BREAKING NEWS
latest

प्रतिनिधी: अवधुत सावंत उद्धव ठाकरे यांनी एका महिलेला मुख्यमंत्रीपदी बसविण्याच्या वक्तव्यावरून अतुल भातखळकर यांनी बोचरा सवाल केला आहे. कोण असावी बरं ती महिला?, असे छोटेशे ट्विट शेअर करत त्यांनी कुतुहल निर्माण केले आहे. अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना घरातील किंवा मर्जीतील महिलेलाच तर मुख्यमंत्रीपदी बसवायचे नाही ना अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा अतिरेकी हस्तक्षेप होत असल्याचे आरोप यापूर्वीच झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर पुन्हा एकदा रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी शिवसेनेतून फुटून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दिपाली सय्यद यांनी देखील पक्ष सोडत असताना संजय राऊतांसह थेट रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेतील खोके मातोश्रीवर येण्याचं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना लागली आहे. सुषमा अंधारे आणि निलम गोऱ्हे या सर्व चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोपही दिपाली सय्यद यांनी केला होता. शिवशक्ती-भीम शक्ती-लहू शक्ती जर एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत, हे सध्या मी अनुभवतो आहोत. सध्या मी घराबाहेर पडतो आहे तरी यांच्या पोटात गोळा यायला लागलाय. आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले हेते. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर रश्मी ठाकरे यांच्यासोबतच आणखी एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अगदी ३ महिन्यांपूर्वी शिवसेनेत सहभागी झालेल्या सुष्मा अंधारे यांचं. सुष्मा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांत पक्षात आपले हक्काचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य करत असताना मनात कोणत्या महिला नेत्याचा विचार केला हा सध्या अभ्यासाचा विषय ठरत आहे.


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार संवेदनशील पावले उचलत आहे. मुंबईतील गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढवत ती मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) देखील राबविण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात ही योजना एमएमआरमध्ये राबविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  'मुंबई फर्स्ट' संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील पायाभुत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी शहरातील रस्ते, चौक, फुटपाथ, फ्लायओव्हर्सचे सुभोभिकरण देखील वेगात केले जात आहे. मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सरकारने भक्कमपणे पावले उचलली आहेत. तसेच मुंबईत आणि मुंबई महानगर प्रदेशात आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सागितले. यावेळी 'मुंबई फर्स्ट' संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्विनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जगातील सुंदर शहर मुंबई असावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने आम्ही पावले उचलत असून शहरातील रस्त्यांचे देखील येत्या काळात काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते उभाऱण्यावर आता आमचा अधिक भर असेल.

  तसेच मुंबईतील कोळीवाड्यांचा मुद्दा देखील महत्त्वाचा असून कोळीवाड्यांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. पर्यटनवाढीसाठी कोळीवांड्यांची संस्कृती, खाद्य संस्कृती जपण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबईत सध्या कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

  यावेळी 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' उपक्रमाचे 'मुंबई फर्स्ट' संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. जागतिक तापमानवाढीच्या दृष्टीने विचारमंथन व्हावे व मुंबईतील बदलत्या तापमानाच्या अनुशंगाने येत्या काळात आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठकीत चर्चा झाली.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत