BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील उद्योजकांना 'महावितरण' च्या नोटीसा; सुरक्षा अनामत रकमेविरुद्ध उद्योजकात संतापाची लाट..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील उद्योगक्षेत्रात कोरोना सारख्या भीषण महामारीनंतर आर्थिक बाजू कशी बशी सावरणाऱ्या डोंबिवलीतील उद्योजकांना महावितरणाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. डोंबिवलीत एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक ग्राहकांना सुरक्षा अनामत रकमेच्या लाखापासून ते कोटी पर्यंत आलेल्या नोटिसांमुळे उद्योजकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खेळते भांडवल धोक्यात  येण्याचा संभव असल्याचे कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या 'कामा' या उद्योजकाच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कडून औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना दिलेल्या नोटिसात उच्च दाब व जोडणीच्या ग्राहकांना सुरक्षा अनामत रक्कम देण्याच्या सूचना अचानक या नोटिसाद्वारे देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळानंतर जड उद्योग, रसायन उद्योग, कापड उद्योग, तसेच लघुउद्योग, सूक्ष्म लघु उद्योग कोरोनाच्या महाभयंकर महामारीतून कसेबसे तगले आहेत. असं असताना आता डिसेंम्बर २०२२ पासून अशा प्रकारच्या नोटिसा उद्योजकांना 'महावितरण' कडून देण्यात येत आहेत. यामुळे अनेक उद्योजक आर्थिक कोंडीत सापडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उद्योजकांकडे असलेले खेळते भांडवल या नोटीसीतून देयक म्हणून आलेल्या रकमेसाठी भरले गेले तर उद्योग सुरू ठेवण्यासाठी भांडवल शिल्लक राहणार नाही. त्यामुळे उद्योग जोमाने कसा सुरू राहील ?  याबाबत 'कामा' संघटनेचे कार्यकारी सदस्य उदय वालावलकर यांनी भिती व्यक्त  केली आहे.  

  डोंबिवलीतील  उद्योगांना आजतागायत अविरत आणि अखंडित वीज मिळाली नाही. कसेबसे उत्पन्न मिळवून देतात त्यांना लाखो करोडो रुपयांची  अनामत रक्कमांची नोटीसा बजावण्यात काय हेतु आहे ? असा प्रश्न संघटनेच्या वतीने विचारण्यात आला असून, जग 'हाय टेक' तंत्रज्ञान अवलंबत असताना, महावितरण मात्र जुन्याच तांत्रिक पद्धतीने वीज वितरण करीत असल्याची खंत  'कामा' संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत