होता.

  शिवशक्ती-भीम शक्ती-लहू शक्ती जर एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत, हे सध्या मी अनुभवतो आहोत. सध्या मी घराबाहेर पडतो आहे तरी यांच्या पोटात गोळा यायला लागलाय. आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले हेते. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

  त्यांच्या या विधानानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर रश्मी ठाकरे यांच्यासोबतच आणखी एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अगदी ३ महिन्यांपूर्वी शिवसेनेत सहभागी झालेल्या सुष्मा अंधारे यांचं. सुष्मा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांत पक्षात आपले हक्काचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य करत असताना मनात कोणत्या महिला नेत्याचा विचार केला हा सध्या अभ्यासाचा विषय ठरत आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत