BREAKING NEWS
latest

अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ नवाब मलिकांनाही जामीन मिळणार? मुंबई हायकोर्टात आज तातडीने सुनावणी..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मलिक यांचा जामीन फेटाळला होता. या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आज जामीन मिळणार की त्यांना तुरूंगातच राहावे लागणार याकडेच सर्वाचं लक्ष लागून आहे.

  गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मलिक यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप 'ईडी'ने केला आहे. याप्रकरणी 'ईडी'ने गुन्हा दाखल करत फेब्रुवारीत त्यांना अटक केली होती.

  विशेष न्यायालयात नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्याने मलिक यांच्या वतीने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. या अर्जावर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे.

  विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी जामीन मिळाला. कथित १०० कोटी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई हायकोर्टाने देशमुखांचा जामीन मंजूर केला. मात्र, पुढच्याच क्षणी कोर्टाने त्यांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती सुद्धा देण्यात आली कारण, सीबीआयने या जामीनाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हायकोर्टाला सांगितलं. यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली. सीबीआयच्या विनंती मान देऊन न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

  दरम्यान, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक यांनी सुद्धा जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर आज तातडीने सुनावणी होणार असून देशमुखांपाठपाठ नवाब मलिक यांनाही जामीन मिळतो का ? की त्यांना तुरुंगातच रहावे लागते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत