BREAKING NEWS
latest

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, येत्या तीन दिवसांत ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस !


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशावर 'मंदौस' चक्रीवादळाचं संकट घोघावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात 'मंदौस' चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आता महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचे सावट असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

  हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, 'मंदौस' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असून इतर ठिकाणी हवामान कोरडे राहिल, याशिवाय राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

  आधीच आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसचं झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.

  दरम्यान, रविवारी मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूवर दिसून आला होता. आता या वादळाची दिशा बदलून नैऋत्य झाली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राकडे येणार नाही. तरी सुद्धा राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सकाळपर्यंत मंदौस वादळ आणखी कमजोर होणार असून किमान तापमानात थोडी वाढ होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत